चिंचेच्या झाडाखाली सजली खॉंसाहेबांच्या शिष्यांची स्वरमैफल 

संतोष भिसे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

मिरज - मिरजेचा सांस्कृतिक ठेवा असणारे संगीतरत्न अब्दुल करीम खॉंसाहेब यांच्या 84 व्या पुण्यतिथीनिमित्त आज मिरासाहेब दर्ग्यात अनोखी स्वरसभा सजली. त्यांच्या सूर-स्वरांची मोहीनी आज मिरजेच्या रसिक श्रोत्यांनी पुन्हा एकदा अनुभवली. अनेक वर्षांच्या परंपरेनुसार चिंचेच्या झाडाखाली स्वराभिषेक झाला.

मिरज - मिरजेचा सांस्कृतिक ठेवा असणारे संगीतरत्न अब्दुल करीम खॉंसाहेब यांच्या 84 व्या पुण्यतिथीनिमित्त आज मिरासाहेब दर्ग्यात अनोखी स्वरसभा सजली. त्यांच्या सूर-स्वरांची मोहीनी आज मिरजेच्या रसिक श्रोत्यांनी पुन्हा एकदा अनुभवली. अनेक वर्षांच्या परंपरेनुसार चिंचेच्या झाडाखाली स्वराभिषेक झाला.

स्वतः खॉंसाहेब याच झाडाखाली बसून मिरासाहेबांच्या भक्तीचे सूर आळवायचे. त्याच झाडाखाली देशभरातून आलेल्या त्यांच्या शिष्यांनी स्वराभिषेक केला. डोक्‍यावर मोकळे आकाश आणि जमिनीवर सभोवताली रसिकजनांची दाटी अशा वातावरणात शिष्योत्तमांनी सूर छेडले.

ही अनोखी मुक्त मैफल कानांत साठवण्यासाठी श्रोत्यांनी गर्दी केली होती. दर्ग्याच्या चौकटीत भाविकजन मिरासाहेबांच्या कृपेची याचना करत होते; त्याचवेळी चिंचेच्या झाडाखाली नाणावलेले कलावंत आपल्या गानकलेवर ख्वाजाच्या कृपावर्षावासाठी आळवणी करत होते. त्यांच्या स्वरांवर साथीदार साज चढवत होते.

सकाळी नऊ वाजता मैफलीचा प्रारंभ झाला. प्रख्यात गायक समीर अभ्यंकर यांनी देवगंधार राग छेडला. विलंबीत एकतालात "रैन के आगे पिहरवा" ही बंदीश गायली. द्रुतमध्ये "लाडली बनावत आया" ही रचना पेश केली. त्यांना तबलासाथ माधव मोडक व संवादीनीसाथ अजित पुरोहीत यांनी केली. सहदेव झेंडे यांच्या खड्या आवाजातील सुरावटींनी श्रोत्यांचे अंग न्‌ अंग शहारले. स्वरांवरची त्यांची हुकमत आणि शब्दांवरची पकड श्रोत्यांच्या मनाचा पकड घेणारी ठरली. बैरागी रागातील "जागो रे नंदलाला" ही खास बंदीश वाहवा मिळवत राहीली. द्रुत तीन तालात "मोरा संदेशवा" या ठुमरीची त्यांनी पेशकश केली. 

धारवाडच्या रईस खान यांनी अहीर भैरव पेश केला. "रसिया म्हारा" आणि "बेग बेग आओ मंदिर" ही आर्त आळवणी दैवी आवाजात गायली. एखाद्या कसलेल्या गायकाचा रियाजी आवाज कसा असतो याचा अविस्मरणीय अनुभव श्रोत्यांनी घेतला. तबलासाथ सागर सुतार आणि संवादीनीसाथ मनोज जोशी यांनी केली. 

सभेच्या समारोपाच्या सत्रात मुंबईच्या प्रसन्न गुडी यांनी कोमल ऋषभ आसावरी रागात "मै तो तुमरे दास" ही तीनताल मध्य लयीतील बंदीश छेडली. तबलासाथ दादा मुळे, संवादीनीसाथ अजित पुरोहीत व तानपुरासाथ नुरमहंमद उगारे यांनी केली. 

Web Title: Sangli News Khansaheb studends singing show