बेळगाव: विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बीला परवानगी

बेळगाव: विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बीला परवानगी

बेळगाव : यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीत बेळगाव शहरात 2 बेस व 2 टॉपसह डॉल्बी वापरण्यास पोलिस आयुक्त टी. जी. कृष्णभट्ट यानी परवानगी दिली आहे. पण त्यावर 75 डेसीबलपर्यंतची मर्यादाही घालण्यात आली आहे.

तब्बल दहा अटी घालून पोलिस आयुक्तांनी 5 सप्टेंबरपासून 6 सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत डॉल्बी लावण्यास परवानगी दिली आहे. पण या डॉल्बीमुळे कोणताही अनुचीत प्रकार घडला तर संबंधित गणेशोत्सव मंडळासाठी ज्या पदाधिकाऱ्याच्या नावे परवानगी दिली असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 6 तारखेनंतर पुन्हा डॉल्बी बंदीचा आदेश कायम राहणार आहे. 

डॉल्बी बंदीचा विषय शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात गाजतो आहे. अशा स्थितीत बेळगावात मात्र पोलिसानी डॉल्बीबाबत सौम्य भूमिका घेतली आहे. बेळगावातील साऊंड ऍन्ड लाईट्‌स असोसिएशनतर्फे पोलिस आयुक्ताना निवेदन देण्यात आले होते. त्यात डॉल्बी वापरावर बंदी न घालण्याची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीची दखल घेवून यावेळी पोलिस प्रशासनाने अटी घालून डॉल्बी वापरण्यास मुभा दिली आहे. याबाबतचा आदेश 31 ऑगस्ट रोजी पोलिस आयुक्तानी बजावला आहे.

वस्तुतः डॉल्बी बंदीचा आदेश 4 जुलै रोजी बजावण्यात आला आहे. पण त्या बंदी आदेशातील काही तरतुदी शिथील करून यंदा डॉल्बीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणूकीत यंदा डॉल्बी वापरणे गणेशोत्सव मंडळांसाठी शक्‍य होणार आहे. 

पोलिस आयुक्तानी घातलेल्या अटींनुसार मिरवणूकीवेळी पोलिसांकडून दिलेल्या सर्व सूचनांचे पालन गणेश मंडळाना करावे लागणार आहे. 2 टॉप व 2 बेससह डॉल्बी वापरावी लागेल, आवाज 75 डेसीबलच्या पुढे जाता कामा नये.

कर्नाटक पोलिस कायदा 1963 मधील कलम 36 व 37 मधील तरतुदींचे उल्लंघन केले जावू नये असेही सांगण्यात आले आहे. मिरवणूकीच्या काळात शहरात जमावबंदी आदेश लागू झाला तर मात्र डॉल्बी वापरण्यास मुभा देणारा आदेश रद्द केला जाईल. डॉल्बीमुळे नागरीकाना त्रास होणार नाही याची दक्षता मंडळाना घ्यावी लागेल. मिरवणूकीत मद्यपान व धुम्रपान केल्यास कारवाई केली जाईल

मिरवणूकीवेळी कोणतेही स्फोटक पदार्थ बाळगले जावू नयेत, पण अग्नीशामक उपकरण मात्र प्रत्येक मंडळाने सोबत ठेवणे आवश्‍यक आहे. अन्य धर्मियांच्या भावना दुखावतील अशा प्रकारची गाणी वाजवू नये किंवा नृत्य करू नये. कायदा व सुव्यवस्थेचा भंग होईल असा कोणताही प्रकार करू नये असा इशाराही देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com