अमेरिकेतही गजर; MMDTP मराठी बांधवांनी स्थापन केलेलं ढोल-ताशा पथक

जितेंद्र सर्जेराव ताटे
Tuesday, 4 February 2020

एकच नशा ढोल ताशा! गरजल्या दाही दिशा!
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

ढोल-ताशा हे महाराष्ट्राच्या मातीतलं वाद्य. ही मराठमोळी वाद्यसंस्कृती अमेरिकेतील ऑस्टिन इंथंही रुजू लागली आहे. तेथील मराठी बांधवांनी एकत्र येत पथक स्थापन केलं आहे. या पथकाविषयी...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राजा बढे यांची लिहलेलं, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले आणि शाहीर साबळे यांनी आपल्या पहाडी आवाजात गायलेले हे महाराष्ट्र गीत. हे ऐकताना ज्याची छाती अभिमानाने भरून येते, ज्याच्या अंगावर रोमांच उभे राहतात, आणि आपसूकच तोंडातून शब्द बाहेर पडतात; जय भवानी जय शिवाजी; तो प्रयेक जण महाराष्ट्रीय. मग तो माणूस शरीराने महाराष्ट्रात राहत असो कि सातासमुद्रापार अमेरिकेत. दारिद्र्याचा उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा असा हा महाराष्ट्र माझा शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र माझा. परकीय आक्रमणाला थोपवण्यासाठी लाख योध्यांची पानिपतात आहुती दिलेला महाराष्ट्र माझा; गणपती बाप्पा मोरया म्हणत भान हरपणारा महाराष्ट्र माझा ढोल-ताशा-झांज-लेझीमच्या गजराने बेभान होणारा महाराष्ट्र माझा.

Image may contain: text

ढोल, ताशा, झांज आणि लेझीम यांच्याबद्दल महाराष्ट्रीय लोकांना काही सांगणं म्हणजे अमेरिकन लोकांना जॉर्ज वॉशिंग्टन चे महत्व सणल्यासारखं आहे. ढोल-ताशांची परंपरा आमच्या रक्तात भिनलीय, नसानसात शिरलीय आणि मना-मनात पसरलीय. ढोल आणि ताशा हि खर तर पारंपारिक रणवाद्य आहेत. पण आता त्यांनी सण-समारंभ-विजय उत्सवात महत्वाचे स्थान पटकावले आहे.

तुमचा, आमचा, आपल्या सगळ्याचा आवडता महाराष्ट्र माझा.! म्हणूनच आमच्या पथकाचा नाव महाराष्ट्र माझा ढोल-ताशा-झांज-लेझीम पथक-MMDTP!हे पथक नोव्हेंबर २०१८ मध्ये ऑस्टिन, टेक्सास, युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे काही उत्साही कुटुंबांनी एकत्र येऊन स्थापन केलं. सुरुवातीला २० कुटुंबे आणि ५० वर लोक या पथकात सामील झाली होती. आज याचा पसारा ४५ च्या वर कुटुंबे आणि ७५ च्या वर लोक इतका वाढलेला आहे. ४ वर्षाच्या सोनुल्यापासून ते ७० वर्षाच्या चिरतरुणापर्यंत सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष या पथकात सामील आहेत. ३०च्या वर ढोल १५च्या वर ताशे आणि ५०च्यावर झांज आणि लेझीम खेळणारे लोक. एकाच वेळी ढोल-ताशा वाजवत आहेत आणि ताशा झांज खेळत आहेत. काय असेल तो नजारा. तळपायापासून ते मस्तकापर्यंत पसरणारे कसे असतील ते शहारे. उपस्थितानां थिरकायला लावणारी कशी असेल ती झिंग. ऑस्टिन शहरातल हे अशा प्रकारच सगळ्यात मोठं पथक. ऑस्टिन शहरातच काय तर संपूर्ण नॉर्थ अमेरिकेतील हे एक दखलपात्र पथक आहे.
Image may contain: one or more people, outdoor and nature

महाराष्ट्र माझा ढोल-ताशा-झांज-लेझीम पथक हा एक स्वतंत्र गट आहे जो कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय किंवा इतर कोणत्याही संस्थांशी संबंधित नाही. या गटाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे उत्तर अमेरिकेत ढोल, ताशा, झांझ आणि लेझिम या समृद्ध संस्कृतीचा प्रसार करणे. विशेषत: उत्साहाने थबथबलेल्या ऑस्टिन शहरात हि परंपरा भारतीय आणि अमेरिकन लोकांपर्यंत पोहोचवणे हे महत्वाचे. तसेच हि पारंपारिक महाराष्ट्रीयन वाद्यांची परंपरा पुढील तरुण पिढीपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आम्ही आमच्या मित्रांसह आणि कुटूंबियांसमवेत ढोल-ताशा-झांज-लेझीमची मजा आणि आनंद घेऊ इच्छितो. सिटी ऑफ ऑस्टिन, ट्रॅव्हिस काउंटी आणि गव्हर्नरच्या कार्यालयात क्रॉस-कल्चरल कार्यात सामील होण्यासाठी हे पथक खूप उत्सुक आहे. पथकाचा स्वतःचा लोगो आहे, स्वतःचे घोष वाक्य आहे, स्वतःचा एक ठराविक पोशाख आहे, स्वतःची वेब साईट आहे, यु टब चॅनल आहे, आणि फेसबुक पेज आहे.

छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेच्या पार्श्वभूमीवर बेभान होऊन ढोल वाजवणारा/री ढोली हा पथकाचा लोगो आहे. तर एकच नशा ढोल ताशा हे पथकाचा अधिकृत घोषवाक्य आहे. तर गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया जय भवानी जय शिवाजी आवाज कुणाचा? महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा नाद नाय करायचा. महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा एकच नशा ढोल ताशा. गरजल्या दाही दिशा. होऊन जाऊ देत धिंगाणा ऑस्टिन प्राईड महाराष्ट्र प्राईड या आणि अशा अनेक घोषणा आहेत.

