सशुल्क पार्किंगसाठी सार्वजनिक वाहतूकीचे जाळे गरजेचे

तुषार कर्णिक
Wednesday, 28 March 2018

पुण्यात सशुल्क पार्किग सुरु होणार. निश्चितच एक सकारात्मक अशी गोष्ट. कारण सध्या वाहन घेणे यापेक्षा ते योग्य ठिकाणी ठेवणे आणि त्याचे जतन करणे हे जास्त जिकिरीचे काम आहे. आता पुण्यात सशुल्क पार्किंग सुरु होणार म्हणजे त्यासाठीचे नियोजन करणे हे ओघाने आले, ज्याचा सारासार विचार पालिकेद्वारे निश्चितच करण्यात आला असेल यात शंकाच नाही. मात्र जेव्हा अशाप्रकारे पार्किंगसाठी शुल्क आकारले जाईल तेव्हा ते भरताना त्या शुल्काच्या बदल्यात आपल्याला काय सुविधा मिळणार आहेत किंवा त्यासंदर्भात काय नियम लागू केले जाणार आहेत याबद्दल प्रत्येकजण नक्कीच उत्सुक असेल.

पुण्यात सशुल्क पार्किग सुरु होणार. निश्चितच एक सकारात्मक अशी गोष्ट. कारण सध्या वाहन घेणे यापेक्षा ते योग्य ठिकाणी ठेवणे आणि त्याचे जतन करणे हे जास्त जिकिरीचे काम आहे. आता पुण्यात सशुल्क पार्किंग सुरु होणार म्हणजे त्यासाठीचे नियोजन करणे हे ओघाने आले, ज्याचा सारासार विचार पालिकेद्वारे निश्चितच करण्यात आला असेल यात शंकाच नाही. मात्र जेव्हा अशाप्रकारे पार्किंगसाठी शुल्क आकारले जाईल तेव्हा ते भरताना त्या शुल्काच्या बदल्यात आपल्याला काय सुविधा मिळणार आहेत किंवा त्यासंदर्भात काय नियम लागू केले जाणार आहेत याबद्दल प्रत्येकजण नक्कीच उत्सुक असेल.
Image may contain: sky and outdoor

अशावेळी कुठलीही तुलना न करता, दुबईमध्ये गेली कित्येक वर्षे कार्यरत असलेल्या, अद्ययावत अशा पार्किंग व्यवस्थेबद्दल थोडी माहिती देण्याचा हा प्रयत्न. 1 नोव्हेंबर 2005 मध्ये दुबई सरकारतर्फे आरटीए या विभागाची निर्मिती करण्यात आली आणि रस्ते व वाहतूक संदर्भातील सर्व गोष्टींची जबाबदारी या विभागावर सोपविण्यात आली. सुरवातीला शहरातील काही प्रमुख भागांमध्ये प्रायोगिक तत्वावर सशुल्क पार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि अत्यंत अद्ययावत अशी सौर उर्जेवर कार्य करणारी पार्किंग मीटर बसविण्यात आली आणि पार्किंगसाठी जागा निश्चित करून त्या जागेवर आखणी करून प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र अशी जागा निर्माण करण्यात आली. आता पुढची पायरी म्हणजे त्या जागेसाथीचे दर. त्याचे सुद्धा दरपत्रक काढून ते प्रत्येक मीटरवर सुस्पष्टपणे दिसेल असे लावण्यात आले आणि मीटर कसे वापरायचे याची देखील माहिती पडण्यात आली. एक म्हणजे कमीतकमी काळासाठी या जागेच वापर वापर होऊन सर्वाना पार्किंग मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला आणि त्यासाठीच दरपत्रक खालीलप्रमाणे निश्चित केले गेले. 

सर्वांत महत्वाचे म्हणजे पार्किंगच्या जागेचे वर्गीकरण करण्यात आले. 
A - मुख्य रस्त्याच्या कडेला पार्किंग (व्यावसायिक दर्जा) 
अर्धा तास - AED 2
पहिला तास - AED 4  
दोन तासासाठी - AED 8 
तीन तासाठी - AED 12

C - नागरी वस्तीतील रस्ते  
पहिला तास - AED 2  
दोन तासासाठी - AED 5 
तीन तासाठी - AED 8 

या जोडीला बहुतांशी नागरी वस्त्यांमध्ये पार्किंगसाठी जागा प्रस्थापित करून त्यासाठीचे देखील वेगळे दरपत्रक निश्चित केले गेले. तसेच काही ठिकाणी पार्किंगसाठीच्या बहुमजली इमारती देखील निर्माण करण्यात आल्या. याच बरोबर सशुल्क पार्किंगचा कालावधी निश्चित करण्यात आला तो म्हणजे सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत प्रत्येक विभागात पार्किंग हे सशुल्क आणि तयारीत 10 ते सकाळी 8 नि:शुल्क. तसेच प्रत्येक शुक्रवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पार्किंग नि:शुल्क अशा प्रकारे हि व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली. आता या सोयीचा सुयोग्य वापर करण्यासाठी विविध असे पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आले. 
Image may contain: outdoor

