
कोल्हापूर - मराठा बांधवांनो, मूक मोर्चे शांततेत होऊनही सरकारला जाग येत नसेल, तर आता पुढच्या तयारीला लागा, असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले. समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर - मराठा बांधवांनो, मूक मोर्चे शांततेत होऊनही सरकारला जाग येत नसेल, तर आता पुढच्या तयारीला लागा, असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले. समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले.
सकल मराठा समाजातर्फे मराठा ठोक मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. दसरा चौकात लाखो मराठा बांधवांसमोर त्यांनी शासनाविरोधात घणाघाती प्रहार केले. सर्व जाती-धर्माचे लोक मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पाठिंबा देत आहेत. आजपर्यंत मराठा समाजाचा संयम पाहिला आहे. तो संपला की काय होईल, हे पाहावे लागेल. मराठा समाज कधीच कमजोर नव्हता आणि यापुढेही नसेल. भारतीय राज्यघटनेत घटनादुरूस्तीची तरतूद आहे. वेळ न दवडता शासनाने घटना दुरूस्ती करून समाजाला न्याय द्यावा, असेही शाहू महाराज म्हणाले.
सकाळी आठपासूनच शहर आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधवांचे जथ्थे दसरा चौकाकडे येवू लागले. भगवे ध्वज, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या वेशभूषेतही अनेक विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले.
सकाळी अकराच्या सुमारास दसरा चौक चारही बाजूंनी तुडूंब भरून गेला. साडेअकरा वाजता श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, "नाबार्ड'चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे दसरा चौकात आगमन झाले.
वीरमातांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्यानंतर राष्ट्रगीताला प्रारंभ झाला. शाहिर विशारद आझाद नायकवडी यांनी शाहू गौरव गीत सादर केले. त्यानंतर शाहिर रंगराव पाटील यांनी महाराष्ट्र गीत सादर केले.
या दरम्यान, पावसाने हजेरी लावूनही लाखोंच्या समुदायाने एकाच जागी पावसात थांबून कुठलाही विस्कळीतपणा येणार नाही, याची खबरदारी घेतली. शाहिर दिलीप सावंत यांनी "या या सरकारनं बरं नाही केलं ग बया...' या गीताला प्रारंभ केला आणि हा समुदाय एका तालात सरकारच्या विरोधातील घोषणा देत सळसळत्या ऊर्जेने भारून गेला.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, ""एक मराठा-लाख मराठा, अशा घोषणेऐवजी आता "एक मराठा-मर्द मराठा' अशी घोषणा व्हायला हवी. पारतंत्र्यात असताना आपण अनेक पराक्रम केले. मग, आता स्वातंत्र्यात आपला हक्क मागताना आत्महत्या कशासाठी करायच्या ? हा मार्ग अत्यंत चुकीचा असून समाजातील तरूणाईने तो अजिबात पत्करू नये.''
नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात म्हणाले, ""शासन व जनतेत दुरावा निर्माण होतो तेव्हा संघर्ष जन्माला येतो, हा इतिहास आहे. संघर्ष उद्भवल्यानंतर राज्यकर्त्यांनी त्याचे कारण शोधायचे असते. बहुमताने निवडून दिलेल्या सरकारने आता लोकांचा आवाज ऐकावा. आरक्षणाची मागणी मान्य झाल्यानंतर आपण लढाई जिंकू. सर्व दुर्बल घटक जेंव्हा समान पातळीवर येतील, त्यावेळ युद्ध जिंकू आणि आरक्षण परत घ्या, असे ठणकावून सांगण्यात तत्पर राहू.''
आंदोलनाचे समन्वयक दिलीप देसाई म्हणाले, ""सरकार नालायक आहे. 58 मोर्चे शांततेत होऊनही निवेदनावर चर्चा करत नाही. आजचा बंद हे पहिले पाऊल आहे. मुंबईच्या किल्ल्यात लवकरच पोहोचू. नव्वद टक्के गुण मिळवून प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची कळकळ मुख्यंमंत्र्यांना का दिसत नाही? आम्ही शांत आहोत, हा सरकारचा गैरसमज आहे.''
इंद्रजीत सावंत म्हणाले, ""सरकारला शांततेचा आवाज ऐकू येत नसेल तर आता ठोक मोर्चा घेवून मुंबई आणि प्रसंगी दिल्लीला येवू. सकाळपासून प्रशासनाने इंटरनेट बंद करून आंदोलकांचा संपर्क तोडण्याचा प्रयत्न केला. पण, तरीही हजारोंच्या संख्येने मोर्चा यशस्वी झाला. मोर्चात भाडोत्री असल्याचा आरोप झाला. पण, मोर्चातील प्रत्येक जण स्वयंस्फूर्तीने आणि स्वखर्चाने आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन मोडण्याचा खूप प्रयत्न केला. पण, त्यात त्यांना यश आले नाही.''
वसंतराव मुळीक म्हणाले, ""राजर्षी शाहू महाराजांनी 1902 साली आरक्षण दिले आणि 58 मोर्चे शांततेत निघूनही मराठा समाजाला गौण समजले. पणष आता अंगार पेटला आहे. आरक्षणाचा अध्यादेश जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही.''
प्रा. जयंत पाटील म्हणाले, ""मागासवर्गीय आयोगाच्या निर्णयावर आरक्षण अवलंबून आहे. त्याचा अहवाल नोव्हेंबरमध्ये "फेव्हरेबल' यायला हवा. सामाजिकदृष्ट्या मराठा समाज मागास आहे, याची मोहोर त्यावर उमटायला हवी.''
दरम्यान, हर्षल सुर्वे, सचिन तोडकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. दुपारी दीडच्या सुमारास प्रमुख वक्त्यांची भाषणे झाल्यानंतर पुन्हा शाहिरी ललकारीने दसरा चौक भारून गेला.