अरविंदांजली...

श्रीनिवास साने, बोस्टन(अमेरिका)
सोमवार, 30 जुलै 2018

आयुष्य हसत हसत जगावे कसे हे त्यांच्याकडूनच शिकावे. त्यांचे बँक ऑफ बरोडा वरचे प्रेम, नाटकांवरची भक्ती, नाविन्याची आवड, अशा अनेक गोष्टींमुळे त्याचा मित्रवर्ग अफाट होता.

My Father, the hero. तसे हिरो वगैरे काही नाही कारण मला बाबा (अरविंद साने) हे कायम बाबाच वाटले. अर्थात वेगवेगळ्या आठवणीत बाबा आहेत. कधी रुबाबदार बँक एक्झिकेटीव च्या रुपात तर कधी वेगवेगळ्या नाटकांच्या पात्रांच्या रुपात, कधी एकाग्र होऊन लेखन करताना तर कधी मंडईतून फळे-भाज्या आणताना. बाबांना जाऊन आज बरोबर एक वर्ष झाले आणि त्यांच्या आठवणी उफाळून आल्या. लहानपणी नुमवीत शिकल्याप्रमाणे 'हाती घ्याल ते तडीस न्या' हे ब्रीद वाक्य त्यांनी कायम आचरणात ठेवले आणि अगदी शेवटपर्यंत शारीरिक त्रासांनी कंटाळून न जाता कुठल्या ना कुठल्या गोष्टीत स्वत:ला रमवून ठेवले. आयुष्य हसत हसत जगावे कसे हे त्यांच्याकडूनच शिकावे. त्यांचे बँक ऑफ बरोडा वरचे प्रेम, नाटकांवरची भक्ती, नाविन्याची आवड, अशा अनेक गोष्टींमुळे त्याचा मित्रवर्ग अफाट होता. त्यांच्या यात्रेचा आरंभ लहानपणाच्या कष्टमय जीवनापासून झाला आणि स्वकर्तृत्वाने त्यांनी त्यांचे विश्व निर्माण केले. त्यांना यात महत्वाची साथ मिळाली ती आईची. 

आज आम्ही जे काही आहोत आणि जे काही चांगले करू शकलो आहोत ते आई-बाबांमुळेच. माझ्याकडून झालेल्या चुका त्या सर्वस्वी माझ्या आहेत. माझे आणि बाबांचे खटके झोंबा-झोंबीच म्हणायला पाहिजे तर बऱ्याच वेळा झाली. बरोबर कुणाचेही का असो, पण त्यांना मी फार फार दुखावले हे शल्य मला कायम राहील. त्याचबरोबर दुसरे शल्य राहिले आहे ते म्हणजे, जेवढे त्यांच्याकडून नाटकांबद्दल शिकता आले असते तसे न करून घेतल्याबद्दल. दिव्याखाली अंधार म्हणतात तो यालाच. बोस्टन ला २०१३ मध्ये झालेल्या मे महिन्याच्या नाट्यमहोत्सवात त्यांच्या मार्गदर्शनाखाली 'नाट्य-प्रवेशांचा गजरा' हा प्रयोग सादर केला. त्यात त्यांनी नटसम्राट मधील भूमिका केली. यासाठी करताना होणाऱ्या प्रॅक्टीसच्या वेळी त्यांच्यातील नटाच्या सामर्थ्याची कल्पना आली. एका मित्राच्या आईने येऊन कळकळीने सांगितले की 'काळजी घ्या हो स्वत:ची, कारण या वयात सुद्धा तुम्ही ज्या ताकदीने आणि प्रभावीपणे भूमिका सादर करताहात ते एखाद्या तरुण कलाकाराला पण लाजवणारे आहे'. नाटकाच्या शेवटी त्यांचा नटसम्राटचा प्रवेश असायचा आणि त्यानंतर भैरवी. तर बाबांचा प्रयोग पाहून भैरवी म्हणणाऱ्या गायिकेला कायम रडायला यायचे आणि भैरवी गाऊच शकायची नाही. शेवटी खऱ्या प्रयोगाच्या दिवशी, तिने बाबांचा प्रयोग संपेपर्यंत कान आणि डोळे बंद ठेवले आणि सुरेख भैरवी गाऊन प्रयोगाचा शेवट केला.