एक म्हणजे मीटरमध्ये नाणी टाकून तिकीट घेणे. जे गाडीच्या आतून डॅशबोर्डवर ठेवून निरीक्षकाला दिसेल अशापद्धतीने ठेवणे. दुसरा पर्याय सरकारतर्फे 
'NOL' नावाचे एक कार्ड निर्माण करण्यात आले ज्याद्वारे पार्किंगचे शुल्क भरणे. तिसरा आणि अत्यंत आधुनिक असा पर्याय म्हणजे एसएमएस करून पार्किंग चे शुल्क भरणे त्यासाठी आयटीए च्या 7275 या क्रमांकावर प्रत्येक विभागाच्या क्रमांकाच्या जोडीने आपल्या वाहनाचा क्रमांक टाकून एसएमएस करणे. सेवाकर धरून थोडा खर्चिक असा हा पर्याय असूनही, वेळेची बचत आणि पार्किगची सतर्कता दर्शवणारे संदेश यामुळे सर्वांत जास्त वापरात येणारा असा हा पर्याय आहे. याचबरोबर महिन्याचा किंवा 3 महिन्यांसाठीचे आणि वर्षभरासाठीच्या पासची देखील व्यवस्था आरटीएतर्फे करण्यात आली आहे. हा पास गाडीच्या डॅशबोर्डवर आतून दिसेल असा लावण्यात येतो. 
Image may contain: phone

खास नमूद करण्यासारखे म्हणजे पार्किंग शुल्क न भरता वाहन पार्क केल्यास होणारा दंड. एईडी 200 हा दंड भरण्यापेक्षा पार्किंग शुल्क भरून वाहन पार्क करणे हे कधीही सोयीचे ठरते.
Image may contain: 1 person, standing, car and outdoor

आता यामुळे काय झालं कि एकाच जागी गाडी पार्क करून उगाचच जागा अडविण्याकडे लोकांचा कल कमी झाला. मुख्य म्हणजे वाहुतक देखील नियंत्रित झाली कारण काही गर्दीच्या ठिकाणी कुटुंबातील लोक एकाच वाहनातून जाण्याकडे भर देऊ लागले. मात्र हे सर्व करताना एक गोष्ट जी खास नमूद करण्यासारखी म्हणजे जेव्हा शहरात सशुल्क पार्किग करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला त्याचवेळी शहरातील  'सार्वजनिक वाहतूक' कशी अद्ययावत करता येईल याकडे सरकारने आपले लक्ष केंद्रित केले. कारण तोपर्यंत शहरात 'टॅक्सी' आणि काही प्रमाणात 'बस सेवा' या दोन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अस्तित्वात होत्या मात्र 'बस सेवा' हि तितकीशी प्रभावी नसल्यामुळे सरकारने ती सुसज्ज करण्यावर भर दिला. त्यासाठी उत्कृष्ट दर्जाच्या वातानुकूलित बस आपल्या ताफ्यात आणून त्यांना साजेशा अशा वातानुकूलित 'बस थांब्यांची' निर्मित केली गेली. शहरातील नागरी विभागात बस मार्ग वाढवण्यात आले त्याचबरोबर बस थांबे वाढवले गेले मुख्य म्हणजे बस सेवा वापरण्यासाठी लोकांना उद्युक्त करण्यात आले. त्यानंतरची पायरी म्हणजे मेट्रो निर्मितीची घोषणा आणि त्याची 4 वर्षात केली गेलेली निर्मिती. अत्यंत अद्ययावत आणि संपूर्णपणे स्वयंचलित अशा मेट्रोची केली गेलेली निर्मिती आणि तिचा होत असलेला वापर ज्याचा निश्चित असा परिणाम वाहतूक नियंत्रित होण्यासाठी झाला. या सर्व आधुनिक वाहतूक सेवांच्या जोडीला शहरात आधीपासून अस्तित्वात असलेली पारंपरिक जलवाहतूक देखील आरटीए विभागांतर्गत सामाविष्ट करून त्यात वातानुकूलित अशा 'वॉटर टॅक्सी' ची भर टाकण्यात आली. एकंदरीत काय तर सशुल्क पार्किग सुरु करण्यामागे वाहतूक नियंत्रण, तसेच इंधन बचत हे सरकारचे जे मुख्य उद्देश होते ते सफल होण्यासाठी त्यासाठीचे उत्कृष्ट असे पर्याय सरकारने उपलब्ध करुन दिले.
Image may contain: sky and outdoor

सारासार विचार करता अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूकीचे जाळे पसरविण्यात आल्यामुळे तसेच सशुल्क पार्किंग व्यवस्था सुरु केल्यामुळे निश्चित अशा रोजगाराची देखील आपसूक निर्मिती झाली. सशुल्क पार्किंग व्यवस्था सुरळीत सुरु राहण्यासाठी नियोजित विभागासाठी एका स्वतंत्र निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली. इतर वाहतूक व्यवस्था वाढवण्यात आल्यामुळे सर्वच स्तरावर रोजगार निर्माण झाले. वाहतूक नियंत्रण, इंधन बचत, सार्वजनिक वाहतुकीचा सुयोग्य वापर आणि त्यामुळे होणारे वैयक्तिक फायदे हे तर ओघाने दिसू लागले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: public transport is necessary to solve parking issue