पुरामुळे कोल्हापूर - गगनबावडा रस्ता बंदच; असनिये - घारपी मार्गावर कोसळली दरड

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 September 2019

  • वैभववाडी जिल्ह्याला पावसाने झोडपले; जनजीवन विस्कळीत
  • पावसामुळे परतीच्या प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यांची कोंडी
  • असनिये - घारपी मार्गावर दरड कोसळली.
  • मांडकुली (ता. गगनबावडा) येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे तळेरे - कोल्हापूर मार्गावरील वाहतूक बंद
  • तिलारी नदीची पाणीपातळी इशारा पातळीच्या नजीक
  • जिल्ह्यातील चार तालुक्‍यांत आज सकाळी आठ वाजेपर्यंत 150 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद

वैभववाडी - जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे परतीच्या प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यांची कोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे असनिये-घारपी मार्गावर दरड कोसळली. मांडकुली (ता. गगनबावडा) येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तिलारी नदीची पाणीपातळी इशारा पातळीच्या नजीक पोचली आहे. जिल्ह्यातील चार तालुक्‍यांत आज सकाळी आठ वाजेपर्यंत 150 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. 

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शनिवारी सकाळपासून त्यात अधिकच वाढ झाली. शनिवारी रात्रभर तर संततधार सुरू होती. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. सतत पडणाऱ्या पावसामुळे असनिये-घारपी रस्त्यावर दरड कोसळली. दगडमाती आणि झाडांचा मोठा ढिगारा रस्त्यावर आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दोडामार्ग तालुक्‍यात सतत मुसळधार पाऊस पडत असून, तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे तिलारी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

तिलारी धरणाचे चारही दरवाजे दीड मीटरने उघडले असून, धरणातून 12 हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीची पाणी पातळी 41.300 मीटरपर्यंत पोहोचली आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 इतकी आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्यामुळे 15 दिवसांपूर्वीच पुराचा तडाखा बसलेल्या नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेला मुसळधार पाऊस आणि तेथील विविध धरणांतून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग, यामुळे गगनबावडा तालुक्‍यातील मांडकुली येथे पुराचे पाणी आज सकाळी पुन्हा रस्त्यावर आले. दोन ते तीन फूट पाणी रस्त्यावर असल्याने प्रशासनाने तळेरे-गगनबावडा मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. ही वाहतूक बंद करण्यापूर्वी शेकडो वाहने वैभववाडीतून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली होती. ही सर्व वाहने मांडुकलीत अडकली. तेथून सर्व वाहनांना माघारी पाठविण्यात आले.

काही वाहनचालकांनी आततायीपणा करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्या तो अंगलट आला. सध्या या मार्गावरील वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे. 

आज सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 121.82 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर जिल्ह्यातील कणकवली-163 मिलीमीटर, दोडामार्ग-160 मिलीमीटर, वेंगुर्ले-158.6 मिलीमीटर, वैभववाडी-157 मिलीमीटर या तालुक्‍यांमध्ये 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधारेने आज दुपारी बारा वाजल्यानंतर उसंत घेतली आहे. काही तालुक्‍यांत तासाभरासाठी सूर्यदर्शनही झाले. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाने उघडीप दिली होती. पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत होत्या; परंतु जोर कमी झाला आहे. 

चाकरमान्यांची कोंडी 
गणेशोत्सवाकरिता जिल्ह्यात लाखो चाकरमानी आलेले आहेत. काल (ता. 7) सायंकाळी गौरी-गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. बहुतांशी चाकरमानी तळेरे - कोल्हापूर मार्गे बेंगलोर-पुणे मार्गानेच प्रवास करतात. आज देखील हजारो चाकरमानी याच मार्गाने प्रवास करण्यासाठी निघाले होते. जिल्हाभरातून विविध गाड्यांतून निघालेले चाकरमानी वैभववाडीत आल्यानंतर त्यांना गगनबावडा - कोल्हापूर मार्गावर पाणी आल्याची माहिती देण्यात आली. या सर्व वाहनांना फोंडाघाटमार्गे राधानगरी-कोल्हापुर असा प्रवास करावा लागला. यामुळे चाकरमान्यांची मोठी कोंडी झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood water on Kolhapur - Gaganbawad Road