अनुभव सातासमुद्रापारचे... : मानवतेची वीण घट्ट

Yogita-Patil-Sen
Yogita-Patil-Sen

कोविड विषाणूचा झपाट्यानं प्रादुर्भाव होऊ लागल्यानंतर ब्रिटनच्या जनतेने एकी दाखवत, एकमेकांना मदत करत मानवतेची ज्योत तेवती ठेवली. ‘सी-ई-एफ-एच’चे म्हणजे कम्पॅशन (अनुकंपा), एम्पथी (सहभावना), फ्रेंडलीनेस (मित्रभावना) आणि ह्युमॅनिटी (मानवता) यांचे धागे संसर्गापेक्षा अधिक वेगाने जगभर विणले जातील, असा विश्‍वास आहे.

कोविड-१९ विषाणूची लागण झाल्याची जगातली पहिली घटना डिसेंबर २०१९ मध्ये नोंदली गेली आणि त्यानंतर त्याची माहिती पश्‍चिमेकडच्या देशांपर्यंत पोहोचेपर्यंत हा विषाणू ब्रिटनचं दार ठोठावू लागला होता. मी मूळची खान्देशची आणि आता ब्रिटनमधल्या लॅंकेशायर विद्यापीठात संशोधक-शास्त्रज्ञ या पदावर काम करत आहे.

मी विद्यापीठात असतानाच याविषयीचा पहिला ईमेल जानेवारीच्या अखेरच्या महिन्यात मिळाला होता. तोपर्यंत चीनमध्ये हजारो जण बाधित झाले होते अन कोविड युरोपकडं सरकत होता. आमच्या विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी-कर्मचाऱ्यांना ही माहिती पोहोचवण्याची आठवण आम्हाला करून देण्यात येत होती. इथल्या सुपरमार्केट्‌स, मॉलपर्यंतच्या सर्व ठिकाणांमध्ये बदल जाणवू लागला होता. 

‘मोठ्या संख्येनं जमू नका, कार्यक्रम रद्द करा,'' असे संदेश मार्चच्या सुरवातीला देण्यात येऊ लागले. आम्ही होळी, गुढीपाडव्याचे कार्यक्रम रद्द केले. घरून काम सुरु झाले. दूरशिक्षण सुरू करण्याचा आदेश देण्यात आला. एकमेकांपासून अंतर ठेवण्याचा, स्वच्छता पाळण्याचा, वांरवार हात धुण्याचा संदेश दिला जाऊ लागला. ऑफिसचं काम-मुलांचा अभ्यास- घरकाम ही तारेवरची कसरतच होती. आपण आधीपेक्षा अधिक काम करतो आहोत, असं पालकांना तर आपण अधिक अभ्यास करत आहोत, असं मुलांना वाटू लागलं. आम्ही घरातच पूर्णपणे बंदिस्त झालो. 

काही दिवसांतच एक नवाच प्रश्‍न उभा राहिला. ‘वस्तूंची टंचाई होईल’, या भीतीनं लोकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. ब्रेड, पाश्‍ता, चिकन, टोमॅटो, पीठ या वस्तूंच्या दुकानात ‘माल संपला’चे फलक लागले आहेत. हे बदल फारच वेगाने घडले. विज्ञान कल्पनेवर आधारित चित्रपटांमध्ये आपण पाहतो, तशी परिस्थिती प्रत्यक्षात आम्ही अनुभवू लागलो...! अशा विपरीत परिस्थितीत माणसांच्या वागणुकीत आश्‍चर्य वाटावं असा फरक होत होता. मदत करण्याच्या मानवी वृत्तीचं दर्शन घडू लागलं. टिकून राहण्याची मानसिकता समाजामध्ये दिसू लागली. आपण एकमेकांना मदत केली पाहिजे, ही भावना जागी झाली. कोणतीही भौगोलिक सीमा, वंश, धर्म, संस्कृती यांची बंधनं गळून पडली, याचं कारण हा विषाणू यापैकी काहीच ओळखत नव्हता ! 

अर्थव्यवस्थेवर ताण असतानाही सरकारनं मदत करण्यात मागेपुढं पाहिलेलं नाही. गरज असलेल्यांना मदत करण्यासाठी लाखो जण पुढे आले. माझ्याजवळच्या घराच्या काचेवर आशेचे किरण दाखवण्यासाठी एका मुलानं इंद्रधनुष्य चितारल्याचे मला दिसलं. हळूहळू आता भीतीची जागा आशा आणि सकारात्मकता घेते आहे. निसर्गाशी जवळिक साधण्याची संधी मिळाली आहे. कुटुंबाचे सदस्य एकमेकांना अधिक वेळ आता देऊ लागले आहेत. शेवटी एकच सांगावसं वाटतं... आयुष्य हे सुंदर आहे आणि आपण एकमेकांशी, निसर्गाच्या इतर घटकांशी असलेला सलोखा टिकवून ठेवला तर चांगलं जीवन आपल्यापासून दूर नाही, हेच खरं. 
(शब्दांकन - सुनील माळी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com