हॅलोविनच्या सणावर कोविड-19 चे सावट

अनिल साळुंके, कॅनडा
Saturday, 24 October 2020

हॅलोविन हा दरवर्षी ३१ ऑक्टोबरला साजरा होणारा पाश्चात्य जगातील आबालवृद्धांचा आवडता सण. अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळेच हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ह्या वर्षी मात्र हॅलोविन उत्सवावर कोविड-१९ चे सावट दिसून येते आहे. 

मॉन्ट्रियल - हॅलोविनची तयारी किमान एक महिना आधीपासून सुरु होते. दुकाने, मोठे मॉल्स, सार्वजनिक स्थळे वगैरे हॅलोविनच्या सजावटीच्या वस्तूंने सजायला लागतात. काही फक्त ह्या सणासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य विकणारी, म्हणजे आपल्याकडील दिवाळीच्या फटाक्यांच्या स्टॉलसारखी तात्पुरती दुकाने उघडतात. खरंतर ह्या वस्तूंना सजावटीच्या वस्तू म्हणावे का हा मोठा प्रश्नच आहे कारण जास्तीतजास्त भीतीदायक, ओंगळ आणि अमंगल असलेली वस्तू हॅलोविनसाठी चांगली असे समीकरण असते. ह्या वस्तूंमध्ये वेगवेगळे भीतीदायक पोशाख आणि त्याच्या ऍक्सेसरीज, ऍनिमेटेड कॅरॅक्टर्स, माणसाच्या आणि प्राण्यांच्या हाडांचे चमकणारे, हालचाल करणारे, भीतीदायक आवाज करणारे सापळे आणि कवट्या, शवपेट्या, ग्रेव्हस्टोन्स, वेगवेगळ्या प्रकारची आणि आकारातील उडणारी, टांगून ठेवलेली, कोणी जवळ आल्यावर अचानक हालचाल करून मोठयाने ओरडणारी भुते, हडळी, चेटकिणी इत्यादींचा समावेश होतो. आजकाल पाश्चात्यांच्या समाज जीवनावर योगाने मोठे गारुड केले असल्याने योगासने करणारे सापळे देखील मिळतात. पंपाने हवा भरून फुग्याप्रमाणे फुगवता येणारे ममीज्, स्पायडर्स, झॉम्बीज्, स्कल्स आणि स्केलेटन्स असे विविध प्रकार देखील उपलब्ध आहेत.   

कित्येक घरांसमोर हॅलोविनचे देखावे मांडण्यात येतात (हॉन्टेड हाऊस). त्याच्या तयारीसाठी घरातील सर्व लहान थोर किमान महिनाभर तरी खपत असतात. आणि अशी सजावट बघण्यासाठी लोकांची गर्दी देखील होत असते. बऱ्याच ठिकाणी पैश्याची दानपेटी ठेवलेली असते आणि जमा झालेला निधी हा समाज उपयोगी कामासाठी वापरला जातो. यंदा मात्र अंतरभान (सोशल डिस्टंसिंग) ठेवणे आवश्यक असल्याने गर्दीच्या नियोजनाची जबाबदारी घेणे देखील अपेक्षित आहे त्यामुळे बहुतेकांनी हॅलोविन हॉन्टेड हाऊसचे देखावे करणे रद्द केले आहे. त्याच बरोबरीने भुते, हडळी, चेटकिणी व इतर सर्व अमानवी वर्गात देखील अंतरभान ठेवायचे कि नाही या बद्दल मार्गदर्शक तत्वे स्पष्ट नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे. हाडांचे सापळे, कवट्या, शवपेटीतील प्रेते इत्यादींसाठी मुखपट्टी (मास्क) अनिवार्य नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून हे सगळे मास्क घालून दिसण्याची किंवा मनगटापासून तुटलेल्या व रक्ताळलेल्या हाताच्या पंजाच्या बोटावर ९५ रिडींग दाखवणारा ऑक्सिमीटर बघायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुकानात प्रवेश करताना दारात उभी असलेली एखादी हडळ तुमच्या कपाळावर कॉन्टॅक्टलेस थर्मामिटर रोखून तुमचे तापमान मोजेल, एखादा भुताचा सापळा पटकन हात पुढे करून तुमच्या हातावर सॅनिटायझरचे थेंब टाकेल किंवा एखाद्या भुताचे तुम्ही जर अंतरभान न पाळता जवळून निरीक्षण करायला लागला तर डोळ्याच्या खोबणीतील लाईट्स लावून, कवटीचा खालचा जबडा हलवत ते भूत "दूर हो" असे तुमच्यावर ओरडले तर आश्चर्य वाटायला नको.   

