esakal | अत्यवस्थ अवस्थेतही नवाज शरीफ यांनी अदृश्य शक्तीबरोबरचा आपला लढा चालूच ठेवला आहे

बोलून बातमी शोधा

special article translated by Sudhir Kale on Nawaz Sharif

कठपुतळी सरकार आपल्या इच्छेनुसार नाचविणार्‍या पडद्यामागील अदृश्य शक्तींपुढे झुकण्यास नकार दिल्यामुळे शरीफ यांना खूप जबरदस्त किंमत मोजावी लागणार आहे हे दिसतच होते.

अत्यवस्थ अवस्थेतही नवाज शरीफ यांनी अदृश्य शक्तीबरोबरचा आपला लढा चालूच ठेवला आहे
sakal_logo
By
सुधीर काळे sbkay@hotmail.com

लाहोरच्या सैनिकी इस्पितळात दाखल केल्यानंतरही पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रकृती झपाट्याने खालावत जात असून ते सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर इस्पितळात इलाज होत असूनही त्यांच्या प्लेटलेट्सची संख्या धोकादायक पातळीपर्यंत खाली घसरली असून ती सुधारण्याचे नांवही घेत नाही आहे.

कठपुतळी सरकार आपल्या इच्छेनुसार नाचविणार्‍या पडद्यामागील अदृश्य शक्तींपुढे झुकण्यास नकार दिल्यामुळे शरीफ यांना खूप जबरदस्त किंमत मोजावी लागणार आहे हे दिसतच होते. गेला आठवडाभर शरीफ यांचे खासगी वैद्यकीय चिकित्सक डॉ. अदनान खान आपल्या रुग्णाच्या झपाट्याने खालावणार्‍या तब्येतीबद्दल संबधित अधिकार्‍यांना सातत्याने लेखी कळवत आलेले आहेत त्यांच्या पण जिवाला धोका निर्माण होई पर्यंत कुणी त्यांच्या माहितीकडे गंभीरपणे लक्षच दिले नव्हते.

शरीफ अद्यापी इस्पितळात आहेत आणि आता “पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ” या राजकीय पक्षाचे सरकार आणि त्यामागील अदृश्य शक्ती या दोघांनीही आता बचावात्मक पवित्रा घेतला आहे कारण आता त्यांच्या लक्षात आलेले आहे कीं जर शरीफ यांच्या जिवाचे कांहीं बरे-वाईट झाले तर पाकिस्तानमध्ये गंभीर अराजक माजण्याची शक्यता आहे! शरीफ यांच्या “पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज” या राजकीय पक्षाचे एक ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री ईशाक दार यांनी लंडनहून या वार्ताहाराशी बोलताना सांगितले कीं सध्याच्या सरकारच्या बेजबाबदारी आणि सद्यपरीस्थितीची चुकीची हाताळणी यामुळेच शरीफ यांची तब्येत मृत्यूला तोंड द्यावे लागण्याइतकी गंभीर झालेली आहे. वैद्यकीय दृष्ट्या ते अत्यंत अत्यवस्थ स्थितीत आहेत.

दार पुढे म्हणाले की शरीफ यांना लवकरात लवकर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार-पाकिस्तानात किंवा परदेशी-दिले गेले पाहिजेत. पाकिस्तानमधील पडद्यामागील अदृश्य शक्तींनी केलेल्या फाजील साहसीपणामुळे व राजकीय नाट्यामुळेच शरीफ यांना केवळ मृत्यूच्या दारात उभे करण्यात आलेले आहे इतकेच नव्हे तर त्यांच्या या कृत्यांमुळे त्यांनी पाकिस्तानला एका खूप धोकादायक अशा खाईच्या कडेवर उभे केलेले आहे.

