‘आम्ही मराठी’द्वारे अस्मिता जपण्याचा संदेश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

कोल्हापूर - विविध संतरचना, आजच्या मराठी कवी आणि साहित्यिकांच्या लेखनातून मराठी भाषेचे विस्तारलेले महाप्रचंड अवकाश शब्द आणि अर्थसौंदर्यातून अनुभवण्याची पर्वणी रसिकांनी साधली. मराठी असण्यापासून मराठी होण्यापर्यंतच्या प्रवास या संकल्पनेवर आधारित ‘आम्ही मराठी’ नाटकाने मातृभाषेचा पट रसिकांना उलगडून दाखविला.

कोल्हापूर - विविध संतरचना, आजच्या मराठी कवी आणि साहित्यिकांच्या लेखनातून मराठी भाषेचे विस्तारलेले महाप्रचंड अवकाश शब्द आणि अर्थसौंदर्यातून अनुभवण्याची पर्वणी रसिकांनी साधली. मराठी असण्यापासून मराठी होण्यापर्यंतच्या प्रवास या संकल्पनेवर आधारित ‘आम्ही मराठी’ नाटकाने मातृभाषेचा पट रसिकांना उलगडून दाखविला.

राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे केशवराव भोसले नाट्यगृहात राजा परांजपे महोत्सवातंर्गत आज ‘आम्ही मराठी’ नाट्यकृतीचे सादरीकरण केले. अक्षय जोशी यांचे लेखन तर दिग्दर्शन अर्चना राणे यांनी केले. अमेय बर्वे, अक्षय जोशी, पार्थ राणे, अमिता घुगरी, संजीव मेंहेंदळे, धवल चांदवडकर, स्वराली कुंभोजकर, विक्रम भट, दीप्ती कुलकर्णी, कौस्तुभ देशपांडे यांनी सहभाग घेतला.

नाट्यकृतीद्वारे मराठीच्या उत्पत्तीपासून भाषिक लहेजातील बदलांचा प्रवास रसिकांसमोर सादर केला. श्रीकृष्ण आणि सुदामातील भारूडरूपी संवादातून मराठी भाषेचा प्रवास विनोदाच्या पेरणीसह मांडला. टाळ्यांचा कडकडाट अन्‌ हास्याच्या लकेरींनी नाट्यगृह भरून गेले. मराठी भाषेबद्दलच्या सद्य:स्थितीवरील भाष्याबद्दल रसिकांना अंतर्मुखही केले.

सकाळच्या सत्रात ‘लाखाची गोष्ट’, ‘ऊन पाऊस’ हे चित्रपट दाखविले. ‘आम्ही मराठी’मध्ये संस्कृत भाषेशी गुंफलेली मराठी भाषा संतसाहित्यातून समृद्ध झाल्याचे दाखले दिले. आजच्या हिंदी, इंग्रजी भाषेच्या मुलाम्याने काहीशी दुरावलेली मराठी भाषा आपलीशी करण्याचा संदेश नाट्यकृतीने दिला. ‘नटरंग’ चित्रपटातील शीर्षक गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.

यानंतर लोकगीते, भावगीते सादर केली. कोकण, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, खानदेश तसेच महाराष्ट्राच्या अन्य भागातील भाषिक सौंदर्य दाखवणारे शब्द, त्यातून तयार झालेली गाणी सादर केली. याद्वारे रसिकांना मराठीच्या वैविध्याचा परिचय करून दिला. मराठी भाषेचा गंध, बोलीभाषेतील प्रचलित शब्द, भौगोलिक संदर्भाने तयार झालेले शब्द, एकच पण आशयाने अर्थभिन्नता येणारे शब्द असा मराठी भाषेतील राजेशाही श्रीमंत थाटही नाट्यकृतीने दिला.

विशेष म्हणजे, मराठीत हरवत चाललेली शुद्धता, इंग्रजाळलेली किंवा हिंदीमिश्रित मराठी बोलणाऱ्या पिढीने मराठी भाषेतील शब्दवैभव अजिबात विसरू नये, असा संदेश देणारे संवाद रसिकांची दाद मिळवून गेले. 

शिक्षण क्षेत्रात मराठी मागे पडून इंग्रजी माध्यमाला दिलेले नको तितके महत्त्व या नाट्यकृतीने अधोरेखित केले. मातृभाषेतून ज्ञान घेणे ही संस्कृती लोप पावत आहे. ती मराठी भाषेच्या अस्मितेतूनच जपली जावी, असा संदेश नाट्यकृतीने दिला.

Web Title: Kolhapur News Raja Paranjape Festival