कोल्हापूर विमानतळावरून नवीन वर्षात 'टेक ऑफ'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

डागडुजीसाठी 55 कोटी रुपये देण्याचा सरकारचा निर्णय
मुंबई - नवीन वर्षात कोल्हापूर विमानतळावरून 40 आसनाची विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, विमानतळाच्या डागडुजीसाठी सरकारचा 20 टक्‍के हिस्सा म्हणजेच 55 कोटी रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी घेतला.

डागडुजीसाठी 55 कोटी रुपये देण्याचा सरकारचा निर्णय
मुंबई - नवीन वर्षात कोल्हापूर विमानतळावरून 40 आसनाची विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, विमानतळाच्या डागडुजीसाठी सरकारचा 20 टक्‍के हिस्सा म्हणजेच 55 कोटी रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी घेतला.

मंगळूर विमानतळावर 2013 मध्ये झालेल्या अपघातानंतर राज्यातील कोल्हापूरसह अन्य विमानतळांचे उड्डाण परवाने रद्द झाले होते. त्यानंतर पुण्यासह बेळगाव आणि अन्य विमानतळांनी नव्याने परवाने मिळविले असून त्याच धर्तीवर कोल्हापूर विमानतळासाठी केंद्राकडून परवाना मिळविण्यात येईल, अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी "सकाळ'ला दिली. 2013 मध्ये विमानतळाचे विस्तारीकरण करण्यासाठी कोल्हापूर विमानतळ "एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया'कडे सोपविण्यात आले होते. केंद्र सरकार यासाठी 300 कोटींचा खर्च करणार असून काही कामांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. मात्र, केंद्राची कामे पूर्ण होईपर्यंत राज्यसरकार विमानसेवेसाठी प्रतीक्षा करणार नाही. येत्या 1 जानेवारी पासून 40 आसनांच्या विमानाच्या दररोज दोन फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

विमानतळाच्या विस्तारासाठी 5.5 हेक्‍टर खासगी जमिनीची आवश्‍यकता असून रेडिरेकनरच्या पाचपट मोबदला देऊन संपादन करण्यात येणार आहे. तसेच वन विभागाच्या मालकीची 11 हेक्‍टर जमीन ताब्यात घेण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. या जमिनी मिळाल्यानंतर या मार्गावर बोईंग सेवाही सुरू करण्यात येणार आहे. कोल्हापूरहून सेवा सुरू करण्यास अनेक विमान कंपन्या तयार आहेत. मात्र, त्यांना प्रवासी न मिळाल्यास नुकसान सहन करण्याची तयारी नाही. यावर उपाययोजना म्हणून केंद्राच्या धोरणानुसार रिकाम्या आसनांची केंद्र व राज्याकडून नुकसानभरपाई देण्याची तयारी असल्याचे सकरारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

कोल्हापूरहून विमानसेवा सुरू झाल्यास कोल्हापूरच्या पर्यटन तसेच उद्योगवाढीसाठी चांगला उपयोग होणार आहे. नवीन वर्षात सेवा सुरू करण्यासाठी रात्रीची सेवा आणि विमान उड्डाणचा परवाना मिळण्यासाठी
केंद्रासोबत काल दिल्ली येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी 274 कोटी रुपयांच्या कोल्हापूर विमानतळाच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली. मात्र, महाराष्ट्र शासनाने त्यातील काही हिस्सा उचलावा, अशी अट घातली. त्यामुळे आज खासदार धनंजय महाडिक, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अमोल महाडिक, सुरेश हाळवणकर, हिंदुराव शेळके यांच्या समवेत, मुंबईत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची तातडीने भेट घेतली. खासदार महाडिक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना कोल्हापुरचे विमानतळ सुरु होण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची आणि मंगळवारच्या दिल्लीतील बैठकीची माहिती दिली.

कोल्हापुरची विमानसेवा सुरु होण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ 20 टक्के म्हणजे सुमारे 55 कोटी रुपये मंजुर केले.

तशी घोषणाच मुख्यमंत्र्यांनी केली. कोल्हापूर दरम्यान, विमानतळासाठी खाजगी विमान कंपन्यांनी काही सवलती मागितल्या आहेत. यामध्ये विमानांचे लॅंडिंगख्‌ पार्किंग शुल्कात माफी असावी, पेट्रोल,डिझेलवरील 2 टक्‍के असणारा सेस आणि व्हॅट करात सवलत मिळण्याची मागणी कंपन्यांनी केली आहे. या संदर्भात राज्यसरकार सकारात्मक विचार करत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: kolhapur airport