दुबईच्या कलाकारांचे 'आमदार सौभाग्यवती' पुण्यात होणार 

Dubai Amdar Soubhagyawati drama
Dubai Amdar Soubhagyawati drama

नूतन वर्षाच्या आगमनासोबत मराठी नाट्य क्षेत्रात पहिल्यांदाच काहीतरी आगळे-वेगळे घडणार आहे आणि याचा आनंद पुणेकरांच्या पदरी पडणार आहे. 

आजतागायत व्यावसायिक नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने नावाजलेल्या नाट्य संस्थांनी आपल्या नाटकांचे प्रयोग दिग्गज कलाकारांना घेऊन दुबईत सादर केले; पण आता इतिहासात प्रथमच हा प्रवाह उलट्या दिशेने जाणार आहे. दुबईमधील 'सक्षम निर्मिती' संस्थेचे कलाकार 'आमदार सौभाग्यवती' हे अत्यंत प्रभावी आणि तितकेच संवेदनशील असे रा. रं. बोराडे यांच्या कादंबरीवर आधारित आणि श्रीनिवास जोशी लिखित महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करणारे नाटक घेऊन पुणेकरांच्या सेवेस हजर होत आहेत. 

29 एप्रिल, 1991 मध्ये 'रंगालय' संस्थेतर्फे टिळक स्मारक मंदिर येथे या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. ज्योती चांदेकर आणि प्रशांत सुभेदार यांच्या त्यात मुख्य भूमिका होत्या. महाराष्ट्राच्या राजकारणाचा तळ ढवळून काढणारे आणि आज तब्बल 25 वर्षांनंतरही तितक्‍याच तीव्रतेने मनाला भिडणारे हे नाटक.

राजकारण हा विषय आपल्याकडे जरी नित्याचाच असला, तरीही प्रत्यक्षात एखाद्या राजकारण्याच्या घरात काय घडत असेल, याचे काहीसे भेदक असे चित्रण या नाटकातून मांडले आहे. राजकारणात साम-दाम-दंड-भेद या उक्ती कशाप्रकारे प्रत्यक्षात आणल्या जातात, याचे विदारक दर्शनही या नाटकातून होते. सत्तेची हाव, त्यापायी मांडले जाणारे खेळ आणि उध्वस्त होणारी कुटुंबे यावर सूचक भाष्य करणारे आणि त्याचसाठी न चुकविता येणारे असे हे नाटक. 

दुबई, शारजामध्ये झालेल्या प्रयोगास मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता पुणेकरांसारख्या रसिक आणि चोखंदळ प्रेक्षकांसमोर हे नाटक सादर करण्याचा विडा उचलला आहे दिग्दर्शिका सुषमा शिंदे यांनी व 'श्रींची इच्छा' नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा विजय जोशी यांनी. 

शुभारंभाचा प्रयोग अण्णाभाऊ साठे रंगमंदिर येथे शुक्रवार, 27 जानेवारी रोजी रात्री 9.30 वाजता होणार आहे. याच नाटकाचा दुसरा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर येथे शनिवार, 28 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता आहे. तुर्तास नाटकाचे दोनच प्रयोग होणार आहेत. 

(लेख सौजन्यः आखाती मराठी संकेतस्थळ)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com