अनुभव सातासमुद्रापारचे... : मानसिक कणखरतेची कसोटी

Aarti-Dadape
Aarti-Dadape

कुवेत हा तेलाने समृद्ध असा हा आखाती देश आहे. देशाचे क्षेत्रफळ अंदाजे पुणे जिल्ह्याच्या क्षेत्रफळापेक्षा फक्त २० टक्के अधिक आहे. इथे कोरोनाचा पहिला रूग्ण २४ फेब्रुवारीला मिळाला. २५,२६ फेब्रुवारीला या देशाचा स्वातंत्र्य दिनाचा उत्सव होता. तरीही कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता सरकारने स्वातंत्र्य दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द केले. अंशतः लॉकडाउन १२ मार्च पासून लागू केला. येथील जनतेच्या आरोग्यासाठी सरकारने विद्युत वेगाने हालचाली करून बरेच निर्बंध लागू केले आहेत.

कोरोना रुगांची व्यवस्था शहरापासून दूरच्या भागात केली आहे. मोठे मॉल, हॉटेल, शाळा, महाविद्यालये, व्यायामशाळा बंद आहेत. जीवनावश्यक वस्तूंची छोटी दुकाने व अगदी छोटी भाजीची दुकाने , छोटी उपहारगृहे सकाळी काही वेळ उघडी असतात. उपहारगृहांमध्ये फक्त पार्सल मिळते. एक मध्यम आकाराचे सुपर मार्केट इथे प्रत्येक भागात आहे, त्याला इथल्या भाषेत जमिया म्हणतात.

तिथे फक्त त्या भागात राहणाऱ्या लोकांनाच खरेदी करण्यासाठी परवानगी आहे. लोकांची गर्दी होऊ नये म्हणून ही दक्षता. जमियामध्ये प्रवेश करताना तुमचे ओळखपत्र दाखवावे लागते. संपूर्ण देशात संचारबंदीही लागू आहे. संचारबंदीच्या काळात कुणीही बाहेर रस्त्यावर दिसला की पोलिस त्याला लगेच अटक करतात. संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांना ३ वर्षे तुरुंगवास व १०,००० कुवेती दिनार दंड ( अंदाजे २४ लाख रुपये) आहे. 

कुठल्याही दुकानात प्रवेश करताना ‘नो मास्क, नो एन्ट्री’, असा नियम आहे. भारतात जाण्यासाठी विमानसेवा सात मार्च पासून बंद आहे. अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्व कंपनी कामगारांना सुटी दिली आहे. जिथे शक्य आहे त्या कंपन्यांनी घरूनच काम सुरू केले आहे.  कोणत्याही दुकानदाराने परिस्थितीचा गैरफायदा घेऊन वस्तूंच्या किमती वाढवल्या तर ताबडतोब कारवाई, दंड व दुकान बंद. तसेच  दुकानाच्या आतमध्ये  जर मास्क, हातमोजे व  सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन केले नाही, तर लगेच दुकानाला कुलूप ठोकले जाते. 

कुवेतमध्ये आतापर्यंत साधारण २४०० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आणि १४ जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळेच मृत्यूदर नियंत्रणात आहे. येथे कायद्याची अंमलबजावणी खूप कडक आहे. मुस्लीम राष्ट्र असूनही येथील सर्व मशिदी बंद आहेत. दैनंदिन व्यवहारात तशी कोणतीच अडचण नाही. पण परदेशात असल्याने भारतातील घरच्या लोकांची, मुलांची तीव्र आठवण येते. हा प्रकार कधी संपणार याबाबतच्या अनिश्चिततेमुळे जीवाची घालमेल होते. आम्ही इंटरनेट, टीव्ही, पुस्तक वाचन, देवाची प्रार्थना, दूरध्वनीवरून संभाषण, घरामध्येच व्यायाम यात वेळ व्यतीत करत आहोत. याकाळात स्वतःची काळजी घेणे व मानसिकदृष्ट्या खंबीर असणे गरजेचे आहे. तरच कोरोनाच्या संकटावर मात करता येईल.
(शब्दांकन - सुरेंद्र पाटसकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com