संस्कृती रक्षणाच्या नावे प्रतिसेन्सॉर बोर्ड नको - रवी जाधव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

जे. जे. स्कूल ऑफ आर्टसचा विद्यार्थी असल्यामुळे मी निर्माण करत असलेल्या कलाकृतींमध्ये अश्‍लीलता नाही, तर कलात्मकता आहे, याची खात्री बाळगा. न्यूड मॉडेल हे कला क्षेत्रातील वास्तव असल्यामुळे या संज्ञेकडे साशंकतेने पाहणे हे त्या कलाकृतीवर अन्याय करणारे आहे. "न्यूड'विषयीचे धुके लवकरच निवळेल. 
- रवी जाधव 

पुणे - ""ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करताना दिग्दर्शक-निर्मात्यांनी पूर्ण अभ्यास करून पुराव्यांनिशी, वादाला प्रतिवाद करण्याची तयारी ठेवून काम केले पाहिजे; मात्र "चित्रपटांमध्ये काय असावे किंवा काय नसावे' हे ठरविण्यासाठी आपल्याकडे सेन्सॉर बोर्ड असताना संस्कृती रक्षणाच्या नावाखाली प्रतिसेन्सॉर बोर्ड निर्माण होऊ नये,'' असे स्पष्ट मत दिग्दर्शक रवी जाधव यांनी व्यक्त केले. 

जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित "शोध मराठी मनाचा' या जागतिक संमेलनात जाधव यांच्याशी अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांनी संवाद साधला. वैयक्तिक आयुष्यापासून चित्रपट सृष्टीतील पदार्पण, विविध चित्रपटांच्या दिग्दर्शनाचा अनुभव, त्यात येणारी आव्हाने आणि एकूणच कलेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन या सगळ्यांशी संबंधित विविध प्रश्नांना उत्तरे देताना जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन किंवा निर्मिती करणे ही सोपी गोष्टी नाही. त्या पायरीपर्यंत जात असताना दिग्दर्शक-निर्मात्याला एक प्रकारची प्रगल्भता प्राप्त झालेली असते, असे सांगून जाधव म्हणाले, ""माझे वडील गिरणी कामगार होते. त्यामुळे माझीही वाटचाल असेच काहीसे काम करण्याकडे होती; मात्र स्वतःविषयी विचार करताना मला काहीतरी वेगळे सांगायचे आहे, हे लक्षात आले आणि त्यातून मी कला क्षेत्राकडे वळलो. सुरवातीला जाहिरात क्षेत्रात काम करू लागलो. हळूहळू स्क्रिप्ट रायटिंगकडे वळलो. त्या वेळी कामाच्या निमित्ताने बराच काळ परदेशात असताना मला तुटलेपण जाणवायचे. त्या वेळी मी अनेक मराठी पुस्तके बरोबर घेऊन जायचो. त्या वाचनातून मला आपली संस्कृती, कला, साहित्य याविषयी आकर्षण वाटायला लागले.'' "नटरंग', "बालक-पालक' या चित्रपटांचे अनुभवही त्यांनी सांगितले. 

Web Title: pune news ravi jadhav Censor board