या पडद्यामागील अदृश्य शक्तींकडून व त्यांच्या सहयोग्यांकडून असे अपमानित केले गेलेले व प्राणघातक स्थितीत घातले गेलेले शरीफ हे कांहीं पहिलेच पंतप्रधान नाहीं आहेत. महंमद अली जिन्नांच्या भगिनी फातिमा जिन्ना यांचा संशयात्मक मृत्यूच्या घटनेपासून ते फासावर चढविले गेलेले भुत्तो, पाठोपाठ खून करवून ठार मारण्यात आलेल्या बेनझीर भुत्तो यासारख्या घटनांकडे पाहाता रीतसरपणे निवडून आलेल्या नेत्यांनाच पाकिस्तानमधील या पडद्यामागील अदृश्य शक्तींकडून लक्ष्य करण्यात येते हेच दिसून येते. हे नेते म्हणजे ज्यांनी या अदृश्य शक्तींनी निर्मिलेल्या आणि जनतेवर जबरदस्तीने लादलेल्या शोषक अशा राजकीय आणि सामाजिक व्यवस्थांना आव्हान दिले होते ते नेते. असे असले तरी पंजाब प्रांतात या अदृश्य शक्तीच्या विळख्याला केवळ आव्हान देणारेच नव्हे तर प्रतिष्ठानाची पकड ढिली करणारे शरीफ हेच पहिले लोकप्रिय नेते आहेत. यापायीच आज ते आज अत्यवस्थ स्थितीत आजारी असून त्यांची मुलगी, मर्यम नवाज, तुरुंगात खितपत पडलेली आहे.

या उलट देशद्रोहाचे आरोप ठेवण्यात आलेला माजी हुकुमशहा ज. मुशर्रफ हा परदेशात मोकाट उंडारतो आहे आणि दुबळी पाकिस्तानी न्यायसंस्था त्याला योग्य शिक्षा ठोकण्यास हतबल, असहाय्य आहे असेच दिसते. पाकिस्तानात सर्वप्रथम लष्करी कायदा (martial law) पुकारणार्‍या ज. अयूब खान यांच्यापासून ते पूर्व पाकिस्तानच्या पाडावातील मुख्य गुन्हेगार असणार्‍या ज. याह्या खान व तिथून सध्या फरारी असलेल्या ज. मुशर्रफ यांच्यापर्यंतचा इतिहास पाहाता प्रत्येक हुकुमशहा स्वत:ला कायद्यापेक्षा श्रेष्ठच मानत गेलेला आहे असे दिसते! उलट लोकांतर्फे निवडून आलेल्या प्रत्येक नेत्याला जरी फाशी दिले गेले नसले वा त्यांचा खून करण्यात आलेला नसला तरी शक्तिशाली प्रचारयंत्रणेद्वारा त्यांनाच भ्रष्ट किंवा देशद्रोही ठरविण्यात आलेले आहे.

असे असले तरी नवाज शरीफ यांनी असे कांहीं अनुकरणीय धैर्य दाखविलेले आहे की जे हुकुमशाहांनासुद्धा जमलेले नाहीं. “पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज” पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि शरीफ यांचे निकट सहाय्यक असलेले सिनेटर मुशाहिदुल्ला खान यांनी या वार्ताहाराला सांगितले कीं “शरीफ यांनी परदेशी जाण्यास नकार दिला आहे आणि या सर्वशक्तिमान मंडळींना स्पष्टपणे सूचित केले कीं ते उपचारासाठी परदेशी जाणार नाहींत व त्यांचे निरपराधित्व इतिहासच ठरवेल.” ही एकाद्या शरीफ यांच्यासारख्या मुलकी नेत्याने दाखविलेली एक असाधारण चिकाटी असून त्यातून लोकतंत्राच्या सर्वश्रेष्ठतेवर असलेला त्यांचा दृढ विश्वासच दिसून् येतो आणि पडद्यामागील या अदृश्य शक्तींच्या प्रचारयंत्रणेपुढे न नमता जनतेने निवडून दिलेले हे सर्व नेते सर्व अडचणींवर मात करून कसे शौर्याने कसे लढत आहेत हेही दिसून येते.

शरीफ यांना दिलेल्या अमानुष वागणुकीमुळे “पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज” पक्षाच्या मतदारवर्गाला संताप आलेला असून तो संताप सर्वत्र, अगदी चहाच्या छोट्या टपर्‍यांपासून ते उपहारगृहांपासून ते लोकांच्या दिवाणखान्यांतही दिसत आहे आणि या सर्व जागांवर चर्चेचा विषय एकच आहे: नवाज शरीफ यांचा प्रतिकार आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे आणि पडद्यामागील प्रतिष्ठानाचे भवितव्य.

