सामाजिक लोकशाहीचा अन् उदार मनाचा दिलदार कलासक्त राजा...

126 birth anniversary of shahu maharaj
126 birth anniversary of shahu maharaj

गुलामगिरीतून शुद्रातिशुद्रांची मुक्तता करण्यासाठी सामाजिक क्रांतीची पताका स्वतःच्या खांद्यावर घेऊन कार्य करणारे महाराजांचे महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज अशी राजर्षींची जगभर ओळख. अनेक सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करताना महाराजांनी करवीर संस्थानात कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण अशा सर्वच प्रांतांत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्याचवेळी त्या त्या क्षेत्रातील मोती पारखून त्यांना पाठबळही दिले. राजर्षी शाहूंच्या १४६ व्या जयंतीनिमित्त अशाच काही प्रातिनिधिक दिग्गजांच्या वारसांशी ‘सकाळ’ने संवाद साधला. त्यांच्याच शब्दांत राजर्षी शाहूंच्या कार्याची ही महती...

उदार मनाचा दिलदार कलासक्त राजा...

मराठी रंगभूमीच्या इतिहासात संगीतसूर्य नटसम्राट केशवराव भोसले हे अग्रक्रमाने घ्यावे लागणारे नाव. शास्त्रशुद्ध आणि पल्लेदार गायकीने त्यांनी रसिकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य केले. ‘ललितकलादर्श’ नाटक कंपनीसाठी त्यांनी स्पेशल रेल्वे घेतली होती. मराठी रंगभूमीला अनेक नवे आयाम देणारे हे व्यक्तिमत्त्व.  

वयाच्या दहाव्या वर्षी केशवरावांच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक प्रसंग घडला आणि केशवराव रंगमंचावर आले आणि त्यांनी राजर्षी शाहू महाराजांची प्रशंसा मिळवली. महाराजांनी बांधलेल्या पॅलेस थिएटरचे उद्‌घाटन त्यांच्या नाटकाने झाले. खासबाग मैदानात शाहू महाराजांनी ३ फेब्रुवारी १९२० ला केशवरावांच्या ‘मृच्छकटिक’ या नाटकाचा जनतेसाठी मोफत प्रयोग केला. 
ओपन थिएटरमध्ये झालेला हा भारतातील पहिलाच प्रयोग आणि या प्रयोगाला २५ हजारांवर पुरुष व पाच हजारांवर महिला प्रेक्षकांची उपस्थिती होती. कलेबाबत आदर असल्‍याने केशवरावांचा प्रयोग पाहण्यासाठी महाराज मिरजेत आवर्जून गेले आणि केशवरावांना कोल्हापुरात प्रयोगासाठी निमंत्रित केले होते. उदार मनाचा दिलदार कलासक्त राजा म्हणून 
केशवरावांच्या मनात शाहू महाराजांविषयी नेहमीच आदर होता आणि महाराजांनीही केशवरावांना तितकाच आदर देत नेहमीच पाठबळ दिले. या कलासक्त राजाला मानाचा मुजरा...!
- मोहनराव शिंदे (केशवराव भोसले यांचे नातू)

कैकाडी, पारधींना दिला सन्मान
गुंड, चोर, दरोडेखोर, माकडवाला समजल्या जाणाऱ्या पारधी समाजातील व्यक्तींना शाहू महाराजांनी नोकरी दिली. त्यांना नेहमी सोबत ठेवले. कैकाडी आणि पारधी समाजाला महाराजांनी मानसन्मान दिला. कुणाचेही मूल्यांकन हे जाती आणि धर्मावर न होता कर्तृत्वावर झाले पाहिजे, ही शिकवण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिली. ब्रिटिश राजवटीत जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे जंगलात राहणारे पारधी आणि कैकाडी हे दोन्ही लोक शहराकडे आले. ब्रिटिशांनी देशात कायदा करून त्यांना खुल्या कारागृहात ठेवले. मात्र, राजर्षींनी हा कायदा येथे लागू केला नाही. उलटपक्षी तोरगल, रामदुर्ग आणि कटकोळ (कर्नाटक) येथून काही लोक राजवाड्यात आणून त्यांना नोकऱ्या दिल्या. यातूनच दोन्ही समाजाचे लोक माणसांत आले. माझे आजोबा इराप्पा हे राजवाड्यात होते आणि आत्या दुर्गव्वा हे दोघेही प्लेग साथीचे साक्षीदार होते. महाराज मुंबईतील गव्हर्नरना भेटण्यासाठी गेले होते. तेथे माकडांनी उच्छाद मांडला होता. त्यावेळी महाराजांनी कोल्हापुरातून माकडवाले तेथे नेले आणि त्यांनी क्षणात हा उच्छाद थांबवला होता. म्हणूनच २०१३ मध्ये झालेल्या पहिल्या भटके विमुक्त साहित्य संमेलनात राजर्षींना ‘भारतरत्न’ पदवी देण्याची मागणी केली आणि आजच्या जयंतीदिनीही तीच मागणी कायम आहे. 
- दलितमित्र व्यंकाप्पा भोसले


