#MarathaKrantiMorcha आयोगाने नकार दिल्यास सरकार काय करणार? - पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 August 2018

कऱ्हाड - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यास पुढे काय करायचे, याचा भाजप सरकारकडे काहीच प्लॅन नाही. त्यामुळे चार महिन्यांचा कालावधी द्या, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी चार वर्षांत काय दिवे लावले, असा सवाल माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज उपस्थित केला. मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्‍नी टोलवाटोलवी सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले.

श्री. चव्हाण यांनी आज येथील दत्त चौकात सुरू असलेल्या महिलांच्या ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. आमदार आनंदराव पाटील, मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे या वेळी उपस्थित होते. श्री. चव्हाण म्हणाले, "2014 मध्ये मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिले. त्यानंतर त्यावर न्यायालयीन कार्यवाही सुरू झाली. त्यामुळे आरक्षणाला स्थगिती मिळाली. त्यानंतर भाजप सरकारने आरक्षणाबाबत काहीच केले नाही. आरक्षणाच्या अध्यादेशात काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्यात सुधारणा करून ते विधेयक मांडण्याची सरकारची जबाबदारी असतानाही एका अक्षराचाही बदल न करता तोच अध्यादेश पारित केला. मुख्यमंत्री आता म्हणताहेत, की चार महिन्यांचा कालावधी द्या. तुमच्याकडे चार वर्षे होती. त्यादरम्यान काय दिवे लावले? मराठा समाजाला राज्य मागासवर्ग आयोगाने आरक्षण नाकारले तर पुढे काय करायचे, याचा काहीच प्लॅन सरकारकडे नाही.''

राहुल गांधींसमवेत आज बैठक
आरक्षणाबाबत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी उद्या (मंगळवारी) दिल्लीत तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील आरक्षणाबाबतची स्थिती मांडणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
.......................
O27213
कऱ्हाड ः पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी मराठा आंदोलनास्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. यावेळी ठिय्या आंदोलन करणाऱ्या महिलांचे आरक्षणाबाबतचे निवेदनही त्यांनी स्वीकारले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKrantiMorcha reservation agitation Prithviraj chavan