
कोल्हापूर - मराठ्यांच्या ताटात आरक्षणाची भाकरी ज्या दिवशी पडेल, त्याच दिवशी आमची खरी ईद साजरी होईल, अशी भावनिक साद मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी यांनी घातली. मराठा तरुणांनी टाळ्यांच्या कडकडाटात मलबारी यांच्या वक्तव्याचे स्वागत केले.
कोल्हापूर - मराठ्यांच्या ताटात आरक्षणाची भाकरी ज्या दिवशी पडेल, त्याच दिवशी आमची खरी ईद साजरी होईल, अशी भावनिक साद मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी यांनी घातली. मराठा तरुणांनी टाळ्यांच्या कडकडाटात मलबारी यांच्या वक्तव्याचे स्वागत केले.
सायंकाळी चारच्या सुमारास दसरा चौकात मलबारी यांचे भाषण झाले. ‘तुमचे आमचे नाते काय. जय जिजाऊ, जय शिवराय’ अशी भाषणाची सुरुवात होताच तरुणांनी त्यांच्या सुरात सूर मिसळून ‘जय जिजाऊ जय शिवराय’ अशी घोषणा दिली.
मलबारी म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा मी छोटासा मावळा आहे. ज्या मातीत जन्म घेतला, त्या मातीशी इमान राखण्याचा संदेश महंमद पैगंबर यांनी आम्हाला दिला. मराठा ठिय्या आंदोलनासाठी गेले पंधरा दिवस मुस्लिम बोर्डिंगचे पदाधिकारी दिवसरात्र राबत आहेत. मराठा समाजाला आरक्षण पूर्वीच मिळाले होते. आमच्या वाट्याचे पाच टक्के आरक्षण आहे, ते मराठा समाज अर्थात आमच्या मोठ्या भावाला देऊन टाका.
राज्यकर्त्यांनी मोक्याची पदे आपल्या पदरात पाडून मराठा समाजाला अंधारात नेऊन टाकले. मुस्लिम समाज पूर्वी मराठा समाजासोबत होता आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सोबत राहू. आरक्षणाअभावी मराठा समाजातील तरुणांची सर्वच स्तरावर फरफट होत आहे. भावी पिढी सक्षम व्हायची असेल तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही. आरक्षणाच्या रूपाने भाकरी ज्या दिवशी मराठ्यांच्या ताटात पडेल त्या दिवशी आमची खरी ईद साजरी होईल.’’
दरम्यान भगव्या झेंड्याच्या रूपाने आज काठ्या हाती घेतल्या, तलवारी हाती घेण्याची वेळ आणू नका, असा इशारा काहींनी दिला. मराठा मावळा संदीप पाटील यांनी तरुणांचे रक्त सळसळते असले तरी आपणही संयम बाळगायला हवा, असे आवाहन केले. जाती धर्मात तेढ निर्माण होईल, असे वर्तन करू नका, असे आवाहनही त्यांनी केले.