आणखी एक नवा बांगलादेश जन्म घेण्याच्या वाटेवर...! (सुधीर काळे)

सुधीर काळे
Wednesday, 13 March 2019

ही PTM चळवळ पश्तूनी लोकांविरुद्ध होणार्‍या अत्याचारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी 'मंजूर पश्तीन' या मानवाधिकारासाठी लढणार्‍या कार्यकर्त्याने सुरू केली होती. पश्तून समाज हा संख्येने पाकिस्तानमधील दुसर्‍या क्रमांकाचा वांशिक गट आहे. हा समाज मुख्यत्वे पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सरहद्दीवरील वायव्य भागात वसलेला आहे.

मूळ लेखक : ताहा सिद्दीकी; मराठी अनुवाद : सुधीर काळे (sbkay@hotmail.com)

आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी पाकिस्तानच्या दक्षिणेला असलेल्या कराची बंदरात नकीबुल्ला मेहसूद नावाच्या एका तरुणाला एका बेगडी चकमकीत गोळीबाराने ठार मारण्यात आले. सुरवातीला पाकिस्तानी तालीबानचा तो एक कट्टर सभासद असल्याचा व दहशतवाद्यांच्या छुप्या जागेवर पोलिसांनी केलेल्या एका छाप्यात तो मारला गेल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला.

पण त्याच्या कुटुंबियांकडून, मित्रांकडून व काही मानवी हक्काच्या समर्थक संघटनांकडून 'तो एक निरपराध दुकानदार व एक होतकरू मॉडेलिंग करू पाहणारा तरुण होता' असे सांगत तो दावा फेटाळून टाकण्यात आला! मग सरकारकडून चौकशीचे आदेश देण्यात आले. पोलिसांद्वारे नेमल्या गेलेल्या चौकशी-समितीला कुठल्याही दहशतवादी हालचालींचा किंवा कुठल्याही गोळीबाराचा पुरावा मिळाला नाही व शेवटी नकीबुल्ला मेहसूदचा मृत्यू एका 'बेगडी चकमकी'तून झाल्याचा निष्कर्ष या चौकशी-समितीने काढला. बेगडी चकमकीतून नको असलेल्या नेत्यांना ठार मारण्याची पद्धत पाकिस्तानी सुरक्षादले वारंवार वापरतात, असा आरोप त्यांच्यावर नेहमीच केला जातो. मग जे सुरक्षा अधिकारी या हत्येत गुंतले असल्याचा संशय होता त्यांच्यावर खटला चालू करण्यात आला.

पूर्वी या प्रकारच्या अवैध हत्येच्या आरोपांकडे सत्ताधिकार्‍यांकडून नियमितपणे दुर्लक्षच केले जाई. शिक्षेच्या कुठल्याही भीतीशिवाय हवे तसे वागण्याची सुरक्षा अधिकार्‍यांना जणू खुली मुभाच दिली गेलेली होती. मग मेहसूदच्या हत्येची चौकशी अशी वेगळ्या पद्धतीने करण्यामागचे कारण काय असावे? ते कारण होते, मेहसूदचे वझीरिस्तानमधील जन्मस्थान असलेले गाव 'माकिन' येथे सुरू झालेली व आतापर्यंत कुणाला फारशी माहीत नसलेली 'पश्तून तहफ्फुज चळवळ' (PTM)! 

ही PTM चळवळ पश्तूनी लोकांविरुद्ध होणार्‍या अत्याचारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी 'मंजूर पश्तीन' या मानवाधिकारासाठी लढणार्‍या कार्यकर्त्याने सुरू केली होती. पश्तून समाज हा संख्येने पाकिस्तानमधील दुसर्‍या क्रमांकाचा वांशिक गट आहे. हा समाज मुख्यत्वे पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सरहद्दीवरील वायव्य भागात वसलेला आहे.

जवळ-जवळ गेली वीस वर्षे तथाकथित 'दहशतवादाविरोधी युद्धा'च्या झळा मुख्यत्वे याच समाजाने सोसल्या आहेत. ९/११ च्या हल्ल्यानंतर जेव्हा अमेरिकेने आपल्या मित्रराष्ट्रांसह अफगाणिस्तानवर आक्रमण केले तेव्हा तेथे कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांनी पाकिस्तानची सरहद्द ओलांडून पश्तून बहुसंख्य असलेल्या या भागात आश्रय घेतला. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी लष्कराने हा भाग दहशतवाद्यांपासून मुक्त करण्यासाठी इथे मोठी मोहीमच सुरू केली.

