
सातारा - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनवेळी बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील पुलावर झालेल्या दगडफेकीप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या 63 आंदोलकांची जिल्हा व सत्र न्यायाधीश अमेटा यांनी जामिनावर सुटका केली.
सातारा - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनवेळी बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील पुलावर झालेल्या दगडफेकीप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या 63 आंदोलकांची जिल्हा व सत्र न्यायाधीश अमेटा यांनी जामिनावर सुटका केली.
मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या दुसऱ्या सत्रात बुधवारी (ता. 25) साताऱ्यात आंदोलन पुकारण्यात आले. या वेळी शहरातून मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाची सांगता झाल्यानंतर काही आंदोलक बॉम्बे रेस्टॉरंट चौकात गेले. तेथे त्यांनी महामार्ग अडविला. या वेळी आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यामुळे आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. यामध्ये तत्कालीन पोलिस अधीक्षकांसह 34 पोलिस जखमी झाले होते, तसेच काही वाहने व दुकानांचीही तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी अडीच हजार आंदोलकांवर खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व शासकीय कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये 63 जणांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर त्यांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर काल दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला होता. आज सायंकाळी न्यायालयाने प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सर्वांची सुटका करण्याचे आदेश दिले. त्यांना दर सोमवारी व शुक्रवारी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.