Maratha Kranti Morcha : इचलकरंजीत व्यवहार ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 August 2018

इचलकरंजी - मराठा आरक्षणप्रश्‍नी इचलकरंजीत आज कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्‍यक सेवा वगळता शहरात सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात आले. बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंदला प्रतिसाद देत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. 

इचलकरंजी - मराठा आरक्षणप्रश्‍नी इचलकरंजीत आज कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्‍यक सेवा वगळता शहरात सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात आले. बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंदला प्रतिसाद देत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. 

मराठा आरक्षणप्रश्‍नी आज महाराष्ट्रव्यापी बंदची घोषणा केली होती. येथील सकल मराठा समाजाने इचलकरंजी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. बंदमधून अत्यावश्‍यक सेवा वगळल्या होत्या. उर्वरीत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने केले होते. त्याला आज नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

सकाळपासूनच सर्व व्यवहार नागरिकांनी बंद ठेवले होते. मुख्य रस्ता, बाजारपेठ, उपनगरे आदी संपूर्ण परिसरात सर्व प्रकारचे व्यवहार बंद ठेवले होते. त्यामुळे इचलकरंजी ठप्प झाली होती. मुख्य मार्गावर नेहमीच वर्दळ असते. मात्र बंदमुळे मुख्य मार्गावर दिवसभर शुकशुकाट जाणवत होता. अगदी किरकोळ विक्रेते देखील रस्त्यावर दिसत नव्हते. एसटी वाहतूक बंद ठेवल्याने नेहमी गर्दीने फुलणारे मध्यवर्ती बसस्थानक आज ओस पडले होते. 

शासकीय कार्यालये कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेली तीन दिवस ओस पडली आहेत. आज तर शहरातील सर्व पेट्रोल पंप, सर्व शैक्षणिक संस्था, सिनेमागृहे, रिक्षा वाहतूक, बस वाहतूक पूर्णत बंद राहिली. त्यामुळे शहरातील धावाधाव दिवसभर थांबली होती. शॉपींग सेंटर, धान्य बाजार आदी बंद राहिल्याने मोठी उलाढाल थांबली. बंदच्या काळात कोणताची अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. 

दिवसभर इंटरनेट सेवा बंद 
दिवसभर इंटरनेट सेवा बंद ठेवली होती. त्यामुळे व्हॉट्‌सअप, फेसबुक आदी सोशल मिडियावरील संदेश पूर्णतः बंद होते. वाहनांची वर्दळ नसल्याने व शाळा बंद राहिल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर मुलांनी दुपारनंतर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. शहरातील विविध भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha Band in Ichalkaranji