esakal | ऑस्ट्रेलियातील मराठी नागरिकांनी जपली परंपरा
sakal

बोलून बातमी शोधा

Australia

ऑस्ट्रेलियातील मराठी नागरिकांनी जपली परंपरा

sakal_logo
By
कृष्णकांत कोबल

मांजरी खुर्द (पुणे) : ज्या भूमीत आपण जन्मलो, तिच्या अंगा-खांद्यावर खेळलो, बागडलो तिची आठवण न येईल तो विरळाच. गाव सोडलेल्या प्रत्येकाला तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तेथील संस्कृती, परंपरा आणि विविध सण-उत्सव त्यांना आकर्षित करीत असतात. आहेत तेथेही मोठ्या उत्साहत ते साजरे केले जातात. अशीच वृती नोकरी व्यवसायानिमित्त परदेशात वास्तव्यास गेलेल्या भारतियांमध्येही प्रकर्षाने जोपासली जाताना दिसते. पुणे परिसरातून सिडनी ऑस्ट्रेलिया येथे वास्तव्यास गेलेल्या महाराष्ट्रीयन तरूणांनीही आपल्या "सह्याद्री सिडनी'' या संस्थेच्या माध्यमातून ही परंपरा जपलेली आहे. 

जुन्नर येथील तरूण शरद भुजबळ यांनी शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने सात वर्षापूर्वी महाराष्ट्रीयन नागरिकांना एकत्र करून तेथे या परंपरेला सुरूवात केली. बाळासाहेब बनकर यांनी "सह्याद्री सिडनी'' या संस्थेची कल्पना मांडून सर्वांनी तेथे विविध भारतीय सण-उत्सव साजरे करण्याबरोबरच सामाजिक उपक्रम सुरू केले. भाऊसाहेब पाटील, शशिकांत धाडगे, पांडुरंग मटकर, श्रीकांत देवळे, विजय काळे, संतोष काशिद, अजय देशमुख, विशाल गोकुळे, निलेश डोंगरे, उमेश कदम यांनी पुढाकार घेऊन संस्थेचे काम सुरू केले आहे. त्यामध्ये नंतर योगेश चव्हाण, अण्णासाहेब कांदळकर, विक्रम पवार, महेंद्र गवाणकर, मंगेश चोरट, संजय लोहार हे तरूणही सहभागी झाले आहेत. आज सुमारे साठ तरूण या संस्थेसाठी काम करीत आहेत. 

संस्थेच्या वतीने वेळोवेळी मराठी चित्रपट सभासदांना दाखविले जातात. त्यातून जमा होणाऱ्या निधीतून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्थानिक व महाराष्ट्रातील विविध संस्थाना मदत केली जाते. आज पर्यंत संस्थेने दुष्काळग्रस्तांसाठी कार्य करणारे नाम फौंडेशन, केरळमधील पुरग्रस्त, शिवनेरी फौंडेशन यांच्यासह ऑस्ट्रेलियामधील कॅंन्सर कौन्सिल, लहान मुलांचे हाॅस्पिटल, मॅकग्राथ फाऊंडेशन, अग्निशामक विभाग, न्यु साऊथ वेल्स आस्ट्रेलिया मधील दुष्काळग्रस्त शेतकरी आदींना लाखो रूपयांची मदत केली आहे. याशिवाय आॅस्ट्रेलियन रेड क्राॅस साठी रक्तदान शिबीर, सिडनीतील महाराष्ट्रीयन लोकांसाठी आपत्कालीन निधी, शालेय विद्यार्थ्यांसाठी ओसीआय टेस्ट, क्लिन अप आॅस्ट्रेलिया असे अनेक उपक्रम संस्थेकडून राबविले जात आहेत.

सभासदांच्या लहान मुलांना भारतीय परंपरा, संस्कृती, खेळ आदींची ओळख व्हावी, यासाठी वेळोवेळी एकत्र करून वर्ग घेतले जात आहेत. ढोल लेझीमचे या मुलांना विशेष आकर्षण आहे. 

"गेली सात वर्षापासून शिवजयंती साजरी करीत असल्यामुळे सभासदांमध्ये एक अनोखे नाते निर्माण झाले आहे. मराठी माणूस म्हणून सर्वजण सण-उत्सव आणि सामाजिक कामात हिरिरीने सहभागी होतात. या एकोप्याचा सामाजिक उपक्रमात चांगले योगदान मिळत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मदतीतून आपल्या भूमीसाठी काहीतरी करताना विशेष समाधान मिळत आहे. यापुढेही आम्ही अधिकाधीक एकत्र येऊन सामाजिक उपक्रमासाठी पुढाकार घेत राहू,'' अशी भावना शरद भुजबळ, बाळासाहेब बनकर, भाऊसाहेब पाटील, विशाल गोकुळे यांनी व्यक्त केली.