हॅलोविनसाठी लहान आणि शाळकरी मुले उत्साही असल्याकारणाने शाळांमध्ये हॅलोविन पार्टीचे आयोजन केले जाते. कार्यालये आणि इतर अस्थापनांमध्ये हॅलोविनच्या दिवशी नेहमीचे कपडे (फॉर्मल वेअर) न घालण्याची सूट मिळते त्यामुळे लोकं कल्पकतेने वेशभूषा (कास्च्युम) आणि त्याला सुसंगत मेकअप करतात. पार्टीसाठी काहीतरी थीम ठरवून त्याप्रमाणे वेशभूषा आणि मेकअप ठरवला जातो.  कास्च्युममध्ये अगदी मजेशीर, परी, प्रिन्स/प्रिन्सेस, ऐतिहासिक, प्राण्यांच्या आकारातील, इमोजीच्या आकारातील, विविध व्यावसायिकांचे, पोलीस/फायर फायटर पासून ते स्केलेटन, हॉरर, घोस्ट, विच, व्हुडू, व्हॅम्पायर, वेअरवूल्फ, झॉम्बी पर्यंत विविध प्रकार उपलब्ध असतात. पार्टीत घालण्यासाठी वेगवेगळे भीतीदायक म्हणजे अगदी हिडीस आणि बीभस्त म्हणता येतील असे मुखवटे मिळतात. ह्यावर्षी काही उत्पादकांनी आमच्या मुखवट्यामध्ये मास्क असल्याने पार्टीसाठी सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. हॅलोविनच्या पार्टीसाठी हवा त्या प्रकारचा आणि योग्य बसेल अशा आकाराचा कास्च्युम व इतर वस्तू घेण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली असते. ह्या वर्षी मात्र लोकांच्या एकत्र येण्यावर कमाल संख्येची मर्यादा असल्याने, अंतरभान पाळणे अनिवार्य असल्याने आणि कित्येक ठिकाणी कोविड-१९ ची दुसरी लाट चालू असल्याने हॅलोविन पार्टीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे लोकांच्या उत्साहावर पाणी फेरले जाऊन नाराजी आहे. 

हॅलोविनचे आणि भोपळ्याचे (पम्कीन) अतूट नाते आहे. भोपळ्याचा वरचा भाग कापून आतील गर बाहेर काढतात. त्यांनंतर त्या भोपळ्यावर कवटी सदृश्य डोळे, नाक, दात इत्यादी कोरून भीतीदायक चेहरा तयार करतात. वेगवेगळ्या आकारातील भोपळे आणि त्या बरोबरीने कोरीव कामासाठी लागणारे कार्व्हिंग किट्स बाजारात उपलब्ध असतात. जास्त भीतीदायक, अवघड आणि किचकट चेहरा कोरण्यासाठी तयार स्टेन्सिल्स देखील मिळतात. त्या कोरलेल्या भोपळ्यामध्ये मेणबत्ती, तेलाचा किंवा विजेचा दिवा ठेवल्याने कंदिलासारखा उजेड बाहेर येतो. त्याला जॅक-ओ-लॅन्टर्न म्हणतात. असे भोपळे घराबाहेर व्हरांड्यात ठेवतात आणि घरे भुताखेतांनी, भीतीदायक वस्तूंनी सुशोभित (की कुशोभित म्हणावे बरे?) करतात. हॅलोविनच्या निमित्ताने भोपळ्याचे विविध खाद्य पदार्थ केले जातात आणि कित्येकदा त्या पदार्थांना भीतीदायक आकार देखील दिला जातो. ह्या सर्व कामांमध्ये घरातील मुलांना सहभागी करून घेतले जाते. यंदा सार्वजनिक हॅलोविनला बंदी असल्याने घरगुती, फक्त घरातील सदस्यांसमवेत एखादा हॉरर चित्रपट बघत किंवा एखादा भीतीदायक व्हिडीओ गेम खेळत आणि काही खास भीतीदायक खाद्य पदार्थ खात हॅलोविन साजरा करायचा असे बहुसंख्यांनी ठरवले आहे.  

