एका सुंदर खेळाची अनुभूती...!

संभाजी गंडमाळे
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

राज्य नाट्य स्पर्धा आता मध्यावर आली आहे आणि एकापेक्षा एक सरस कलाकृतींचा नजराणा प्रेक्षकांसमोर खुला होतो आहे. इचलकरंजीच्या निष्पाप कलानिकेतन संस्थेने मंगळवारी प्रसाद दाणी लिखित ‘नथिंग टू से’ या नाटकाचा सुंदर आविष्कार सादर केला.

राज्य नाट्य स्पर्धा आता मध्यावर आली आहे आणि एकापेक्षा एक सरस कलाकृतींचा नजराणा प्रेक्षकांसमोर खुला होतो आहे. इचलकरंजीच्या निष्पाप कलानिकेतन संस्थेने मंगळवारी प्रसाद दाणी लिखित ‘नथिंग टू से’ या नाटकाचा सुंदर आविष्कार सादर केला.

मुळात ही एकांकिका यापूर्वी रंगभूमीवर गाजलीच होती; मात्र ती दोन अंकी नाटक स्वरूपात प्रेक्षकांसमोर येताना त्याची गती आणि एकूणच नाटकातल्या खेळात कुठेही कमी पडत नाही. त्यातही ‘निष्पाप’च्या टीमनं खुर्चीला खिळवून ठेवणारा प्रयोग काय असतो, याची प्रचिती स्पर्धेच्या निमित्तानं दिली. 
घटस्फोट आणि त्याचे परिणाम अशा विषयावर यापूर्वीही अनेक नाटकं रंगभूमीवर आली. प्रत्येक लेखकानं आपापल्या परीने त्यावरचे सोल्युशनही सांगितले. एका नाटकाने तर आपण पै-पाहुणे आणि मित्रमंडळीच्या साक्षीने विवाहबद्ध होत असलो तर मग घटस्फोट घेतानाही सर्वांना आमंत्रित करून त्याचा सोहळा केला तर? असेही सोल्युशन सांगितले होते. ‘नथिंग टू से’ घटस्फोटावर भाष्य करताना बाप आणि मुलीच्या नात्याला प्रातिनिधिक स्वरूपात समोर ठेवते आणि संपूर्ण नाटक पुढे सरकत राहते. मुळात घटस्फोटांचे प्रमाण आता वाढू लागले आहे, हे वास्तव आहे; मात्र या साऱ्या प्रक्रियेत केवळ नवरा आणि बायकोच्याच मतांचा विचार होतो. बऱ्याचदा कारणंही अगदी क्षुल्लक असतात; मात्र त्यांच्याच लहान मुलांचे भावविश्‍व आणि त्यांचे एकूणच मत कोणच विचारात घेत नाही. मुलं मोठी होत जातात आणि त्यांच्या मनातील प्रश्‍नांचा गुंता मग वाढत जातो. नाटकातली मालविका (तनुजा मिराशी) अशाच मुलांचे प्रतिनिधित्व करते. वयाच्या पंचवीशीत असताना आपला बाप जिवंत असूनही मला का भेटला नाही, असा तिचा सडेतोड प्रश्‍न आणि त्याची उत्तरं शोधण्यासाठी ती थेट बापाच्या घरात प्रवेश करते. 

माधव (संतोष आबाळे) हा सरळमार्गी माणूस. प्रेमविवाहानंतर मूल होऊनही पत्नी आपल्या लाईफस्टाईलवर ठाम असल्याने त्यांचे वारंवार खटके उडतात आणि त्याचा परिणाम मालविकावर व्हायला नको, म्हणून ते घटस्फोट घेतात. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर मग दोन तासांचं हे नाटक अनेक विषयांना स्पर्श करीत उलगडू लागतं. मात्र, त्यातील माधवने मुलीशी सतत संपर्कासाठी नाव बदलून इंटरनेटवर केलेली मैत्री आणि एकूणच खेळी खूप रंजक आहे. 

लेखक म्हणून प्रसाद दाणी यांनी त्याची सुंदर गुंफण केली आहे आणि ‘निष्पाप’ची टीम ती अगदी सफाईदारपणे सादर करते. माधव व मालविकासह जिग्या (प्रकाश रावळ) या तीनच व्यक्तिरेखा नाटकात आहेत आणि तिघेही आपापल्या भूमिकांना पुरेपूर न्याय देतात. बाकी ध्वनी-प्रकाश आणि नेपथ्यही ही सारी गोष्ट उलगडण्यासाठी आवश्‍यक ती पूरक साथ देतातच. अर्थात दिग्दर्शक म्हणून प्रताप सोनाळे यांना या साऱ्या गोष्टींचं श्रेय.  

पात्र परिचय 
 संतोष आबाळे (माधव सहस्त्रबुद्धे), तनुजा मिराशी (मालविका), प्रकाश रावळ (जिग्या).

* दिग्दर्शक - प्रताप सोनाळे
* नेपथ्य -विनय शिंदे, अक्षय कोडोले
* पार्श्‍वसंगीत - सलमान मोमीन
* प्रकाश योजना - प्रताप सोनाळे, चिन्मय कुलकर्णी
* वेशभूषा -श्रद्धा फाटक
* रंगभूषा - सुनीता वर्मा

Web Title: Kolhapur News State Drama Competition special