पण येथील दहशतवादी हालचालींवर बंदी आणण्याच्या उद्देशांच्या जागी पाकिस्तानी लष्कराने क्रमाक्रमाने येथील निरपधारी जनतेचा बळी घेण्यास सुरवात केली. पश्तून समाज स्वत:च दहशतवादाचा बळी पडलेला समाज असूनही पूर्ण पाकिस्तानमध्ये पसरलेल्या या समाजालाच साचेबंदपणे दहशतवादी ठरवण्यात आले.

न्याय्य मागणी :
कराचीमध्ये मेहसूदला ठार मारण्यात आल्यावर मंजूर पश्तीनने वझीरिस्तानपासून इस्लामाबादपर्यंत एक मोर्चा काढण्याबाबत घोषणा केली. खून करण्यात आलेल्या मेहसूदला न्याय मिळवून देण्यासाठीच नव्हे तर पाकिस्तानातील सापत्नभावाने पिडलेल्या पश्तूनांना न्याय मिळवून देण्यासाठी निघालेल्या या मोर्चात हजारोंनी लोक सामील झाले.

या मोर्चाचे अतिशय वेगाने नागरी हक्कांसाठीच्या एका राष्ट्रव्यापी आंदोलनात रूपांतर झाले आणि त्यातूनच PTM चा जन्म झाला. पूर्ण पाकिस्तानात ठिकठिकाणी झालेल्या विशाल सभांमध्ये पश्तीन व त्यांच्या समर्थकांनी दहशतवादाचा पूर्ण विनाश करण्यात आलेल्या अपयशाबद्दल पाकिस्तानी लष्कराविरुद्ध अनेक मागण्यातून आवाज उठविला आणि पाकिस्तानी अधिकार्‍यांना खरोखरच अशा दहशतवाद्यांचा नि:पात तरी करायचा होता काय? असे प्रश्न उपस्थित केले.

“हा जो दहशतवाद फोफावला आहे त्याच्या मागे लष्करी गणवेशच ('वर्दी'च) आहे” हा लष्कर व दहशतवाद्यांमधील संगनमत दर्शविणारा नारा खूपच लोकप्रिय झाला. PTM ने सर्व अवैध हत्यांची स्वतंत्रपणे चौकशी करण्याच्याही मागणीसह नागरिकांना जबरदस्तीने 'नाहीशा' केल्या जाणार्‍या घटनांवर पूर्णपणे बंदी घालण्याचीही मागणी केली. पाकिस्तानी लष्कराची 'अडचण वाटणार्‍या' लोकांचे अपहरण करण्याची पद्धत तशी जुनीच आहे. यापुढे जाऊन पश्तीन आणि त्यांच्या समर्थकांनी पाकिस्तान सरकारवर जनजाती क्षेत्रातील लोकांसाठी वापरण्यात येणार्‍या मानवाधिकारांविरुद्ध असलेल्या कठोर कायद्यांमध्ये अमुलाग्र बदल करण्याबाबत मागणी केली. उदा. एका व्यक्तीने केलेल्या गुन्ह्याबद्दल संपूर्ण कुटुंबाला किंवा संपूर्ण गावाला किंवा संपूर्ण जनजातीला शिक्षा देण्याची पद्धत.

या वाढत्या व विशाल होत चाललेल्या चळवळीद्वारे व्यक्त झालेल्या खर्‍याखुर्‍या तक्रारींकडे लक्ष देऊन त्या तक्रारींचे निवारण करण्याऐवजी पाकिस्तानी सरकारने या चळवळीवर कठोर कारवाई करण्यास सुरवात केली. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी या चळवळीबद्दल व त्यांच्या सभांबद्दल बातम्या देणे बंद केले. या चळवळीमध्ये भाग घेणार्‍या कार्यकर्त्यांना, समर्थकांना व नेते मंडळींना वारंवार अटकेत टाकण्यात येऊ लागले. या नेत्यांना ज्या भागात सभा घ्यावयाच्या असत तिथे जाण्यास त्यांना प्रतिबंध करण्यात येऊ लागला. अलीकडे PTM च्या काही नेत्यांना पाकिस्तानमधून परदेशी जाण्यावरसुद्धा बंदी घालण्यात आली.

एका जाहीर वार्तालापात पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने PTM च्या नेत्यांवर पाकिस्तानशी शतृत्व असणार्‍या राष्ट्रांच्या मदतीने पाकविरोधी कृत्ये केल्याचा आरोप केला. ही युक्ती पाकिस्तानी लष्कर आपल्या विरोधकांना बदनाम करण्यासाठी नेहमीच वापरत असते. पण पाकिस्तानी सरकारचे या चळवळीला आटोक्यात आणून तिचा आवाज बंद करण्याचे सर्व प्रयत्न सरकारच्याच अंगलट आलेले आहेत. या समाजाच्या मुद्दाम केलेल्या छळवणुकीमुळे PTM ची लोकप्रियता वाढली आहे व तिच्या सभांना सातत्याने जास्त-जास्त गर्दी होऊ लागली आहे.

