आला रे आला कोल्हापूरात हापूस आला ; बापरे : पहिल्या पेटीला 'एवढा' दर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

ऑक्‍टोबरमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. यात मोहोर गळून गेल्याने आंबा हंगाम पुढे गेला आहे.

मालवण (सिंधुदूर्ग) : तालुक्‍यातील कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार सूर्यकांत ऊर्फ आबा फोंडेकर यांच्या बागेतून हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला रवाना झाली आहे. जिल्ह्यात प्रथमच जानेवारीत हापूसची पहिली पेटी कोल्हापूर मार्केटला पाठविली आहे.अवकाळी पावसामुळे यंदा आंब्याचे पीक उशिराने येण्याची शक्‍यता आंबा बागायतदारांमधून व्यक्त करण्यात येत होती; मात्र कुंभारमाठ येथील फोंडेकर यांच्या बागेतील ऑक्‍टोबरमध्ये आलेल्या मोहोराचे जानेवारीत परिपक्व फळात रुपांतर झाले आहे.

यात चार डझन हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूर मार्केटमध्ये पाठविली. गतवर्षीही फोंडेकर यांनी जिल्ह्यातून सर्वप्रथम हापूस आंब्याची पेटी मार्केटमध्ये रवाना केली होती.
ऑक्‍टोबरमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. यात मोहोर गळून गेल्याने आंबा हंगाम पुढे गेला आहे. आता आंबा हंगाम एक टप्प्यात न होता तीन ते चार टप्प्यात विभागला गेला आहे.

हेही वाचा- ‘ती’ आत्मनिर्भर होत आहे..

...म्हणून केली कोल्हापूरची निवड
सिंधुदुर्गातील हापूस आंब्याला राज्यासह देशभरातून मोठी मागणी असते; मात्र सर्वसाधारणपणे सिंधुदुर्गातून हापूस आंबा हा वाशी मार्केटमध्येच पाठविण्याचा ट्रेंड आहे. मध्यंतरीच्या काळात दलालांमुळे वाशी मार्केटमध्ये आंब्याला अपेक्षित दर मिळेनासा झाला. त्यामुळे बागायतदारांनी नव्या बाजारपेठा शोधल्या. आताही जीथे चांगला दर मिळेल तिथे बागायतदार आंबे पाठवतात. सद्यःस्थितीत मुंबई मार्केटमध्ये हापूस आंब्याला चांगला दर मिळण्याची शक्‍यता नसल्यानेच कोल्हापूर मार्केटची निवड केली आहे. यात आपल्या हापूस आंब्याला चांगला दरही मिळाल्याचे आंबा बागायतदार आबा फोंडकर यांनी सांगितले.

हेही वाचा- आता जीपीएसवर हि पिता येणार पाणी...

पहिल्या पेटीला नऊ हजारांचा दर
या वर्षातील आंबा हंगामातील पहिली पेटी कोल्हापूर मार्केटला पाठविण्याचा मान कुंभारमाठ येथील आबा फोंडेकर यांना मिळाला आहे. चार डझनाच्या या आंबा पेटीला ९ हजार रुपयांचा दर मिळाला असल्याची माहिती श्री. फोंडेकर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindudurga Mango Entry In Kolhapur Market Kolhapur Marathi News