बँक ऑफ बरोडाने बाबांना खूप समाधान दिले आणि त्यांचे बँकेवर खूप प्रेम होते. अजूनही त्यांच्या हाताखाली तयार झालेली व त्यांना मानणारी खूप माणसे भेटतात. त्यांच्यामुळेच लहानपणी आम्हाला वेगवेगळी गावे, देश पाहायला मिळाले. अनेक मित्र झाले. काही दिवसांपूर्वी भारताच्या ट्रीपमध्ये पुण्याहून मुंबईला जाताना पनवेल आणि कल्याणला थांबलो. तिथल्या माझ्या शाळेतल्या अनेक मित्रांना भेटलो. कल्याणच्या एका मित्राला, जो माझ्याबरोबर दुसरी ते पाचवी मध्ये होता, त्याला बाबांच्या 'ज्ञानदीप' या जुन्या टीव्ही सीरिअलची आठवण झाली. जी मी पण विसरलो होतो. थोडक्यात बाबांचा ठसा माझ्या मित्रवर्गावर पण होता. जुलै २०१६ मध्ये बाबांच्या पंचाहत्तरावी निमित्त काही जवळचे आप्तेष्ठ आणि मित्र यांना बोलावून त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे उद्घाटन केले. तेव्हा प्रत्येकाने हिरीरीने सहभाग घेतला. ईशानने सादर केलेला अभंग, प्रियांका-अनुष्काने 'मेरे हाथोंमे नौ नौ चुडिया है' गाण्यावर केलेला नाच, माधवीने म्हटलेली नाट्य-संगीते, सानिका-परागने सादर केलेला कौंतेय, नाटकातील कुंती-कर्णाचा प्रवेश, सुधीर-दिलीप काकाने सांगितलेल्या आठवणी, अशा साऱ्याच गोष्टींनी तो कार्यक्रम कायम लक्षात राहील. पण सगळ्यात जास्त काय लक्षात राहील ते म्हणजे बाबांच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद आणि त्यांचा डोळ्यांमधले दिसलेले समाधान.

गेल्या वर्षी जुलै २०१७ मध्ये सचिनकडे California ला असताना बाबांना हाताला इन्फेक्शन झाले आणि २५ जुलैला त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले. त्या आजारातून शेवटी ते उठलेच नाहीत. जणू त्यांना स्वत:ला माहित होते की त्यांची इहलोकाची यात्रा आता संपली आहे. २७ तारखेपासूनच 'मला आता जाऊ द्या' असे सांगत होते. या त्रासातून उठले तरी त्यांना अधिक परावलंबी व्हावे लागेल आणि आपल्यापासून दुसऱ्याला अजून त्रास होईल या विचारांचाच त्यांना जास्त त्रास होत होता. रात्री उशिरा त्यांना गुडनाईट म्हणून सचिनच्या घरी झोपायला गेलो आणि २८ ला पहाटे पहाटे हॉस्पिटल मधून फोन आला की, 'मिस्टर साने इज नॉट रिसपाँडिंग'... 

arvind sane

आम्ही धावत तिथे गेलो तर श्वास चालू होता. पण डोळे सताड उघडे. एका तासानंतर ते परत शुद्धीवर आले आणि आमच्या सगळ्यांशी व्यवस्थित बोलू लागले. जणू काही शेवटचा गुडबाय करायलाच परत आले. पण अखेर दुपारी चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. माझे भाग्य की या त्यांच्या शेवटच्या क्षणात मला त्यांच्याबरोबर थोडा का होईना वेळ घालवता आला. ते आयुष्य खऱ्या अर्थाने पूर्णपणे जगले. त्यांना जाऊन एक वर्ष झाले (14 नोव्हें 1940 ते 28 जुलै 2017).  त्यांच्या असण्याची, त्यांच्या प्लॅनिंगची, त्यांच्याकडून नाटक-शास्त्रीय संगीत विषयातील नवनवीन गोष्टी ऐकण्याची आयुष्यभर झालेली सवय या माझ्या उर्वरित आयुष्यात पुसली जाणार नाही हे नक्की. त्यांच्या या स्मृतीला माझे कोटी कोटी नमस्कार.

Arvind Sane

arvind sane


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shreenivas Sane tribute to his Father By writing article