अमेरिकेतील कनेक्टिकटमध्ये सलग दुसऱ्यावर्षी गणेशोत्सव साजरा

US
US

'देसीज अराउंड रॉकी हिल' या कनेक्टिकट अमेरिका येथील भारतीयांच्या समुहांतर्गत सलग दुसऱ्या वर्षीही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. २०१८ पासून, न्यूइंगटन येथील वल्लभधाम मंदिराचे विश्वस्त राजीव देसाई यांच्या सहकार्याने आणि उपेंद्र वाटवे व सीमा वाटवे या दाम्पत्याच्या पुढाकाराने, दुर्गेश जोशी, अभिजित दानवे, अभिजित वग्गा, प्रफुल्ल कुलकर्णी, आशय साठे अशा काही हौशी मंडळींनी कनेक्टिकट मधील सर्व भारतीय कुटुंबांना एकत्र आणून संपूर्ण १० दिवस साग्रसंगीत श्री गणेश उत्सव साजरा केला.

भारतीय माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याची नाळ ही नेहमीच त्याच्या मातीशी जोडलेली असते याचे हे उत्तम उदाहरण आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने सर्व भारतीयांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव सुरु केला तोच हेतू समोर ठेऊन गणेशोत्सव केवळ मराठी कुटुंबांपुरता मर्यादित न राहता सर्व भारतीयांना त्यात सामावून घेण्याचा ह्या मंडळाचा प्रयत्न आहे. ढोल, ताशे, लेझीम अशा पारंपरिक स्वरूपात गणरायाचे स्वागत करण्यात आले. लहान मुलांना आपल्या संस्कृतीची जाणीव व ओढ राहावी यासाठी राबवलेला हा एक अतिशय सुंदर उपक्रम आहे. 

परदेशातील बऱ्याच मंडळात फक्त एकच दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो, परंतु या मंडळाची एक विशेष बाब म्हणजे, फक्त एक दिवस एकत्र न येत, संपूर्ण १० दिवस गणेश पूजन, आरती, आराधना केली जाते. संपूर्ण १० दिवस रोज संध्याकाळी किमान २०० भारतीय एकत्र आरतीला जमतात. प्रत्येक दिवशीच्या आरतीसाठी किमान आठ ते दहा यजमान कुटुंबे असतात आणि त्यांच्याकडेच त्या दिवशीचा सर्वांसाठीचा प्रसाद असतो. मंडळाचे हे दुसरे वर्ष असून, दिवसेंदिवस भारतीयांचा प्रतिसाद वाढतच आहे आणि विशेष म्हणजे हा उपक्रम संपूर्णपणे नि:शुल्क आहे. 

दररोज संध्याकाळी आरतीच्या आधी लहान मुलांसाठी समूह गायन, गणपती विशेष प्रश्नोत्तरे, प्रहसने, श्लोकपठण असे विविध उपक्रम आयोजित केले जातात. गणपती अथर्वशीर्षाचे सहस्रावर्तन सलग दुसऱ्या वर्षीही करण्यात आले. मंडळाच्या कलाकारांनी  केलेली सुरेख मखर सजावट ह्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरली. दुर्गेश जोशी यांची लहान मुलांसाठीची खगोलशास्त्र कार्यशाळा, गणपती कला प्रदर्शन यांसारखे दर्जेदार उपक्रम तसेच  अनुप्रिया कायंदे ह्यांनी बसवलेली समूह गायनातील पारंपरिक गाणी, अमृता वडजे व क्षमा लाभे ह्यांनी तयार केलेली समाज प्रबोधनपर प्रहसने इत्यादी उल्लेखनीय सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. परदेशात राहून आपली संस्कृती जपणाऱ्या आणि विशेष म्हणजे परदेशातील अनेक भारतीयांना एकत्र आणणारा हा उपक्रम प्रशंसनीय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com