पण मर्यामच्या अनुपस्थितीत शरीफ यांचा राजकीय पक्षच बिनदातांचा वाटू लागला आहे कारण त्यांच्या सध्याच्या नेतृत्वात नवाज व मर्याम यांच्यासारखी लोकांना आपल्याकडे खेचण्याची शक्तीही नाहीं किंवा त्याच्यासारखा प्रतिकाराचा धोकादायक रस्ता पत्करण्याचे धैर्यही नाहीं. खरे तर नवाज यांना त्यांचा भाऊ शहाबाज व त्या पक्षाच्या इतर नेत्यांनी उपचारासाठी परदेशी जाण्याचा सल्ला दिलेला आहे. आपल्या वडील भावाच्या सर्व शिक्षा त्याच्या तब्येतीकडे पाहून रद्द केल्या जाव्यात याबाबत इस्लामाबाद उच्च न्यायालयात सध्या शहाबाज यांनी केलेल्या अपीलवर सुनावणी सुरू आहे आणि ज्या निकडीने या न्यायालयाने हे अपील सुनावणीसाठी घेतले आहे त्यावरून ही अदृश्य शक्ती आणि सध्याचे सरकार दोघांनाही आपली मलीन झालेली प्रतिमा स्वच्छ करावयाची आहे आणि शरीफ यांचे कांहीं बरे-वाईट झाले तर त्यांचे वैद्यकीय उपचार व्यवस्थितपणे व्हावेत म्हणून त्यांनी सर्व प्रयत्न केले होते अशी समजूत या दोघांना जनमानसांत निर्माण करावयाची आहे.

तीन वेळा पंतप्रधान म्हणून निवडून आलेल्या शरीफ यांना न्यायालयाच्या एका विवादाग्रस्त निकालाद्वारे तुरुंगवासाला तोंड द्यावे लागले कारण त्यांनी अदृश्य प्रतिष्ठानाने दिलेला हुकूम पाळावयास नकार दिला म्हणून! अन्य कुठलेही फॅसिस्ट सरकार वा अन्य कुठलीही लष्करशाही इतक्या हीन पातळीवर कधी पोचली नसेल आणि ते करताना ते दोघे हेही विसरले आहेत कीं जर शरीफ यांचे कांहीं बरे-वाईट झाले तर परिणामत: पाकिस्तानचे केंद्रीय सरकारच कमजोर होईल! जोपर्यंत मर्यम आहे तोपर्यंत या अदृश्य प्रतिष्ठानाला तिला विजयापासून दूर ठेवणे शक्य होणार नाहीं मग  ’पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज’ पक्षाच्या नेतृत्वाची दुसरी फळी कितीही कमजोर असो! कारण तिचे वडील नवाज यांच्याचप्रमाणे तिच्याकडेही जनसमूहाला प्रचंड प्रमाणावर रस्त्यावर खेचण्याची शक्ती आहे व तिच्याकडे या अदृश्य प्रतिष्ठानाला तोंड द्यावयाची हिंमतसुद्धा आहे.

’बिकाऊ’ प्रसारमाध्यमांतून कितीही उलटा प्रचार केला जात असला तरी पाकिस्तानमधील राजकीय परिस्थिती मुळीच सर्वसामान्य नाहीं आहे. शरीफ यांची अत्यवस्थ स्थिती, फजल-उर्-रहमान यांचा इस्लामाबादवर प्रचंड मोर्चा नेण्याचा संकल्प (आज २ नोव्हेंबर २०१९ रोजी हा मोर्चा इस्लामाबाद शहराच्या सीमेवर पोचला आहे), आणि इम्रान खान यांच्या “पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ” या पक्षाविरुद्धची परदेशातून आलेल्या पैशाबद्दलच्या ’पाकिस्तानी निवडणूक आयोगा’ने घातलेल्या खटल्याची सुनावणी एकाएकी जलद गतीने सुरू होणे या सर्वांतून हे लक्षात येत आहे कीं वार्‍याची दिशा बदलली आहे. आतल्या गोटांतून मिळणारी बातमी जर खरी असेल तर नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये अदृश्य शक्तीकडून इम्रान खान यांना राजीनामा देण्यास संगण्यात येईल किंवा त्यांच्या सरकाराविरुद्ध पाकिस्तानी लोकसभेत अविश्वासाचा ठराव मांडण्यात येईल.

मग एक प्रश्न उपस्थित होतोच कीं शरीफ यांनी व मर्यम यांनी हा अतीशय खडतर आणि धोक्याचा मार्ग निवडला तो काय प्रतिष्ठानाचे केवळ एक प्यादे बदलण्यासाठी कीं त्यांनी हा मार्ग या प्रतिष्ठानाला बुद्धिबळपटावरून कायमचे उखडून टाकण्यासाठी पत्करला आहे? याचे उत्तर स्पष्ट आहे! शरीफ किंवा मर्यम हे दोघांनाही प्यादे बदलण्यात किंवा आपल्या पक्षाच्या पाठिंब्याने आणखी एक नवे प्यादे गादीवर बसविण्यात कांहींच स्वारस्य वाटत नाहीं.

