आजऱ्यात 110 पैकी इतक्‍या गरोदर महिला कोरोना पॉझिटिव्ह, प्रसूती सुसह्य करण्यासाठी नियोजनाची गरज

रणजित कालेकर
Monday, 14 September 2020

गरोदर महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह की, निगेटिव्ह या घोळात काही दिवसांपूर्वी एका महिलेची रुग्णालयाच्या दारातच प्रसूती झाली. त्यामुळे ऐन कोरोनाच्या काळात गरोदर महिलांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

आजरा : गरोदर महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह की, निगेटिव्ह या घोळात काही दिवसांपूर्वी एका महिलेची रुग्णालयाच्या दारातच प्रसूती झाली. त्यामुळे ऐन कोरोनाच्या काळात गरोदर महिलांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. सध्या आरोग्य विभागाच्या नोंदणीनुसार तालुक्‍यात नजीकच्या काळातील संभाव्य प्रसूतीच्या 110 गरोदर माता आहेत. यांपैकी दहा जणींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांपैकी दोन मातांची प्रसूती झाली आहे. 

शेजारील गडहिंग्लज पंचायत समितीने याबाबत नियोजन केले आहे. असे नियोजन आजरा तालुक्‍यात होणे गरजेचे आहे. जेणेकरून त्या महिलेबाबत झालेली हेळसांड पुन्हा इतर गरोदर मातांबाबत होणार नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नॉन कोविड रुग्णांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे अनेक खासगी रुग्णालये बंद आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर विविध आजाराने ग्रस्त असलेल्यांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

अशा काळात गरोदर मातांचा प्रश्‍न आणखीनच बिकट झाला आहे. महिलांच्या गरोदर अवस्थेत दोन जीवांचा प्रश्‍न असतो. अशा गरोदर माता कोणत्याही परिस्थितीत रुग्णालयाच्या दारातून परत जाणार नाहीत याचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

आजरा तालुक्‍यातील आरोग्य विभागाकडे आजअखेर चार प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे सुमारे 500 गरोदर मातांची नोंद झाल्याचा अहवाल आहे. यामध्ये नजीकच्या काळातील संभाव्य प्रसूतीमध्ये 110 गरोदर माता आहेत. यांपैकी दहा जणींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांपैकी दोन मातांची प्रसूती झाली आहे. उर्वरित 108 गरोदर मातांची प्रसूती सुसह्य होण्यासाठी आरोग्य विभागाकडून काटेकोर नियोजनाची गरज व्यक्त होत आहे. 

लवकरच नियोजन
गरोदर मातांची प्रसूती सुसह्य करण्यासाठी आरोग्य विभाग व केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालयाचे उपाध्यक्ष अनिरुध्द रेडेकर यांच्याशी बोलणे झाले आहे. गरोदर मातांची केंद्रनिहाय विभागणी करण्यात येणार असून त्याबाबत आरोग्य अधिकारी, रुग्णालयांचे प्रमुख यांची बैठक लावून लवकरच नियोजन केले जाणार आहे. 
- उदयराज पवार, सभापती, आजरा पंचायत समिती. 

गरोदर मातांविषयी सूचना 
गरोदर मातांची प्रसूतीची अपेक्षित तारखेपूर्वी दहा दिवस अगोदर अँटिजन टेस्ट करावी. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रांना सूचना दिल्या आहेत. निगेटिव्ह असलेल्यांची ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती केली जाणार आहे. जोखीमग्रस्त गरोदर मातांची गडहिंग्लज व महागाव येथील धर्मादाय रुग्णालयात त्याचबरोबर आजऱ्यातील खासगी रुग्णालयातही प्रसूती करण्याचे नियोजन असल्याचे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र गुरव यांनी सांगितले. 

केंद्रनिहाय पॉझिटिव्ह माता 
आजरा तालुक्‍यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे नोंद झालेल्या गरोदर माता व कंसात पॉझिटिव्ह मातांची संख्या- वाटंगी प्रा. आ. केंद्र - 32 (5), उत्तूर प्रा. आ. केंद्र- 27 (2), मलिग्रे प्रा. आ. केंद्र- 15 (1), भादवण प्रा. आ. केंद्र- 35 (2). 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 Pregnant Women Corona Positive In Ajara Taluka Kolhapur Marathi News