लंडनमध्ये मराठी भाषेचा जयघोष!

शनिवार, 3 जून 2017

लंडन : 'लंडन मराठी संमेलना'च्या (एलएमएस) निमित्ताने महाराष्ट्र मंडळ, लंडनच्या 85 व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, मराठी गाणी, 'जय महाराष्ट्र'चा जयघोष, गणेश वंदना आणि पोवाड्यांमुळे वॉटफर्ड येथील 'वॉटफर्ड कलोझियम थिएटर'चा परिसर आज (शुक्रवार) दुमदुमून गेला.

लंडन : 'लंडन मराठी संमेलना'च्या (एलएमएस) निमित्ताने महाराष्ट्र मंडळ, लंडनच्या 85 व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, मराठी गाणी, 'जय महाराष्ट्र'चा जयघोष, गणेश वंदना आणि पोवाड्यांमुळे वॉटफर्ड येथील 'वॉटफर्ड कलोझियम थिएटर'चा परिसर आज (शुक्रवार) दुमदुमून गेला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्व इंग्लंडच्या नौदलाचे प्रादेशिक कमांडर कमोडर डेव्हिड एलफोर्ड होते. यावेळी 'पीएमजी ज्वेलर्स'चे सौरभ गाडगीळ, हनुमंत गायकवाड, अभिनेते मोहन आगाशे, सयाजी शिंदे, लेखिका मीना प्रभू, लेखक केदार लेले, डॉ. सतीश देसाई, सचिन ईटकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाईचे ट्रस्टी ऍड. प्रताप परदेशी, रवी चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला 85 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर ढोल-ताशे, मराठी जाणी, 'जय महाराष्ट्र'च्या घोषणा व पोवाड्यांनी परिसर दुमदुमून गेला होता. लंडनमधील मराठी बांधवांनी कार्यक्रमासाठी गर्दी केली होती. शाहीर नंदेश उमप यांच्या पोवाड्यानंतर उपस्थितांमध्ये उत्साह संचारला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. अच्युत गोडबोले यांनी सादर केलेल्या 'नादवेध' कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.

यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यामुळे या सोहळ्याच्या निमंत्रण देण्यासाठी ट्रस्टी पुण्याहून लंडनला आले आहेत. त्यांनी ब्रिटनमधील मराठी बांधवांना आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.

या कार्यक्रमामध्ये 'एलएमएस'च्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यात विविध मान्यवरांचे लेख आहेत. अध्यक्ष सुशील रापतवार, वैशाली मंत्री, अनिल नेने व गोविंद काणेगावकर यांनी सूत्रसंचालन केले.

शिवाजी महाराज की जय...
पूर्व इंग्लंडच्या नौदलाचे प्रादेशिक कमांडर कमोडोर डेविड एलफोर्ड यांनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराचा उल्लेख केल्यानंतर टाळ्यांच्या गडगडाटासह शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष झाला.