इराण-चीनच्या कात्रीत पाकिस्तान; इम्रान खान यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह (सुधीर काळे)

सुधीर काळे
Saturday, 4 May 2019

डॉ. जेम्स डॉर्सी यांनी पाकिस्तानमधील अंतर्गत परिस्थितीवर परखड भाष्य करणारा एक अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. त्यांच्या संमतीने सुधीर काळे यांनी केलेला त्या लेखाचा अनुवाद! मूळ लेख येथे वाचता येईल.

डॉ. जेम्स डॉर्सी यांनी पाकिस्तानमधील अंतर्गत परिस्थितीवर परखड भाष्य करणारा एक अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. त्यांच्या संमतीने सुधीर काळे यांनी केलेला त्या लेखाचा अनुवाद! मूळ लेख येथे वाचता येईल.

 

No photo description available.

आकृती-१

पाकिस्तानच्या बलुचिस्तान या अशांत प्रांतात दोन आठवड्यात झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांमुळे येथील राजकीय हिंसाचाराला आटोक्यात आणण्यात देशाच्या सरकारला यश येईल या आशेवर पाणी पडले आहे. या हल्ल्यांनी अशा भौगालिक स्थानावर आधारलेल्या राजकीय प्रश्नांवर तारेवरील कसरत करण्याच्या पाकिस्तानी सरकारच्या क्षमतेबद्दलही नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Image may contain: one or more people and crowd

आकृती-२

पाकिस्तानी पंतप्रधान इराणच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर निघायच्या काही दिवसच आधी झालेल्या या हल्ल्यांनी पाकिस्तानच्या दोन समस्यांना अधोरेखित केले आहे. एक आहे सौदी अरेबिया व इराण यांच्यामधील दोघांना अशक्त करणारे वैर व दुसरी आहे ४५०० कोटी डॉलर्सच्या रस्ते-जलमार्ग उपक्रमाशी संबंधित असलेल्या चीनच्या गुंतवणुकींचे (कर्जाचे) तंट्यांपासून व बलुच राष्ट्रवादी आकांक्षांपासून संरक्षण करणे.

१२ एप्रिल रोजी झालेल्या बॉम्बहल्ल्याचे मुख्य लक्ष्य जरी हजारा बाजार असले तरी त्या मागील हेतू या व्यापार्‍यांची वांशिक भिन्नता हा नव्हता तर ते मुख्यत्वे शिया पंथीय असल्याचा होता. हे शियापंथीय त्यांच्या स्वत:च्या वेगळ्या धार्मिक श्रद्धांमुळे गेली कित्येक वर्षें जणू वेढलेच गेलेले होते. या बॉम्बहल्ल्यात १९ लोक मृत्युमुखी पडले व डझनावारी जखमीही झाले.

सहाच दिवसांनंतर बलुच राष्ट्रवाद्यांनी पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या १४ जवानांना किनारी महामार्गावर ठार मारले. त्यामुळे चिनी सरकारला आपल्या देशातील कामगारांच्या सुरक्षेबद्दल व आपल्या रस्ते-जलमार्ग उपक्रमातील मुकुटमणी असलेल्या बलुचिस्तानमधील गुंतवणुकीबद्दल नव्याने चिंता निर्माण झाली.

बलुचिस्तानमधील व ९६० किमी लांबीच्या इराण-बलुचिस्तान सीमेवरील वाढता तणाव आपल्या तेहरानच्या भेटीतील चर्चेमुळे कमी होईल, अशी आशा इम्रान खान यांना आहे. याशिवाय या आठवड्यात नंतर वरिष्ठ चिनी अधिकार्‍यांबरोबर रस्ते-जलमार्ग उपक्रमाच्या व्यासपीठावर व्हावयाच्या चर्चेआधी बलुचिस्तानमधील हे तणाव कमी करणे अत्यावश्यक आहे, याचीही इम्रान खान यांना जाणीव आहेच.

हा वाढता तणाव आणि इम्रान खान यांच्या तेहरान व बीजिंग येथील चर्चा अमेरिका व सौदी अरेबिया यांच्यामधील उद्दिष्टांबद्दलच्या वाढत्या संशयांच्या पार्श्वभूमीवर होत आहेत. [१]

अनेक विश्लेषकांना या महिन्यात अमेरिकेने इराणच्या ’रिव्होल्यूशनरी गार्ड्स’चे आतंकवादी असे वर्गीकरण केल्याने हा तणाव निर्माण झाला आहे, असे वाटते. या निर्णयाला सौदी अरेबियाचाही पाठिंबा आहे. या निर्णयामुळे एखा्या वेळी लष्करी मुकाबला होण्याचीही शक्यता आहे आणि त्यामुळे पुढे या दोन देशांना वाटाघाटींसाठी एका टेबलवर आणणेही गुंतागुंतीचे ठरणार आहे.