पथकाचा अधिकृत असा पांढऱ्या रंगाचा पोलो शर्ट आहे. त्याच्या पुढील भागावर पथकाचा लोगो तर मागील भागावर घोषवाक्य आहे. निळ्या रंगाची जीन्स आणि हा पांढरा पोलो शर्ट हा पोशाख स्त्री-पुरुषांसाठी वापरला जातो. पारंपरिक कार्यक्रमात स्त्रियांसाठी नऊवारी साडी, नथ, भगवा फेटा, गळ्यात भगवा शेला तर पुरुषांसाठी पांढरा कुर्ता, भगवा फेटा, गळ्यात भगवा शेला असा पथकाचा पोशाख आहे.

Image may contain: 9 people, people smiling

पथकाचे मॉडेल अतिशय सोपे आणि सुसूत्रित आहे. प्रत्येक जण आपापले वाद्य विकत घेतो. त्याची निगा राखणे आणि वाहतूक करणे हि प्रत्येकाची जबाबदारी आहे. सर्व वाद्ये भारतातून प्रथितयश उत्पादकांकडून मागवली जातात. पथकाचे सदस्य एकत्र येऊन ढोल-ताशा बांधतात. ढोल आणि ताशाच्या पानांना योग्य तो ताण द्यावा लागतो. ढोलाच्या पानांची खास करून काळजी घ्यावी लागते. महाराष्ट्र माझा ढोल ताशा पथक स्थानिक सामाजिक संस्थाना खंबीर समर्थन देते. जसे कि, सीआरवाय (चिल्ड्रन राईट्स अँड यू), एसीईएस (ऑस्टिन कल्चरल एज्युकेशनल अँड सेवा फाउंडेशन), एसईएफ (शंकरा आय फाउंडेशन), एचसीसीए (हिल कंट्री क्रिकेट असोसिएशन), एएमएम (ऑस्टिन मराठी मंडळ), आणि अक्षय पात्रा. यांच्या अनेक कार्यक्रमात पथकाने सामील होऊन ऑस्टिनकारांना डोलायला आणि नाचायला भाग पाडले आहे.

शिवजयंती दिवशी फेब्रुवारी २०१९ मध्ये पथकाचा सराव सुरु झाला. सलग ५ महिने आठवड्याला २-३ तास कसून सर्व केल्यानंतर ४ जुलै या अमेरिकन स्वातंत्र दिनादिवशीच्या परेड मध्ये पथकाने आपले पहिले सार्वजनिक सादरीकरण केले. त्या कामगिरीनंतर पथकाला भरभरून आमंत्रणे येऊ लागली. ऑगस्ट आणि
सप्टेंबर महिन्यात पथकाने तब्बल ५ सार्वजनिक परफॉर्मंसेस सादर केले.

  • १७ ऑगस्ट २०१९, राउंड रॉक येथे एचसीसीए ची फायनल क्रिकेट मॅच. या मॅचवेळी ढोल-ताशा आणि झांज याचे सादरीकरण झाले.
  • २४ ऑगस्ट २०१९, एसीईएस ऑस्टिनने आयोजित केलेली भारताच्या स्वातंत्र्यदिनाची परेड इंडिया डे. हि परेड या वर्षी ऑस्टिन हिंदू मंदिरात आयोजित केली होती.
  • ३१ ऑगस्ट २०२९, CRYने आयोजित केलेला सांस्कृतिक दिनाचा कार्यक्रम
  • ८ सप्टेंबर २०१९, ऑस्टिन मराठी मंडळाने सालाबादप्रमाणे आयोजित केलेला गणेशोत्सव.
  • १४ सप्टेंबर २०१९, अग्नि डान्स कंपनीने म्यूलर पार्क मध्ये आयोजित केलेला बॉलिवूड डे

हा लेख लिहीत असताना २०२० मधले कॅलेंडर आत्ताच हाऊस फुल्ल दिसत आहे. तब्बल १४ कार्यक्रमासाठी महाराष्ट्र माझा ढोल ताशा झांज लेझीम पथकाला आमंत्रित करण्यात आले आहे. लवकरच महाराष्ट्र माझा ढोल ताशा पथक ही एक सार्वजनिक संस्था म्हणून नोंदणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र माझा ढोल ताशा पथक कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय किंवा इतर कोणत्याही संस्थांशी संबंधित नाही आणि असणार नाही. ढोल-ताशा-झांज-लेझीम हाच एक विचार आणि हीच एक विचारधारा. हे मान्य असणारा कोणीही या पथकात सामील होऊ शकतो. फक्त प्रचंड आवड हवी, सरावासाठी वेळ हवा, आर्थिक आणि वेळेविषयी वचनबद्धता हवी, अत्यंत सकारात्मक विचार हवा, सांघिक गटात काम करताना बाळगावयाची शिस्त आणि योगदानाची भावना हवी, महाराष्ट्राच्या लोककला-संगीताचा अभिमान हवा, ही परंपरा आपल्या पुढल्या पिढीकडे सुपूर्त करण्याची उर्मी हवी, आणि सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या भारतातील-अमेरिकेतील इतर सार्वजनिक संस्थाबद्दल ममत्व हवे. 

जितेंद्र सर्जेराव ताटे
महाराष्ट्र माझा ढोल-ताशा-झांज-लेझीम पथक, ऑस्टिन, टेक्सास, युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jitendra Tate writes about Maharashtra Maza Dhol-Tasha-Zanj-Lezim squad in america