शिरोळ तालुक्‍यात रंगभूमीतून लोकचळवळीला बळ

गणेश शिंदे
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

शिरोळ तालुका सांस्कृतिक संघाच्या माध्यमातून ज्येष्ठ आणि नवोदित कलाकारांना पाठबळ आणि प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरू आहे. अनेक कलाकारांनी रंजनातून प्रबोधनाचे व्रत जोपासत तालुक्‍याच्या कलापंढरीला प्रतिष्ठा मिळवून दिली. आज ‘जागतिक रंगभूमी दिन’. यानिमित्त तालुक्‍याच्या रंगभूमीबद्दल...

जयसिंगपूर - शिरोळ तालुका म्हणजे सांस्कृतिक क्षेत्राचे माहेरघर. तालुक्‍याला सांस्कृतिक क्षेत्राची जाज्वल्य परंपरा लाभली आहे. कलेचे संवर्धन आणि कलाकारांच्या पाठीवर थाप मारण्याची दानतही इथल्या रसिकांत आहे. शिरोळ तालुका सांस्कृतिक संघाच्या माध्यमातून ज्येष्ठ आणि नवोदित कलाकारांना पाठबळ आणि प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरू आहे. अनेक कलाकारांनी रंजनातून प्रबोधनाचे व्रत जोपासत तालुक्‍याच्या कलापंढरीला प्रतिष्ठा मिळवून दिली. आज ‘जागतिक रंगभूमी दिन’. यानिमित्त तालुक्‍याच्या रंगभूमीबद्दल...

मिलिंद शिंदे, उदय शिरोळकर, राजेंद्र प्रधान, दगडू माने यांच्या विचारातून शिरोळ तालुका सांस्कृतिक संघाची स्थापना झाली. यातून शाहू महोत्सवाला प्रारंभ झाला. तालुक्‍यातील गावागावांत फिरून कलावंताची नोंद करून घेतली. तालुक्‍यातील कलाकारांनी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पहिला शिरोळ तालुका कला महोत्सव घेतला. नव्या-जुन्या कलाकारांनी प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरू झाले. कलगीतुरा, भेदीक, लावणी, गण-गवळण, भावगीत, भक्तिगीत, सिनेगीत, गजनृत्य, करंडोल वादन या लोककलेसह इतर कलांनाही प्रतिष्ठा मिळत गेली. दर्जेदार कार्यक्रमांमुळे चांगले रसिकही घडू लागले. लोकसहभागावर महोत्सव सुरू झाला. शासनाच्या क्रीडा युवक सेवा संचालनालय, कोल्हापूर या संस्थेनेही सुरवातीला सहकार्य केले. 

दरवर्षी महोत्सवातून लोकजागृती व लोकप्रबोधनासाठी स्वच्छता, महिला बचतगट, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता, प्रौढ साक्षरता, साक्षरोत्तर अभियान, पर्यावरण संतुलन, स्त्रीभ्रूण हत्या यासह अनेक विषयांना महोत्सव समर्पित केला. महेंद्र सावंत, सोमा पुजारी, राजू आवळे, आप्पासाहेब पाटील, बापू आंबी, दशरथ मुळे, श्री. प्रधान, प्रकाश कुलकर्णी, राजेंद्र नांद्रेकर, स्नेहल रोकडे, अर्चना संकपाळ आदींच्या सहकार्यातून सोहळा रंगतदार वळणावर आणला. जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ या तीन गावांचे केंद्र करून प्रत्येक वर्षी विभागवार महोत्सव सुरू झाला. भारत सरकारच्या मंत्रालय विभागाच्या गीत व नाटक प्रशासन विभागाने यात सहभाग नोंदविला. 

राजेंद्र प्रधान यांच्या सलग ३६ तास एकपात्री विश्‍वविक्रमी नाट्यप्रयोगामुळे तालुक्‍याच्या रंगभूमीला प्रतिष्ठा मिळाली. जयसिंगपूरमधील नाट्यशुभांगीने ४५ वर्षांहून अधिक काळ परंपरा जपली. कोथळी येथील सोमा पुजारीचे गजनृत्य, कुरुंदवाडच्या राजू आवळेंची हालगी, खिद्रापूरचे करंजेल वादन, उदगावचे कलापथक, ज्येष्ठ व कलाकारांनी रंगभूमी बहारदार बनवली. 

तीस वर्षांपासून सांस्कृतिक चळवळ सुरू आहे. रंजनातून प्रबोधन करणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांतून ही परंपरा अखंडित ठेवली. नव्या-जुन्या कलावंतांना रंगभूमी उपलब्ध करून दिली. रंगदेवतेची सेवा करणारी परंपरा संस्थेने जोपासली. पुढील काळात ज्येष्ठ कलाकारांना शासनाकडून सन्मानाने जगता यावे, इतके मानधन मिळावे. बालकलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी बाल फेस्टिव्हल करण्याचा मानस आहे.
- दगडू माने, 
अध्यक्ष, कलाविश्‍व रंगभूमी संस्था, शिरोळ

Web Title: Kolhapur News Theater day special