बलुचिस्तानच्या सीमेपलीकडे असलेल्या इराणच्या प्रांताचे नांव आहे “सिस्टन”. सीमेच्या इराणच्या बाजूलाही बलोच लोकांचीच वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. पाकिस्तान-स्थित बलुच मुक्ती आघाडी (BLF) व बलुच मुक्ती सेना (BLA) यांचे सिस्टन प्रांतात बर्‍यापैकी अस्तित्व आहे. बहुसंख्य शिया लोकसंख्या असलेल्या इराण सरकारने या संघटनांवरील आपली पकड ढिली केल्यामुळे या पाकिस्तानी सुरक्षाकर्मींची बलोचिस्तानमध्ये हत्या झाली असावी, असे काही पाकिस्तानी अधिकारी तसेच काहीं बलुची कार्यकर्ते सुचवितात.

हा हल्ला ज्या संघटनांनी केला त्यांना या हल्ल्यासाठीचे प्रशिक्षण व मदत इराणमध्ये अस्तित्व असलेल्या संघटनांनी दिला असल्याचा पुरावा पाकिस्तानकडे असल्याचा उल्लेख पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरेशी यांनी केला.

पाकिस्तानी बलुचिस्तानमध्ये अस्तित्व असलेल्या व सौदी सरकारचा पाठिंबा असलेल्या सुन्नी दहशतवाद्यांकडून जे हल्ले सिस्टनमध्ये होत आहेत त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने हे पाऊल उचलले असावे असे पाकिस्तानला वाटते. या हल्ल्यांमध्ये चाबहार बंदरावर डिसेंबरमध्ये रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या मुख्यालयाला लक्ष्य करून केलेला आत्मघाती बॉम्बरने केलेला हल्ल्याचाही समावेश आहे! या हल्ल्यात दोन लोक मृत्युमुखी पडले होते तर ४० जखमी झाले होते.

चाबहार हे भारताच्या मदतीने बांधलेले (व चालविले जाणारे) बंदर असून ते चिनी मदतीने व पैशाने बांधलेल्या ग्वादर या बंदरापासून अरबी समुद्राच्या बाजूने फक्त ७० किमी दूर आहे (नकाशा पाहा).

सौदी अरेबियन सरकारचा पाठिंबा असलेली जैश-ए-आदेल [२] (न्यायाची सेना) पाकिस्तानच्या बाजूला कार्यरत आहे असे इराणचे ठाम मत आहे. इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या २७ सैनिकांना फेब्रुवारीमध्ये मारल्याचा दावा याच सेनेने केला होता. या मनुष्यसंहाराचा बदला त्याचा सूत्रधार, त्याचे पुरस्कर्ते व या हत्याकांडात गुंतलेल्या व्यक्तींवर घ्यायची शपथ या हल्ल्यानंतर इराणच्या गुप्तहेर खात्याचे मंत्री महमूद अलावी यांनी घेतलेली होती.

आर्थिक आपत्तीत सापडलेल्या कंगाल पाकिस्तानला ६०० कोटी डॉलर्सची आर्थिक मदत देऊन व बलुचिस्तानमध्ये आणखी १००० कोटी डॉलर्सची आर्थिक गुंतवणूक करण्याचे आश्वासन देऊन पाकिस्तानला आपल्याकडे वळविण्यात सौदी अरेबिया यशस्वी झाल्याच्या समजुतीने या घटनेकडे इराण वाढत्या काळजीने पाहत आहे.

बलुचिस्तानस्थित शियाविरोधी व इराणविरोधी दहशतवाद्यांना सौदी अरेबियाकडून येणार्‍या आर्थिक मदतीची वाहिनी असल्याची शंका असलेल्या (व बंदी घातलेल्या) रमझान मेंगल या एका पंथाच्या नेत्याला हजारा बाजारावरील हल्ल्याच्या दोनच दिवस आधी पाकिस्तान सरकारने तुरुंगातून मुक्त केले होते, ही बाब इराण सरकारच्या लक्षात येणारच होती.

दाढी वाढविलेला व दहशतवादी असलेला रमझान मेंगल हा एक इस्लाम धर्माचा अभ्यासक असून त्याला सार्वजनिक शांततेचा भंग केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानने तीन महिन्यांपासून कैदेत ठेवले होते असे अब्दुल रझ्झाक चीमा या क्वेट्टा पोलिस दलाच्या प्रमुखाने सांगितले.

बंदी घातल्या गेलेल्या सिपाह-ए-सहाबा या संघटनेचा वारस समजल्या जाणार्‍या अहले सुन्नत वल जम्मात (ASWJ-प्रेषिताच्या मित्रांची सेना) या गटाच्या बलुचिस्तान विभागाचे रमझान मेंगल हे प्रमुख समजले जातात. गेल्या तीस वर्षात अनेक शिया पंथियाच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा संशय याच गटावर आहे.

याच सिपाहची एक शाखा असलेल्या ’लश्कर ए झांगवी’ या ’अल कायदा’शी व ’इस्लामिक स्टेट’शी संबंध असलेल्या संघटनेचाही तो नेता आहे. या संघटनेने अलीकडेच मारल्या गेलेल्या २०० शिया पंथीय हजारांच्या हत्येची जबाबदारीही घेतली आहे.

