चीन नुसता ड्रॅगनचा देश नव्हे; तर...

अपूर्वा कुलकर्णी
Friday, 23 August 2019

एक वर्षापूर्वी मला कुणी विचारलं असतं की चीन म्हणजे काय तर मी सांगितलं असतं की हाच तो ड्रॅगनचा देश, पूर्व आशियाचा केंद्रबिंदू, वस्तूंच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेला आणि जगप्रसिद्ध कुंग फूचा देश. या सगळ्या गोष्टी खरं तरं नावालाच आहेत. या देशाचा खरा आत्मा त्याच्या बाहेरच्या चित्रापेक्षा फार फार वेगळा आहे. 

एक वर्षापूर्वी मला कुणी विचारलं असतं की चीन म्हणजे काय तर मी सांगितलं असतं की हाच तो ड्रॅगनचा देश, पूर्व आशियाचा केंद्रबिंदू, वस्तूंच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेला आणि जगप्रसिद्ध कुंग फूचा देश. या सगळ्या गोष्टी खरं तरं नावालाच आहेत. या देशाचा खरा आत्मा त्याच्या बाहेरच्या चित्रापेक्षा फार फार वेगळा आहे. 

आज जेव्हा मी चिन्हुआमधील लुथीयन या गावात बसून हे सारं लिहतीये तेव्हा माझं या देशाबद्दल पूर्ण वेगळं मत आहे. कारण आज कोणत्याही वर्तमानपत्र, चित्रपट किंवा टिव्ही शोवर माझं मत अवलंबून नाहीये, ते केवळ माझ्या अनुभवातून आलं आहे. 

Image may contain: 1 person, smiling, shoes and outdoor

मी एक आगळ्या वेगळ्या प्रकल्पाचा भाग आहे ज्याचं नाव आहे चिन्हुआ होम्स. चिन्हुआ होम्स हा प्रकल्प चिन्हुआ महानगरपालिकेतर्फे चालवला जातो.  चीनमधील टुरिझम आणि इतर देशांत बरोबरील मैत्री वाढवण्यासाठी या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. दरवर्षी देश-विदेशातून 40जण या प्रकल्पात सहभागी होतात. लीथन तळ्याच्या काठाशी आणि जिंवर डोंगररांगांमध्ये वसलेल्या एका सुंदरशा लुथीयन गावात या वर्षी आम्हाला राहण्याची संधी मिळाली.

Image may contain: sky, mountain, tree, outdoor, nature and water

 चीनमध्ये येण्यापूर्वी नक्की या प्रकल्पातून मला काय हवय याची सांगड मी घालू शकत नव्हते. सध्या मी चायनीज भाषा शिकते म्हणून मी फक्त भाषेचा अभ्यास करणं हेच माझे प्राधान्य ठेवलं. मात्र या देशात पाऊल ठेवल्यावर, या गावात राहिल्यावर आता मी भाषेबरोबरच अनेक गोष्टींमध्ये समृद्ध झाले आहे.

 तसं बघायला गेलं तर माझ्या प्रवासाची सुरवातच थोडीशी भीतीदायक झाली. लेकिमा वादळाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही चिन्हुआमध्ये प्रवेश केला पण, त्याआधी चिन्हुआपर्यंत पोहोचण्याची कसरत करायची म्हणजे अगदी जीवावर आलं होतं मुंबईपासून सुरू केलेला प्रवास सिंगापूरपर्यंत येऊन थांबला आणि तेव्हा कळलं की चीनमध्ये वादळ आले. 24 तासांहून जास्त काळ सिंगापूरच्या विमानतळावरच घालवायला लागला आणि त्यानंतर आम्ही पुढील प्रवासाला लागलो आणि चिन्हुआमध्ये पोहोचलो. लुथीयन गावालासुद्धा वादळाचा तडाखा बसला होता मात्र 24 तासाच्या आत सरकारने जनजीवन रुळावर आणले आणि अत्यंत आनंदाने त्यांनी आमचे स्वागत केले.  लुथीयानमधील स्वच्छता पाहून असे वाटतही नव्हते की काही तासांपूर्वी त्या गावाला वादळाचा तडाखा बसला होता. 

या गावातील आमचे दिवस दोन भागांमध्ये वाटले गेले आहेत. त्यातील अर्धे दिवस या गावातील सौंदर्याचा आम्ही आस्वाद घेणार तर अर्धे दिवस या गावाच्या टुरिझम आणि अर्थव्यवस्थेला उपयोगी पडतील अशा गोष्टी करण्यासाठी देणार आहोत. आम्हा 40 जणांचे चार गटांमध्ये विभाजन केले आहे. आमच्या आवडीनिवडींनुसार आम्ही पब्लिसिटी, कल्चरल टुरिझम, प्रॉडक्ट डिझायनिंग आणि पेंटिंग अशा गटांमध्ये विभागलो गेलो आहोत. प्रत्येक ग्रुपला एक ध्येय ठरवून दिले आहे आणि 14 दिवसांमध्ये ते प्रत्येक टीमला पूर्ण करायचे आहे.

