esakal | एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियात होणार मराठी संमेलन!

बोलून बातमी शोधा

Akhil Australia Marathi Sammelan 2019 in Liverpool
एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियात होणार मराठी संमेलन!
sakal_logo
By
सुनील बारभाई

मराठी असोसिएशन सिडनी इनकॉर्पोरेटेड (MASI) ही एक नॉन-प्रॉफिट ऑर्गनायझेशन  संस्था आहे जी भारतातून ऑस्ट्रेलियामध्ये न्यू साऊथ वेल्स आणि एसीटी या प्रांतात स्थायिक झालेल्या मराठी संस्कृतीत जन्मलेल्या लोकांनी ३० वर्षांपूर्वी स्थापन केली.

मूळ उद्देश हाच की इथे ऑस्ट्रेलियातसुद्धा ही संस्कृती जपावी, जोपासावी तसेच वृद्धिंगत करावी जेणेकरून पुढील येणाऱ्या पिढयांना हाच वारसा आम्ही देऊ शकू व मराठी इतिहासाशी, भाषेशी, कलेशी, वाङ्मयाशी तसेच मराठी पाककलेशी त्यांची नाळ जोडू शकू. संगीत, नृत्य, नाटक, वाङ्मय इत्यादी विविध कार्यक्रमाद्वारे हा सांस्कृतिक वारसा MASI ने अनेक वर्षे अविश्रांत सुरु ठेवला आहे. 

हे झाले न्यू साऊथ वेस्ल व एसीटी पुरते. परंतु संपूर्ण ऑस्ट्रेलियातील मराठी लोकांना एकत्र आणण्यासाठी दर तीन वर्षांनी एक मोठे अधिवेशन भरवले जाते. उद्देश हाच की संपूर्ण ऑस्ट्रेलियामधील मराठी लोकांनी आपली संस्कृती साजरी करण्यासाठी एकत्र यावं, त्यांनी गाठी-भेटी व नवीन परिचय करावेत तसेच विचारांच्या आदान -प्रदानांद्वारे मराठी संस्कृतीची अशीच पुढे वाटचाल करत राहावं. 

MASI च्या छत्राखाली ऑस्ट्रेलियातले पुढचे अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन होत आहे सिडनी येथे १९, २० आणि २१ एप्रिल २०१९ रोजी. अडीच दिवसांच्या या कार्यक्रमात भारतातल्या नामांकित व्यक्ती व कलाकार तसेच इथले स्थानिक कलाकार संगीत, नृत्य, नाटकं, प्रात्यक्षिकं, चर्चासत्र इत्यादींद्वारे रसिकांना सांस्कृतिक व वैचारिक पातळीवर एक वेगळा अनुभव देणार आहेत. 

दीड हजारांहून जास्त मराठी लोकांचा सहभाग असलेले हे ऑस्ट्रेलियातील आतापर्यंतचे सर्वांत मोठे मराठी अधिवेशन आहे. 

ऑस्ट्रेलियातील सर्व राज्यांमधील मराठी माणसांनी एकत्र येऊन मराठी भाषा आणि मराठी संस्कृती जपावी तसेच वृद्धिंगत करावी हा संमेलनाचा मुख्य उद्देश. कार्यक्रम सादर करण्यासाठी भारतातून येणारे नामवंत कलाकार व त्याचबरोबर स्थानिक कलाकार आपला कलाविष्कार नृत्य, नाट्य, गायन, वादन अशा विविध माध्यमातून सादर करणार आहेत. 

मुख्य कार्यक्रमाच्या संयोजनासाठी व त्याआधीची निरनिराळ्या आघाडीवरील तयारीसाठी एक समितीही नेमली आहे. दर्जेदार कार्यक्रम, सुसंबध्द व्यवस्थापन, उत्तम भोजन, सुसूत्रता, सादरीकरणाचा विषय व मांडणी याच्या चोखंदळ निवडीसाठी सध्या जय्यत तयारी सुरु आहे. 

अशा या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाला तुम्हाला आमचे आग्रहाचे आमंत्रण! 

कार्यक्रमाचे स्थळ : Whitlam Leisure Centre, Liverpool, 90 Memorial Ave, Liverpool NSW 2170; Australia.