संगीत नाट्य स्पर्धा १ फेब्रुवारीपासून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

कोल्हापूर - राज्य कला संचालनालयातर्फे होणाऱ्या संगीत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी यंदा येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात रंगणार आहे. एक फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीअखेर राज्यभरातील २८ नाटकांचा सुरेल नजराणा या निमित्ताने येथील रसिकांना मिळणार आहे. 

कोल्हापूर - राज्य कला संचालनालयातर्फे होणाऱ्या संगीत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी यंदा येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात रंगणार आहे. एक फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीअखेर राज्यभरातील २८ नाटकांचा सुरेल नजराणा या निमित्ताने येथील रसिकांना मिळणार आहे. 

संगीत नाट्य स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात गेल्या वर्षी ज्या जिल्ह्यातील संस्थेने पहिला क्रमांक पटकावला, त्या जिल्ह्यात पुढील वर्षीच्या अंतिम फेरीचे केंद्र, असा अलिखित नियम होता. मात्र यंदापासून रोटेशन पद्धतीने केंद्राचा निर्णय झाला असून संचालनालयाने कोल्हापूरला पहिली पसंती दिली आहे. हौशी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रोटेशनने करतानाही कोल्हापूरलाच पहिली पसंती मिळाली होती.

मुंबईच्या यशराज प्रतिष्ठानच्या प्रदीप ओक लिखित ‘संगीत बैजू लीला’ या संगीत नाटकाने अंतिम फेरीचा पडदा उघडणार आहे. दररोज सायंकाळी सात वाजता प्रयोग होणार असून रत्नागिरीच्या आश्रय सेवा संस्थेच्या अमेय धोपटकर लिखित ‘संगीत लावण्यसखी’ या नाटकाने स्पर्धेची सांगता होईल.

सांगलीच्या देवल स्मारक मंदिर संस्थेचे ‘कथा ही बिसालखानी तोडीची’ हे नाटक २२ फेब्रुवारीला सादर होणार आहे. या संस्थेचे चंद्रकांत धामणीकर म्हणाले, ‘‘रत्नागिरीतून अंतिम फेरीच्या केंद्रासाठी यंदा मागणी होती. मात्र संचालनालयाने यंदापासून रोटेशन पद्धतीने केंद्राचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर केंद्राला आमची काहीही हरकत नाही. मात्र संगीत नाटकासाठी आवश्‍यक साहित्य संस्थांना या केंद्रावर उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. कारण कोकण आणि गोव्यातील बहुतांश सर्व नाटकं ही नेपथ्य मांडणीपेक्षा विविधरंगी पडद्यांच्या पार्श्‍वभूमीवर सादर होतात. त्यामुळे ही व्यवस्था अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्याशिवाय आणखी ज्या काही गोष्टी लागतील, त्याची यादी स्थानिक समन्वयकांकडे दिली आहे. त्याच्याही पुढे जाऊन जी काही मदत लागेल ती सांगलीतील रंगकर्मी नक्कीच करतील.’’

पंधराव्या बालनाट्य स्पर्धेत ‘ब्ल्यू व्हेल...’ प्रथम

नुकत्याच येथे झालेल्या पंधराव्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्या ‘ब्ल्यू व्हेल आणि व्हाईट रोझेस’ या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला. सोलापूरच्या रंगसंवाद प्रतिष्ठानच्या ‘तेलेजू’ नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाला. 
ही दोन्ही नाटके कोल्हापूर व पुणे केंद्राचे अंतिम फेरीत प्रतिनिधित्व करणार आहेत. दरम्यान, ६ ते १९ जानेवारीदरम्यान झालेल्या या स्पर्धेत एकूण ७७ प्रयोग सादर झाले. डॉ. सुरेश पुरी, सारिका पेंडसे, रमेश भिसीकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. 

सविस्तर अनुक्रमे निकाल असा

 दिग्दर्शन- मिहिका शेंडगे (तेलेजू), उदय गोडबोले (ब्ल्यू व्हेल आणि व्हाईट रोझेस).
 प्रकाशयोजना- प्रसन्न देशमुख (सोनेरी पिंजऱ्यातील पोपट), चिन्मय बेरी (तिसरे स्वातंत्र्य).
 नेपथ्य- जयंत टोले (जनावर), संजय शिंदे (बसराची ग्रंथपाल).
 रंगभूषा- अंजली मित्रगोत्री (तेलेजू), सोनाली जोशी (गूल मकई).
 अभिनय रौप्यपदक- आदित्य गानू (सुतावरून स्वर्गाला), सम्राज्ञी पाटील (कोरफड).
 गुणवत्ता प्रमाणपत्रे - तन्मय जोशी (गुल मकई), नेहा परांजपे (वेध अस्तित्वाचा), ऐश्‍वर्या शेळके (चिंगी), आर्या कुलकर्णी (तेलेजू), सुहानी धडफळे (श्‍यामची आई), अथर्व कामते (मदर्स डे), राजेश बर्वे (ब्ल्यू व्हेल आणि व्हाईट रोझेस), प्रणव धायगुडे (इस्कोट), इशान केसकर (खेळताड), वैष्णव कदम (जनावर).

Web Title: Kolhapur News Music Theater Competition from 1 February