Image may contain: people sitting, table and food

उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गावातील व्यक्तींना कोणत्या नवनवीन वस्तू विकता येतील याबाबत नव्या युक्ती शोधण्याचं काम प्रॉडक्ट डिझायनिंग गटाकडे देण्यात आलं आहे तर पब्लिसिटी गटाकडे चिन्हुआच्या सौंदर्याबाबत आणि चिन्हुआच्या इतिहासाबाबत वेगवेगळ्या भाषांमध्ये लेख लिहून ते जगभरात प्रसिद्ध करण्याचे काम देण्यात आले आहे. पेंटिंग गट चिन्हुआबद्दल आर्ट तयार करण्यावर लक्ष देईल तर कल्चरल गट जगभरातील टुरिस्टला चीनकडे कसे आकर्षित करता येईल यावर काम करेल. या प्रकल्पाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या प्रकल्पाचे उद्दिष्ट ग्लोबल असलं तरी या प्रकल्पाचा आत्मा हा चायनीज आहे. आम्हाला शिकविण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीत 100% चीनच्या परंपरेला महत्त्व देण्यात आले आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट म्हणजे फक्त ही जागा प्रसिद्ध करणे नाही तर या जागेचा इतिहास, कला आणि परंपरा यांनीही प्रसिद्ध करणे आहे. चिन्हुआ या गावाला खूप मोठा इतिहास लाभला आहे. चिन्हुआ हा शब्द दोन चायनीज शब्दांमधून तयार होतो. चिन म्हणजे सोनेरी आणि हुवा म्हणजे पाकळ्या. जगभरात प्रसिद्ध असलेला ऊचौ च्यूयान ग्रीन टीसुद्धा चिन्हुआमध्ये तयार होतो. 

Image may contain: people sitting and coffee cup

 हा होमस्टे प्रोजेक्ट अनेक कारणांसाठी अत्यंत उत्कृष्ट आहे एक भारतीय म्हणून आपण या प्रकल्पातून अनेक गोष्टी शिकून आपल्या घरी या गोष्टी कशा वापरता येतील किंवा यांचा कसा उपयोग करून घेता येईल याचा विचार करू शकतो. या प्रकल्पामुळे स्थानिक सरकार, परराष्ट्र मंत्रालय आणि टुरिझम ऑफिस एकत्र काम करतात. या तीन गोष्टींची सांगड उत्तम रित्या बसल्यामुळेच हा प्रोजेक्ट एवढा यशस्वी होऊ शकतो. हा प्रकल्प नेहमी गावागावात राबवला जातो आणि कधीच शहरात राबवला जात नाही याचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे गावाची अर्थव्यवस्था सुदृढ करणे. आम्ही ज्या घरांमध्ये, ज्या हॉटेलमध्ये राहतो त्यांना सरकारकडून मोबदला दिला जातो. आम्हाला जे अन्न पुरवलं जातं त्याचेही पैसे सरकारकडूनच मिळतात. त्यामुळे गावकऱ्यांना पैसे कमावण्याचा एक पर्याय उपलब्ध झाला आहे.

Image may contain: mountain, sky, cloud, outdoor and nature

गावातीलच नॉर्मल विद्यापीठातील विद्यार्थी आमच्याबरोबर सहकारी म्हणून दिले आहेत. ते आम्हाला चायनीज भाषा शिकवतात तर आम्ही त्यांना इंग्रजी भाषा शिकवतो. या कामाबद्दल त्यांना शाळेत गुणही दिले जातात. हे विद्यार्थ्यांना विविध देशांमधील लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळते. हे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या शालेय प्रगतीसाठी अत्यंत उपयोगी आहे.
 चीनची अर्थव्यवस्था, चीनचे सरकार बाहेरून कसेही वाटत असले तरी देशातील माणसे अत्यंत दयाळू आणि मायाळू आहेत. आम्हाला प्रत्येक रीतीने सोयीस्कर वाटावे हाच त्यांचा हेतू असतो. त्यांना त्यांच्या परंपरेबद्दल आणि इतिहासाबद्दल प्रचंड अभिमान आहे आणि हीच गोष्ट गेल्या काही दिवसात मी शिकली आहे आणि माझ्याबरोबर पुन्हा पुण्याला घेऊन येणार आहे आपल्या पूर्वजांच्या वास्तू आणि संग्रहालय जपण्यासाठी ते अत्यंत आर्ततेने प्रयत्न करतात हे पाहून खूप छान वाटते आणि कोणतेही पाश्चिमात्य संस्कृती न अंगिकारता आपलीच परंपरा पुढे नेण्यासाठी ते पोटतिडकीने प्रयत्न करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Apoorva Kulkarni wirtes about her experience in China