उस्मानाबाद जिल्ह्यातील बाजारपेठा बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

उस्मानाबाद, कळंब, भूम, परंडा, लोहारा येथे महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, सकाळी नऊनंतर जिल्ह्यातील एसटी बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. लोहारा, उमरगा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात तीन ठिकाणी बसवर दगडफेकीचे प्रकार घडले. 

उस्मानाबाद : भीमा- कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्र बंदमुळे उस्मानाबाद शहर व जिल्ह्यातील तालुका ठिकाणच्या बाजारपेठा बुधवारी (ता. तीन) बंद होत्या.

उस्मानाबाद, कळंब, भूम, परंडा, लोहारा येथे महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, सकाळी नऊनंतर जिल्ह्यातील एसटी बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. लोहारा, उमरगा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात तीन ठिकाणी बसवर दगडफेकीचे प्रकार घडले. 

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील बससेवा बंद करण्यात आली आहे. उस्मानाबाद शहरातील दुकाने बंद होती. बसस्थानकावरून एकही बस सोडण्यात आली नाही. सर्व बस आगारात लावण्यात आल्या होत्या. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवाय पोलिसांची गस्तही सुरू होती. शहरातील शाळाही सोडून देण्यात आल्या. भीमा- कोरेगाव व परिसरातील दंगलखोरांवर कठारे कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शहरातील विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. दुपारी बाराच्या सुमारास शहरातील दलित समाजातील नागरिकांनी शहरातून फेरी काढून निषेध केला. उमरगा तालुक्यात दोन बसवर तर आळणीजवळ (ता. उस्मानाबाद) एका बसवर दगडफेक करून नुकसान करण्यात आले.

परंडा, भूम, वाशी, कळंब, लोहारा या तालुका ठिकाणीही कडकडीत बंद पाळण्यात आला. लोहारा व उमरगा येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तुळजापूर शहरात सकाळी साडेअकरानंतर तरुणांनी फेरी काढून बंदचे आवाहन केले. नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथेही बंद पाळण्यात आला.

Web Title: Marathi news Osmanabad news bandh in Osmanabad