न्यूजर्सीतील 'मराठी विश्व' आता 40 वर्षांचं झालंय..!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 May 2019

न्यूजर्सीमधील मराठीजनांसाठी एक मोठा सोहळा नुकताच साजरा झाला.. येथील हजारो मराठी कुटुंबांनी ईस्ट ब्रुन्स्विकमध्ये झालेल्या त्या सोहळ्यास आवर्जून हजेरी लावली. निमित्त होतं 'मराठी विश्व'च्या ४० व्या वर्धापनदिनाचं!

न्यूजर्सीमधील मराठीजनांसाठी एक मोठा सोहळा नुकताच साजरा झाला.. येथील हजारो मराठी कुटुंबांनी ईस्ट ब्रुन्स्विकमध्ये झालेल्या त्या सोहळ्यास आवर्जून हजेरी लावली. निमित्त होतं 'मराठी विश्व'च्या ४० व्या वर्धापनदिनाचं!

हा सोहळा ६ आणि ७ एप्रिल रोजी झाला. दीर्घ काळापासून न्यूजर्सीमध्ये राहणारे चंद्रकांत आणि शशिकला यंदे यांनी या उपक्रमाची सुरवात केली होती. यंदाच्या सोहळ्यासाठी भारतीय नृत्याचा सृजनशील आविष्कार, पुण्यातील कलाकारांनी सादर केलेला शास्त्रीय संगीताचा दर्जेदार कार्यक्रम आणि दिग्गज कलाकारांनी सादर केलेले नाट्याविष्कार हे आकर्षण होते. त्यातच, यंदाच्या सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी गुढी पाडवा होता. त्यामुळे सोहळ्याच्या वातावरणात आनंदाची भरच पडली होती. 

या कार्यक्रमासाठी शास्त्रीय गायक आनंद भाटे, अभिनेते प्रशांत दामले, नृत्यांगना आणि अभिनेत्री अर्चना जोगळेकर उपस्थित होते. जोगळेकर यांच्या 'अर्चना आर्ट्स' या पथकातील कलाकारांनी प्रसिद्ध मराठी लावण्यांसह अन्य गीतांवर नृत्य सादर केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले.

न्यूजर्सीचे गव्हर्नर फिल मर्फी यांनीही या कार्यक्रमाच्या निमित्ताने यंदे दाम्पत्याला खास व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. 

Image may contain: 2 people

प्रशांत दामले आणि कविता लाड यांनी 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचा बहारदार प्रयोग सादर केला. या प्रयोगासाठी थिएटर पूर्ण भरले होते. प्रेक्षकांनीही या प्रयोगाला पसंतीची दाद दिली. ''माझे आणि मराठी विश्वचे नाते जुने आहे.  २० वर्षांपूर्वी मी सर्वप्रथम न्यूजर्सीला प्रयोग सादर केला होता. मराठी विश्वशी निगडीत असलेले अनेक ओळखीचे चेहरे आज इथे पाहून खरंच आनंद झाला'', अशी प्रतिक्रिया दामले यांनी व्यक्त केली.

Image may contain: 5 people, people smiling, people standing and indoor

आनंद भाटे यांनी 'बालगंधर्व'मधील गाजलेल्या गीतासह अवीट गोडीचे अनेक गाणी सादर केली. पंडित भीमसेन जोशी यांच्या काही कलाकृती भाटे यांनी सादर केली आणि श्रोत्यांनी वारंवार 'वन्स मोअर'ची मागणी केली.

अर्चना जोगळेकर यांनी विठ्ठल आणि कृष्णावरील गीतांवर नृत्य केले. त्यांच्या पथकातील इतर कलाकारांनी लावणी सादर केली. या कार्यक्रमादरम्यान जोगळेकर यांनी त्यांच्या कलासृष्टीतील प्रवासाबद्दल भावनाही व्यक्त केल्या.

शशिकला यंदे म्हणाल्या, ''मराठी विश्व आता चाळीसाव्या वर्षांत पदार्पण करत आहे, याचा अतिशय आनंद होत आहे. मी नाव ठेवलेल्या एका छोट्या उपक्रमाचे इतक्या मोठ्या कार्यक्रमात रुपांतर होईल, असे कधीच वाटले नव्हते.'' यावेळी 'म्राठी विश्व'च्या ४० वर्षांच्या प्रवासाविषयी एक व्हिडिओही दाखविण्यात आला. 'या संस्थेच्या कार्यकर्त्यांचे आणि सदस्यांचे कष्टच यातून दिसत आहेत. या सर्वांच्या कष्टांमुळेच आज 'मराठी विश्व' इथपर्यंत पोचले आहे. मला या सर्वांचा अभिमान आहे'', असे उद्गार चंद्रकांत यंदे यांनी काढले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Vishwa of New Jersey celebrated 40 years of existence