अवघे एकोणसत्तर वयोमान...!

संभाजी गंडमाळे
Friday, 22 September 2017

जागर स्त्री शक्तीचा...!

आदिशक्तीच्या जागराच्या पार्श्‍वभूमीवर विविध क्षेत्रांतील यशोलौकिकाच्या शिलेदार ठरलेल्या आधुनिक दुर्गांविषयी....
 

वय वर्षे अवघे एकोणसत्तर; पण या वयातही सलग वीस-एकवीस दिवस आणि दररोज किमान बारा तास अथक मेहनत घेऊन त्या विविध कलाकृती साकारतात. दोऱ्यातून मणी ओवण्याचे काम तसे नवीन नाही. परंतु त्यातून एखादी अनोखी कलाकृती निर्माण करण्याचे त्यांचे कौशल्य काही औरच. त्यातही त्यांच्या पोर्ट्रेट कलाकृती म्हणजे जगभरात अशा कलाकृती अजूनही फारशा कुणी साकारलेल्याच नाहीत. नुकतेच त्यांनी ५० हजार मण्यांतून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पोर्ट्रेट साकारले असून आता जेआरडी टाटा यांची कलाकृती त्या हाती घेणार आहेत...

येथील डॉ. मेघना कामत यांचा हा कलात्मक प्रवास. केवळ मण्यांच्याच कलाकृती नव्हे, तर विणकाम आणि क्रॉसस्टिचमध्येही त्यांचा या वयातील उत्साह तरुणांनानाही लाजवेल असाच. केवळ छंद म्हणून त्यांनी ही कला जोपासली; पण ही कलाच अशी आहे की, ती तितकी सोपी नाही. प्रचंड मेहनतीच्या जोरावरच अशा कलाकृती साकारल्या जाऊ शकतात. त्यातही एकेक मणी ओवून त्यातून कलाकृतीला आकार देण्याच्या त्यांच्या हातोटीला सलामच. आजवर ५० लाखांहून अधिक मण्यांच्या सहाय्याने त्यांनी अशा शेकडो कलाकृती तयार केल्या आहेत. वेगवेगळ्या वायर्सचा वापर करून आकर्षक बॅग्ज तयार केल्या आहेत. ५२ हजार मण्यांपासून त्यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची कलाकृतीही साऱ्यांनाच भुरळ घालते. वैद्यकीय शिक्षणातील पदवी असली तरी डॉ. कामत यांनी आईकडून प्रेरणा घेऊन मण्यांच्या विणकामाचा छंद जोपासला. सध्या ही कला दुर्मीळ होत असताना तासन्‌तास परिश्रम घेऊन त्यांनी अनेक कलाकृती साकारल्या. २० हजारांहून अधिक छोट्या मण्यांतून त्यांनी राजमुद्राही साकारली आहे. 

आईकडून प्रेरणा...
डॉ. कामत यांच्या आई (कै.) डॉ. कांता याही वयाच्या ८६ पर्यंत विणकामात रममाण होत्या. दुसऱ्या दिवशी उठून त्यांना कार्पेट विणायचे होते आणि त्याची तयारीही त्यांनी डॉ. कामत यांच्याकडून करून घेतली होती; मात्र त्यानंतर चार तासांतच त्यांचे निधन झाले. त्यांची हीच कला पुढे डॉ. कामत यांनी आयुष्यभर आपलीशी केली आणि त्यामुळेच एकापेक्षा एक सरस कलाकृती साकारल्या गेल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news jagar strishakaticha