राष्ट्रप्रेमाची नवचेतना ‘के फाईव्ह’

संभाजी गंडमाळे 
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

दहशतवाद, राष्ट्रप्रेम हा विषय नेहमीच रंगभूमीवर विविध माध्यमांतून येतच असतो. त्यातही राज्य नाट्य स्पर्धेत तर हमखास असतोच असतो. अशाच विषयांवर बेतलेल्या सुरेश गांगुर्डे लिखित ‘के फाईव्ह’ या नाटकाची चांगली अनुभूती हलकर्णी (ता. चंदगड) येथील श्री साई नाट्यधारा मंडळाने दिली. 

दहशतवाद, राष्ट्रप्रेम हा विषय नेहमीच रंगभूमीवर विविध माध्यमांतून येतच असतो. त्यातही राज्य नाट्य स्पर्धेत तर हमखास असतोच असतो. अशाच विषयांवर बेतलेल्या सुरेश गांगुर्डे लिखित ‘के फाईव्ह’ या नाटकाची चांगली अनुभूती हलकर्णी (ता. चंदगड) येथील श्री साई नाट्यधारा मंडळाने दिली. 

एकूणच दहशतवादाचा विचार मनात आला, की चटकन प्रत्येकालाच आठवते, ती भारत-पाकिस्तान सीमेवरची रोजची लढाई. याच परिस्थितीतून कथासूत्र बांधून हे नाटक साकारतं. दहशतवादी निष्पाप जुईली मानकरचे अपहरण करतात आणि तिच्यावर अन्याय करतात. तिला दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी भारतीय सेना तुकडी पाठवते आणि जिवाची बाजी लावून ते जुईलीची सुटका करतात. जुईली आपल्यावर दहशतवाद्यांकडून झालेल्या अत्याचाराची माहिती चौकशीत देत असते आणि त्यातील विविध प्रसंगांची गुंफण करीत नाटक पुढं सरकतं. केवळ त्यातून नाटकाची कथाच उलगडत नाही तर एकूणच दहशतवाद, त्यांना स्वकीयांची छुपी साथ, त्या बदल्यात दिली जाणारी आमिषं आणि सामान्य माणूस, अशा विविध अंगांनी ते थेट भाष्य करीत पुढं सरकतं. वर्षानंतर सुटका होऊन परतलेल्या जुईलीचं कुटुंब तिला स्वीकारण्यास नकार देतं आणि अखेर ‘के फाईव्ह’ अर्थात मेजर मुस्ताक पटेलच तिला दहशतवादी रहिमत खानापासून झालेल्या अपत्याचा स्वीकार करतो आणि नाटक संपतं. दरम्यानच्या काळात ते समाजाच्या एकूणच मानसिकतेवरही बोलतं. ‘जुईली’, ‘के फाईव्ह’ आपापल्या भूमिका उत्तम वठवतात. राष्ट्रप्रेमाची नवचेतना पुन्हा साऱ्यांच्यात निर्माण करण्यासाठी पूरक असाच हा आविष्कार. त्यातही नाटकातील शेवटचा स्टेशनवरील प्रसंग असेल किंवा दहशतवाद्यांच्या अत्याचाराची माहिती उलगडणारे काही प्रसंग साऱ्यांनाच भावले, हे नक्की. 

पात्रपरिचय - 
सुधीर जयराम (सक्‍सेना), सप्तर्षी कुमठेकर (के फाईव्ह), अश्‍विनी कबावज (जुईली), संजय मनोहर (रहिमतखान), परसू गावडे (गोडे, दादासाहेब, मुखिया), ओंकार चंदूरकर (के वन), जगदीश गोरूले (के टू), संकेत रावणंग (के ३), रोहित मोर्डेकर (रमेश), प्रमोद सावंत (बाबा), तेजश्री मुळ्ये (आई), प्रशांत धामणस्कर (दिलेर), ऋषीकेश जाधव (कादर), संकेत करंडे, अक्षय राबाडे, सोहम पवार (दंगलखोर), रोहन सावंत (नंबियार), प्रशांत बालगुडे (इसम एक), अजिंक्‍य दळवी (इसम दोन), सुशील गवंडी (उस्मान), वैदेही सावंत, रूपाली सावंत, लुब्धा सावंत (व्यक्ती)
दिग्दर्शक, नेपथ्य- संजय सावंत
प्रकाशयोजना- विनायक सावर्डेकर
पार्श्‍वसंगीत- अगस्ती कुमठेकर
रंगभूषा- महेश जाधव
वेशभूषा- वैदेही सावंत, राम गुरव  
 

Web Title: Kolhapur News State Drama Competition special