सिपाहच्या एका संस्थापकानुसार व इतर दहशतवाद्यांच्या सूत्रांनुसार बलोची परंपरेच्या व आखाती राष्ट्रांचे नागरिक असलेल्या अनेकांनी आपल्या राज्यात कमावलेले (वा उभे केलेले) पैसे रमझान मेंगल यांना वा इतर आतंकवादी विद्वत्त्यांना पाठविले आहेत. हे पैसे त्यांनी हवाला मार्गे किंवा मध्यपूर्वेत व दक्षिण आशियात असलेल्या वित्त-विनिमय संस्थांमधून पाठविलेले आहेत. या सहसंस्थापकाने सांगितले की रमझान यांना त्यांच्या मागणीनुसार हवे तितके पैसे सौदींच्याकडून मिळतात.

पारंपरिक पांढरा पोषाख, कमरेपर्यंत येणारा कोट व काळे पागोटे अशा वेशातील मेंगल हे खूपदा बलोचिस्तानची राजधानी असलेल्या क्वेट्टा या शहराच्या रस्त्यावरून पांथिक घोषणा देत जाताना अनेकांनी पाहिले आहे.

हजारा शियांच्या मृत्यूंसाठी अनेकदा संशयित असलेला रमझान मेंगल “काफिर, काफिर, शिया काफिर” अशा घोषणा देत अनेक लोकांच्या मिरवणुका रस्त्यावरून नेत असे; पण अलीकडे तो पाकिस्तानच्या तिरस्कारविरोधी भाषणे देण्याविरुद्धच्या
कायद्यांमुळे जरा काळजीपूर्वक वागू लागला आहे.

इम्रान खान यांची इराणभेट अगदी तोंडावर आलेली असताना रमझान मेंगल यांची तुरुंगातून अशी सुटका करणे हा इराणशी मैत्री करण्याच्या दृष्टीने योग्य संदेश पाठविला गेला नाही असेच वाटते.

पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरेशी यांनी महंमद जावाद जरीफ या इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांना फोन करून पाकिस्तानच्या सुरक्षा दलाच्या १४ सैनिकांच्या मृत्यूबद्दलचा पाकिस्तानी राष्ट्राचा संताप व्यक्त केला. इराण-पाकिस्तानच्या सीमेवर कुंपण बांधण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला असल्याचेही कुरेशींनी पुढे सांगितले व ज्या विभागाचा खूपदा दुरुपयोग केला जातो तेथे तर या कुंपणाच्या बांधणीला सुरवातही झालेली आहे असेही कुरेशी म्हणाले.

या कुंपणामुळे इराणबरोबरच्या सच्छिद्र सीमेवरील सुरक्षा नक्कीच सुधारेल पण या कुंपणामुळे बलोचिस्तानमधील हिंसाचार मोडून काढता येईल असे वाटत नाही. हा हिंसाचार मुख्यत्वे कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या पांथिक संघर्षामुळे सुरू झालेला आहे, त्यात सौदी-इराण यांच्यामधील स्पर्धेमुळे भर पडली आहे. बलोची लोकांच्या सामाजिक व आर्थिक मागण्यांकडे व त्यांच्या राजकीय आकांक्षांकडे झालेले दुर्लक्ष आणि चिनी व सौदी गुंतवणींमुळे आपला फायदा होण्याऐवजी आपण त्यांचा बळीचा बकराच होऊ ही बलोच लोकांना वाटत असलेली भीती हेसुद्धा कारण आहे.

पाकिस्तानी स्तंभलेखक असलेले नाझीर महमूद म्हणतात [३], “लोकशाही म्हणजे जीव, सुरक्षितता, संरक्षण, उपजीविकेसाठी लागणारे धन कमावणे व भीतीशिवाय शिक्षण मिळविणे या बाबींची हमी असणे. पांथिक संघटनांवर बंदी आणणे, त्यांना नि:शस्त्र करणे व त्याच बरोबार सरकारकडून आपल्या सर्व हक्कांबद्दल आदर राखून लोकशाहीला सदृढ करणे ही पावले टाकल्याने बलोचिस्तानमधील हिंसाचार कमी करण्यात वा संपविण्यात यश मिळेल.”

..................................................................................................

टीपा :

आकृती-२ मूळ लेखात असून आकृती-१ व आकृती-३ आंतरजालावरून घेतल्या आहेत.

[१] या दुव्यावर याची तपशीलवार माहिती उपलब्ध आहे.

[२] पाकिस्तानात ’जैश’ हा शब्द भलताच लोकप्रिय दिसतोय्!

[३] यांच्या “As Balochistan Bleeds” या लेखाचा अनुवादही प्रसिद्धीसाठी पाठोपाठ पाठवीत आहे.

अनुवादक सुधीर काळे यांचा ईमेल आयडी : sbkay@hotmail.com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Violence in Balochistan makes Pakistan PM Imran Khans tightrope walk difficult