‘वटवट’ची सहजसुंदर सलामी...!

‘वटवट’ची सहजसुंदर सलामी...!

‘श्री गजानन जयजय गजानन, दे आशीर्वचना...’ या नांदीने यंदाच्या राज्य नाट्यस्पर्धेचा पडदा उघडला आणि प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या ‘वटवट वटवट’चा सहजसुंदर आविष्कार कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळाला. दिग्दर्शक लक्ष्मण द्रविड यांनी वीसहून अधिक हौशी कलाकारांची मोट बांधून हा प्रयोग सादर केला. मुळात ‘पुलं’च्या नाटकांचा प्रयोग म्हणजे त्यातला विनोद अगदी बेमालूमपणे रसिकांच्या मनावर कोरला पाहिजे आणि प्रेक्षकांना हसत हसवतच अंतर्मुखही करता आले पाहिजे. हा प्रामाणिक प्रयत्न यशोधरा पंचशील थिएटर ॲकॅडमीच्या टीमनं केला. 

एक नोव्हेंबर १९९९ ला ‘पुलं’चा ऐंशीवा वाढदिवस. यानिमित्तानं ‘वटवट वटवट’ प्रकाशित झालं.  विशेष म्हणजे या पुस्तकासह आठ कॅसेटस्‌ही प्रकाशित झाल्या आणि त्यात ‘वटवट’चाही समावेश होता. प्रत्येक प्रसंगाला पूरक वसंत सरवटे यांची व्यंग्यचित्रंही अप्रतिम. पुस्तक आणि कॅसेटबरोबरच ‘वटवट’ या नाटकाचे यापूर्वी काही ठिकाणी प्रयोग झाले. पण, त्याच्याही पुढे जाऊन २०१५ च्या दिवाळीत कोलंबस महाराष्ट्र मंडळाने या नाटकाचा प्रयोग तेथे सादर केला होता. मुळात नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्तानं अमेरिकास्थित मराठी तरुणाईने मराठी नाटकांची परंपरा सातासमुद्रापारही जपली. विविध औचित्ये साधून तेथे प्रयोग सादर होतात आणि आजवर तीसहून अधिक नाटकांची निर्मिती त्यांनी केली. त्यात कोल्हापुरातील काही तरुणांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे कोलंबस महाराष्ट्र मंडळातर्फे सादर झालेला ‘वटवट’चा संपूर्ण प्रयोग आजही आपल्याला ‘यू ट्यूब’वर अनुभवायला मिळतो.

सहभागी कलाकार
यशोधरा पंचशील थिएटर ॲकॅडमीच्या ‘वटवट वटवट’ प्रयोगात महेंद्र कांबळे, तानाजी देशमुख, अशोक शिर्के, राजकुमार द्रविड, ऊर्मिला द्रविड, एम. डी. पाटील, वंशिका कांबळे, राजेश कांबळे, अविनाश कांबळे, सुहास कांबळे, सई कांबळे, निशांत कावणेकर, संभाजी चौगुले, अमृता माने, कल्याणी माने, करुणा शिंदे, लक्ष्मण द्रविड, तेजस कांबळे, मिथुन चव्हाण यांच्या भूमिका होत्या. राहुल माणगावकर (प्रकाशयोजना), प्रा. टी. आर. गुरव (नेपथ्य), मंजूषा भोजणे (रंगभूषा-वेशभूषा), प्रकाश वांद्रे (संगीत), आनंद भोजणे (निर्मिती साहाय्य) यांचे तांत्रिक साहाय्य होते.  

आजचे नाटक
 वाटले होते काही मैल
 तुकाराम माळी तालीम मंडळ
 संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, सायंकाळी सात  

कोल्हापूर प्रगत केंद्र
कोल्हापुरातच माझ्या अभिनयातील करिअरला प्रारंभ झाला. अनेक एकांकिका, नाट्यप्रयोग केले. आता कोकणात असून रत्नागिरी केंद्रावरील स्पर्धा यंदा अनुभवतो. कोकणात पारावरच्या नाटकांना अजूनही मागणी आहे. स्पर्धेतील प्रयोगही सुंदर असतात. मात्र, तुलनेत कोल्हापूर केंद्र कैक पटींनी पुढे आहे. रत्नागिरी केंद्रावरही कालपासून स्पर्धेला प्रारंभ झाला. उद्‌घाटनावेळी नटराजाच्या मूर्तीवर पहिला स्पॉट आणि त्यानंतर मान्यवरांवर प्रकाश उजळतो. याचाच अर्थ आता नाटक नव्या पिढीकडे हक्काने येते आहे.
- प्रदीप शिवगण, नाट्यशास्त्र विभागप्रमुख, रमेश कीर कला अकादमी, रत्नागिरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com