शरीफ यांच्या ’पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज’ मधील दुफळीमुळे तो जास्त पीडित होईल कीं अदृश्य प्रतिष्ठानाच्या  उच्चपदस्थांमधील दुफळीमुळे अदृश्य शक्ती जास्त पीडित होईल हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाहीं. लोकतंत्राच्या सर्वश्रेष्ठतेच्या लढ्यापुरताच विचार केल्यास इम्रान खान तर पहिल्या दिवसापासूनच नगण्य, क:पदार्थच आहेत.

सध्यापुरता विचार केल्यास शरीफ हे या प्रतिष्ठानाच्या प्रत्येक जाचक चालीचा प्रतिकार स्वत:चा जीव धोक्यात घालून करत आहेत आणि आपल्या वैद्यकीय इलाजासाठी परदेशी जाण्यास नकार देत आहेत. स्रोतांकडून आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी सरकार वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांनी उपचारांसाठी लंडनला जावे म्हणून मन वळविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण शरीफ यांनी परदेशी जाण्याचा प्रत्येक प्रस्तावाला आणि त्यांच्यावर आणल्या जाणार्‍या दडपणाला नकार दिल्यानंतर त्यांच्या भावाने त्यांची शिक्षा वैद्यकीय कारणासाठी रद्द करण्यासाठी केलेल्या अपीलाची सुनावणीही संथ होऊ लागली आहे. असा अंदाज होता कीं तो निकाल एकाद्या दिवसात घोषित केला जाईल, पण आता शरीफ यांनी प्रत्येक सूचना किंवा दडपण अव्हेरल्यानंतर न्यायालयालासुद्धा आपला निर्णय लांबविणे जास्त सोयीचे वाटले आहे.

असे असले तरी शरीफ त्यांच्या सध्याच्या अत्यवस्थ स्थितीत पाकिस्तानातच राहिले किंवा वैद्यकीय उपचारांसाठी परदेशी गेले तरी फारसा फरक पडणार नाहीं कारण या अदृश्य शक्तीनी त्यांना त्यांचे निवडणुकीतील यश मिळू न देण्यासाठी आणि एका राजकीय खेळी द्वारा इम्रान खान यांना पंतप्रधान म्हणून पाकिस्तानी जनतेवर लादण्यासाठी जो कांहीं गोंधळ घालून ठेवला आहे तो इतक्या सहजा-सहजी स्वच्छ होणे शक्यच नाहीं.

इतक्या अत्यवस्थ स्थितीत मृत्यूशी झुंज देत एका इस्पितळातील गादीवर पडलेले असतानासुद्धा शरीफ यांनी आपले नांव जे राजकीय नेते परिणामांची पर्वा न करता प्रतिष्ठानाला सामोरे गेले त्या यादीत लिहिलेले आहे तर याच प्रतिष्ठानाने पुढे केलेल्या सिंहासनावर स्थानापन्न होऊन इम्रान खान यांनी अशगर खानप्रमाणे असा मार्ग निवडला आहे की ज्यामुळे ते यथावकाश कचर्‍याच्या टोपलीतच फेकले जातील.

दरम्यान प्रतिष्ठानाने केवळ आपल्या अहंभावाचे समाधान करण्यासाठी आगामी पाकिस्तानी पिढ्यांना एक त्यांनीच निवडलेला पंतप्रधान कसा जाणून-बुजून मृत्यूच्या दरवाजापर्यंत पोचविला याबाबत आणखी एक ताकीद देऊन टाकलेली आहे. इतिहास नेहमीच शूर लोकांची स्मृती जपतो व जुलमींना ठुकरावून देतो हे उघड झालेले आहे.

(मूळ लेखक : इमाद जाफर. या लेखाचे मूळ लेखक इमाद जाफर वृत्तपत्रांत लिहिणारे एक स्तंभलेखक व समालोचक असून दूरचित्रवाणी, आकाशवाणी, वृत्तपत्रें, वृत्तसंस्था आणि राजकीय, धोरणविषयक व प्रसारमाध्यमांशी निगडित अशा विचारमंथन करणार्‍या संस्थांशी ते निगडित आहेत. हा लेख सर्व प्रथम एशिया टाईम्स या वृत्तपत्रांत २५/१०/१९ रोजी प्रसिद्ध झाला.)