हॅलोविनमध्ये लहान मुलांसाठी "ट्रिक ऑर ट्रीट" या प्रथेला महत्वाचे स्थान आहे. बाळ गोपाळ मंडळी हॅलोविनच्या संध्येला भीतीदायक वेशभूषा, मेकअप करून किंवा मुखवटे घालून आजूबाजूच्या घरी जाऊन "ट्रीट" म्हणून कॅंडीजची मागणी करतात. काही ठिकाणी मुलांना पैसे देण्याची प्रथा आहे. मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर कॅंडीजची अपेक्षा असते. ती जर पूर्ण झाली नाही तर घरमालकाला भीती दाखवत "ट्रिक" करतात. मुलांमध्ये जास्तीत जास्त कॅंडीज मिळवण्याची स्पर्धा असते त्याकरिता खिसे अपुरे असल्याकारणाने पिशव्या घेऊन हिंडतात व खजिना गोळा करतात. मुलांना कॅंडीज द्यायची इच्छा ज्या घरमालकांना असते ते घराबाहेर आणि दरवाज्यावर हॅलोविनची सजावट करतात, दाराबाहेर जॅक-ओ-लँटर्न लावून ठेवतात, व्हरांड्यात लाईट चालू ठेवतात किंवा ड्राईव्ह वे वरील कार्स बाजूला काढून मोकळा ठेवतात त्यामुळे मुलांना ह्या घरात कॅंडीज मिळतील हे कळते मात्र घरमालकाकडे कॅंडीजचा पुरेसा साठा नसेल तर त्यांना "ट्रिक" ला सामोरे जावे लागते. मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ह्या कॅंडीज बंद वेष्टनातून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅंडीज एका बंद प्लास्टिकच्या पिशवीत (पाऊच) देतात. हॅलोविनच्या दरम्यान कॅंडीजची मोठी उलाढाल होत असते. यंदा मात्र कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ट्रिक ऑर ट्रीट करून इतरांनी हाताळलेल्या कॅंडीज मुलांना खाऊ द्याव्यात कि नाही याबद्दल पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. वेगवेगळ्या घरातील मुलांनी एकत्र येण्या ऐवजी एकाच घरातील मुलांनी त्याच घरातील एखाद्या प्रौढ व्यक्ती बरोबर, मास्क घालून, इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवत कॅंडीज गोळा करणे अपेक्षित आहे. आणि कॅंडीज देणाऱ्याने सुद्धा सुरक्षित अंतरावरून, कॅंडीजना स्पर्श न करता द्याव्यात असा सल्ला देण्यात आलेला आहे. घरी केलेल्या कुकीज, बिस्किट्स इत्यादी वर बंदी आहे. 

काही घरमालकांनी दोन मीटर लांब पीव्हीसीच्या नळीतून एका प्लास्टिकच्या पिशवीत कॅंडीज देण्याची योजना आखली आहे तर काहींनी "थ्रो अँड कॅच" पद्धत वापरायचं ठरवलं आहे. या सर्व कारणांमुळे कॅंडीजच्या ऐवजी मुलांना सुरक्षित अश्या शालोपयोगी वस्तू देता येतील का ह्याचा देखील विचार चालू आहे. हॅलोविन साजरा करताना आणि विशेषतः "ट्रिक ऑर ट्रीट" करताना सुरक्षिततेसाठी अंतरभानासारखी बंधने असल्याने मुलांमध्ये व त्यांच्या पालकांमध्ये मोठी नाराजी आहे. हे वर्ष आतापर्यंत कोविद-१९ च्या दहशतीखाली गेले असले तरी वर्ष अखेर पर्यंत अंतरभानापासून मोकळीक मिळून एकत्र येऊन ख्रिसमस साजरा करता येईल अशी लोकांना आशा आहे. 

(टीप: हा लेख पाश्चात्यांच्या सणासंदर्भात असल्याने इंग्रजी शब्दांचा अतिरिक्त वापर अनिवार्य ठरला आहे.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 effect on halloween festival 2020 canada