अनुभव सातासमुद्रापारचे... : कोरोनामुळे काटकसर शिकलो

Dhanashri-Patil
Dhanashri-Patil

सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारने केले आणि नागरिकांसाठी अनेक योजनाही राबविल्या. सरकारच्या आवाहनाला इथली जनता सकारात्मक प्रतिसाद देताना दिसते आणि त्यामुळेच कोरोनाच्या जागतिक संकटातून नक्कीच बाहेर पडू, असा मला विश्‍वास आहे.

मी आणि माझ्या कुटुंबाचे संयुक्त अरब अमिरातीमध्ये गेली दहा वर्षे वास्तव्य असून आमचा दुबईमध्ये ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चा व्यवसाय आहे. कोरोनाचे सावट या देशावर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आले, परंतु इथल्या सरकारने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ते हाताळले. आपण बाहेरच्या देशात राहात आहोत आणि इथले सरकार आपली इतकी काळजी घेत आहे त्यामुळे आपणपण नियम पाळून त्यांना सहकार्य करावे, ही भावना इथल्या भारतीयांमध्ये आहे. त्यामुळे आम्ही फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आजपर्यंत घरामध्येच राहून काळजी घेत आहोत. 

देशातील सर्व शाळा विशेष काळजी म्हणून मार्चच्या पहिल्या आठवड्यात बंद झाल्या. शालेय मुलांचे वार्षिक परीक्षेचे काही पेपर बाकी होते, पण त्या विषयांची वार्षिक सरासरी काढून निकाल देण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला. त्यामुळे त्या दिवसापासून मुले घरातच आहेत. 

इथे संयुक्त अरब अमरातीमध्ये सर्व व्यवहार बंद आहेत आणि लोक घरी राहून काम करीत आहेत. फक्त औषधे आणि रोजच्या लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर जायची परवानगी आहे. रूग्णालयांमध्येही कोणी विनाकारण जाऊ नये, अशी सरकारची सक्त ताकीद आहे. अगदीच कोणाला रूग्णालयात जावे लागले तर दाराच्या बाहेरच रूग्णालयाचे कर्मचारी आलेल्या रूग्णाचा ताप मोजून त्यांना सर्दी, खोकला झालेला नाही ना ? याची पूर्ण खात्री करून घेऊनच त्यांना आत प्रवेश देतात.

कोरोनाने आम्हाला काटकसरीपणा शिकवला. मुलांना गेले कित्येक दिवस जंक फूड मिळाले नाही, त्यामुळे त्यांनादेखील घरात शिजणारे अन्न वाया न घालवता जेवणाची सवय लागली.  लहान मुलांचे विशेष कौतुक असे की पूर्ण एक महिना ते घरामध्ये बंदिस्त आहेत, पण आपल्याला कोरोना होऊ नये म्हणून हे सगळे आहे याची त्यांना जाणीव आहे. त्या वेळेचा सदुपयोग ते त्यांचे छंद जोपासणे, ऑनलाईन अभ्यास, घरातली खेळ असा करीत आहेत. 

खरेदी करून आणलेल्या वस्तूही साबणाच्या पाण्याने धुतल्या जातात. एक गोष्ट आता कळली आहे आणि ती म्हणजे फक्त घरातच राहणे खूप अवघड आहे, पण अशक्‍य नाही. सरकारबरोबरच त्यांना साथ देणाऱ्या नागरिकांचेही अभिनंदन करीत असतानाच या एकजुटीनेच आपण सर्व जण या जागतिक संकटातून नक्कीच बाहेर पडू, असा विश्‍वास वाटतो.
(शब्दांकन - सुनील माळी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com