नाटकाचं वेड अन्‌ जयसिंगपूरचं टीम स्पिरिट!

कोल्हापूर ः राज्य नाट्य स्पर्धेत सोमवारी जयसिंगपूरच्या संघर्ष बहुउद्देशीय सेवा संस्थेने ‘इथे ओशाळला मृत्यू’ नाटकाचा प्रयोग सादर केला. त्यातील एक प्रसंग.
कोल्हापूर ः राज्य नाट्य स्पर्धेत सोमवारी जयसिंगपूरच्या संघर्ष बहुउद्देशीय सेवा संस्थेने ‘इथे ओशाळला मृत्यू’ नाटकाचा प्रयोग सादर केला. त्यातील एक प्रसंग.

जयसिंगपूरचं नाटक स्पर्धेत आहे म्हटलं की, त्यानिमित्तानं तेथील रंगकर्मींच्या जणू तीन पिढ्या कुठून कुठून एकवटतात. नाटकातील कुठलीही जबाबदारी नसली तरी आपापल्या परीने जी काही मदत करता येईल, त्यासाठी ते अग्रेसर असतात.

अर्थात किमान शंभर जणांचा जथ्था प्रत्यक्ष प्रयोगालाही हजर असतो. संघर्ष बहुउद्देशीय संस्थेचा ‘इथे ओशाळला मृत्यू’ हा प्रयोग रसिकांना अपेक्षित अनुभूती द्यायला थोडासा कमी पडला असला तरी त्यांच्या ‘टीम स्पिरिट’ला दाद द्यायलाच हवी. कारण जुनी नाटकं पुन्हा रंगमंचावर येताना त्याची अगदी नकळतपणे पूर्वीच्या काही प्रयोगांशी तुलनाही होतच असते.

मुळात जयसिंगपूरचं नाटक असलं की ते हमखास पहिल्यांदा (कै) प्रा. बी. एन. चौगुले यांच्या स्मृतींना सलाम करतं. (यंदाच्या स्पर्धेत ‘सुगुण’च्या टीमनं आपलं नाटक प्रसिद्ध गायिका रजनी करकरे-देशपांडे यांना अर्पण करून त्यांच्या स्मृतींना सलाम केला) प्रा. चौगुले मूळचे कसबे डिग्रजचे. शिक्षणाच्या निमित्तानं जयसिंगपुरात आले आणि तेथील रंगभूमीचे एक प्रमुख घटकच बनून गेले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अनागर विभागातून अनेक बक्षिसांची लयलूटही या टीमनं केली. चार दशकं पार करून त्यांची वाटचाल आता सुवर्णमहोत्सवाकडे सुरू झाली आहे.    
‘फुल लावूनही हौस’
यंदाची स्पर्धा आता चांगलीच चुरस आणणारी ठरते आहे. त्यातही रसिक मायबाप प्रेक्षकांनी आता हाऊसफुल्ल हजेरी लावली आहे. सोमवारच्या प्रयोगावेळी सायंकाळी पाचलाच सर्व तिकिटे संपली आणि सव्वाशेहून अधिक रसिकांना तिकिटे मिळाली नाहीत. अखेर त्यांना नाटक पाहण्याची संधी देण्यात आली. याच दरम्यान नाट्यगृहावर ‘हाऊसफुल्ल’ हा फलक झळकला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

त्याअनुषंगाने विविधांगी चर्चाही सुरू झाली. हौशी कलाकारांच्या कौतुकाच्या पोस्टसह अवधूत जोशीसारख्या रंगकर्मीनं ‘फुल लावूनही हौस’ करता येते. स्पर्धेनंतर नाटकाचा व्यावसायिक प्रयोग करायचा म्हटलं की, प्रेक्षक पाठ फिरवतात, अशी त्याची तक्रार नव्हे तर तो सगळ्यांचाच अनुभव. पण या साऱ्या पार्श्‍वभूमीवरही सुभाष टाकळीकर यांनी ‘इथे ओशाळला मृत्यू’ची निर्मिती केवळ स्पर्धेसाठीच नव्हे तर त्यानंतरही प्रयोग करण्याचा संकल्प करूनच केली आहे. दिग्दर्शकीय मनोगतात ते म्हणतात, ‘‘किमान पन्नास-साठ हजार रुपये खर्च करून, पाच-सहा महिने तालीम करून स्पर्धेत नाटक सादर करायचं. स्पर्धाबाह्य प्रयोग का करू नयेत? ते व्हावेत, यासाठीच हे शिवधनुष्य उचललं.’’ 

पात्र परिचय 
 अजित बिडकर (फकरूद्दीन), शिरीष यादव (आसद खान), स्मिता पोटजाळे (येसूबाई), राजेश जाधव (गणोजी शिर्के), रवींद्र ताडे (प्रल्हाद निराजी), रमेश यळगूडकर (कवी कलश), कुमार हातळगे (मल्होजी), ओंकार कुलकर्णी (संताजी), सचिन पाचोरे (धनाजी), विश्‍वास माळी (शेख निजाम), शुभम झेले, प्रेम कोळी, बाहुबली खोत, सचिन कोरीशेट्टी (रक्षक), सुभाष टाकळीकर (औरंगजेब), निखिल अणेगिरीकर (संभाजीराजे)

* दिग्दर्शक : सुभाष टाकळीकर
* नेपथ्य : विलास जाधव, दीपक अणेगिरीकर, मुकुंद पटवर्धन
* प्रकाश योजना : राजेश पाटील, सुनील पाटील
* पार्श्‍वसंगीत : भरत खिचडे, संग्राम पाटील
* वेशभूषा : अशोक हेरवाडे,शब्दा कुंभार, 
 * डॉ. श्रेया टाकळीकर, प्रमोद कुलकर्णी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com