जरी या चळवळीने आपली चळवळ पूर्णपणे शांतीच्या मार्गाने चालवत जात असल्याचा दावा केलेला असला तरी या चळवळीला दडपून टाकण्यासाठी सातत्याने वापरल्या जाणार्‍या कठोर कारवायांमुळे एखादे वेळी ही शांतीपूर्ण चळवळ एकाएकी आटोक्याबाहेर जाईल, अशी भीती वाटू लागली आहे. अशा घटना या पूर्वीही पाकिस्तानात झालेल्या आहेत.

पूर्वी केलेल्या चुकांतून पाकिस्तानी नेतृत्व काही शिकत आहे? :
पूर्वी पूर्व पाकिस्तानमधील जनतेने अशाच मानवाधिकारांसाठी पुकारलेल्या चळवळींचा शेवट पाकिस्तानकडून स्वातंत्र्याच्या चळवळीत झाले व त्याचा शेवट १९७१ साली बांग्लादेशाच्या निर्मितीत झाला.

१९६० च्या दशकात पूर्व पाकिस्तानमध्ये राहणारी बंगाली जनता हा पाकिस्तानी जनतेमधील सर्वात मोठा वांशिक गट होता. या बंगाली जनतेला ज. अयूब खान यांच्या सरकारकडून आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची जाणीव झाली. त्यांच्या तक्रारींकडे लक्ष देऊन त्यांच्यावरील होत असलेल्या तक्रारींमधून व्यक्त होणारा अन्याय दूर करण्याऐवजी लष्कराने या दुखावल्या गेलेल्या जनतेविरुद्ध हिंसक मोहीम सुरू केली. यामुळे बंगाली जनतेने सशस्त्र उठाव केला व त्याचा अंतिम परिणाम पाकिस्तानच्या विभाजनात झाला.

पाकिस्तानचा पश्तून समाज जागृत होत आहे.... :
आता बरोबर ५० वर्षांनंतर असे दिसत आहे की पाकिस्तानी उच्चभ्रू नेतृत्वाने इतिहासाकडून योग्य तो बोध घेतलेला नाही आहे आणि हे उच्चभ्रू नेतृत्व पूर्वीच्या अतिशय दु:खदायक असलेल्या, रक्त सांडणार्‍या व पुन्हा भरून न आणता येणारे परिणाम देशावर करणार्‍या १९७० साली केलेल्या त्याच चुका पुन्हा करत आहे.

आज PTM संघटना आपल्या चळवळीचे पहिले वर्ष पूर्ण करत असताना पाकिस्तानी मुलकी व लष्करी नेतृत्व पश्तून समाजाच्या रास्त क्षोभांना नीट समजून घेऊन त्यांच्या पाकिस्तानी घटनेनुसार योग्य असलेल्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत व केवळ त्यांनी त्यांच्या मूलभूत अधिकारांसाठी केलेल्या चळवळीबद्दल त्यांचा छळ करणे ताबडतोब थांबविले पाहिजे.

हे जर ताबडतोब झाले नाही तर आधीच विभाजन झालेल्या देशाच्या आणखी एका विभाजनाच्या कामात एखाद्या उत्प्रेरकाची (catalyst) भूमिका निभावेल आणि त्यातून पाकिस्तान आणखी एका राष्ट्रीय अनर्थाकडे सरकू लागेल.

 

मूळ लेखकाबद्दल....
ताहा सिद्दीकी हे एक पारितोषिक-विजेते पाकिस्तानी लेखक असून ते सध्या हद्दपार असून फ्रान्समध्ये राजकीय आश्रय घेऊन राहत आहेत.

 

 

taha siddiqi

 

 

​Original English article can be read on this link:
https://www.aljazeera.com/indepth/opinion/ptm-pakistan-bangladesh-making...

टीप:
पाकिस्तानमधील सर्वात मोठा वांशिक गट पंजाबी असून त्यांची संख्या पाकिस्तानी लोकसंख्येच्या ४५ टक्के आहे. ते पंजाबी भाषा बोलतात व त्यांचे वास्तव्य पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहे. या प्रांताची राजधानी लाहोर असून पंजाब हा पाकिस्तानमधील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला प्रांत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another new Bangladeshi is going to be born Article