कऱ्हाड : तोडफोडप्रकरणी शंभरावर अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

ओगलेवाडी येथे झालेल्या प्रकरणात शहर पोलीस ठाण्याचे हवालदार खराडे यांनी फिर्याद दिली आहे, आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास ओगलेवाडी पोलीस चौकीजवळ विशाल अंगारखे (पूर्ण नाव माहित नाही) याच्यासह सुमारे 30 लोकांनी विनापरवाना मोर्चा काढून कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध नोंदवला.

कऱ्हाड : कोरेगाव भीमा घटनेचे पडसाद येथे उमटले, त्यावरून ओगलेवाडी व कऱ्हाड येथे झालेल्या तोडफोडप्रकरणी शंभरावर अनोळखी व्यक्तींवर शहर पोलिसांत काल (मंगळवारी) रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला. संबंधीतांवर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून शांतता भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ओगलेवाडी येथे झालेल्या तोडफोड प्रकरणी उत्तम खराडे तर कराड येथील घटनेबाबत किरण सूर्यवंशी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

ओगलेवाडी येथे झालेल्या प्रकरणात शहर पोलीस ठाण्याचे हवालदार खराडे यांनी फिर्याद दिली आहे, आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास ओगलेवाडी पोलीस चौकीजवळ विशाल अंगारखे (पूर्ण नाव माहित नाही) याच्यासह सुमारे 30 लोकांनी विनापरवाना मोर्चा काढून कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या घोषणा झाल्या त्याचवेळी कराड-विटा रस्त्यावरून पुणे-वल्लभनगरहून जतला निघालेली एसटी (क्रं. एम. एच. 40 एन 9549) यावर दगडफेक करून ती फोडली. त्यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर त्यांनी आजूबाजूची दुकाने बंद पाडली. 

कऱ्हाड शहरात झालेल्या घटनेबाबत लांडेवाडी ता. खटाव येथील सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे. ते त्यांच्या घरगुती कामाकरिता आपल्या मारूती व्हॅनमधून संकेत सोनोग्राफी येथे आले होते. उपजिल्हा रुग्णालयासमोर त्यांनी त्यांची कार पार्क केली होती. त्यावेळी विजय दिवस चौकातून आलेल्या पन्नास ते शंभर लोकांच्या जमावाने वेगवेगळ्या घोषणा देत तोडफोड केली. त्यामध्ये वेगवेगळ्या दुकानांचे फलक, वाहनांच्या काचा त्यांनी फोडल्या. त्यात माझ्या कारची ही काच फोडली आहे. त्याचे 40 हजाराचे नुकसान झाले आहे. तसेच सुनिल कुलकर्णी यांच्या एलआयसीच्या कार्यालयाच्या काचावर दगडफेक झाली आहे. सलीम शेख यांच्या कारवरही (एम. एच. 50 ए. 945) दगडफेक करून काचा फोडल्या आहेत. अर्बन बझारवरही दगडफेक करून त्याचेही नुकसान केले आहे. हंसराज ओसवाल यांच्या मेन्सवेअरवर दगडफेक करून त्याचा बोर्ड फोउला आहे. त्याशिवाय हॉटेल अलंकारच्याही काचा फोडल्या आहेत. आगाशिवनगर येथील जयंत साळुंखे यांची टाटा इस्टीम (क्र. एम. एच. 50 एल. 3030), किशोर सावंत यांची होंडा सिटी कार (क्र. एम. एच. 50 ए. 9390), कोळेवाडी येथील संदीप रंगाटे यांची कार (क्रं. एम. एच. 50 ए. 9906) अशा वाहनांवरही दगडफेक करून नुकसान केले आहे. 

Web Title: Marathi news Satara news Bhima Koregaon impact in Karhad