शाहिरी महोत्सव रंगायला हवा...
छत्रपती शाहू महाराजांनी आबाजींच्या (शाहीरतिलक पिराजीराव सरनाईक) हातातील बर्फी खाल्ली आणि आबाजींना जीवनात गोडवा निर्माण झाल्याची जाणीव झाली. वयाच्या शंभराव्या वर्षी शाहू जयंतीला पोवाडा म्हणण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, ती अपुरी राहिली. सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनात त्यांना ‘शाहीरतिलक’ किताबाने गौरविले गेले. शहाजी महाराज तर आबाजींसाठी बग्गी पाठवून द्यायचे. छत्रपती घराण्यावर त्यांनी पोवाडे रचले. त्यातूनच दरबारी शाहीर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर यांचा त्यावेळी कोल्हापुरात जाहीर सत्कार झाला. सूर्यकांत खांडेकर यांनी लिहिलेला पोवाडा आबाजींनी म्हटला. कऱ्हाड येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनावेळी पहाडी आवाजातील पोवाडा ऐकून पु. ल. देशपांडे यांनी आबाजींना मिठ्ठी मारली होती. अमर सरनाईक यांनी शाहिरांच्या नावे ट्रस्टची स्थापना केली आहे. राजर्षी शाहू महाराज आणि शाहिरांच्या आठवणी जोपासायच्या असतील तर शाहिरी महोत्सव पुन्हा सुरू करून त्यात सातत्य ठेवण्याचा निर्धार शाहूंच्या जयंतीदिनी सर्वांनी करायला हवा.  
- विजय सरनाईक (पिराजीराव सरनाईक यांचे पुत्र)

कृतिशील विचारांचा प्रभाव आजही
दत्तात्रय तथा दत्तोबा संतराम पोवार मूळचे शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकातले. अस्पृश्‍यांचे पुढारी म्हणून त्यांची ओळख. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांना कोल्हापूरच्या नगरपालिकेच्या स्थायी समितीचे चेअरमन केले. श्री. पोवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शाहू महाराजांशी भेट घडवून आणली होती. माणगाव परिषदेच्या आयोजनातही ते होते. वकिलीच्या क्षेत्रातील उच्चवर्णियांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी शाहू महाराजांनी ११ मार्च १९२० ला करवीर इलाख्यातील सर्व कोर्टात वकिली करण्यासाठी सनदा देऊ केल्या. त्यात पोवार यांचेही नाव होते. ते शाहू महाराजांचे निष्ठावंत सेवक व छत्रपती राजाराम महाराज यांचेही विश्‍वासू होते. राजाराम महाराज त्यांना नेण्यासाठी घरी येत. निवृत्ती चौकात डॉ. आर. डी. पोवार यांचा दवाखाना आहे. डॉ. पोवार हे दत्तोबा पोवार यांचा मुलगा व माझा भाऊ. शेवटच्या श्‍वासापर्यंत त्याने वडिलांच्या विचारांचा वारसा चालवला. विठाबाई ही आमची आई. मीराबाई, नंदा, राजेंद्र, रघुनाथ, प्रभाकर व मी सारी भावंडं. माझी पुतणी डॉ. रेखा पोवार ही निवृत्ती चौकात दवाखाना चालवते. राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव आजही आम्हावर आहे.  
- इंदूबाई सोनगावकर (दत्तोबा पोवार यांची मुलगी, सध्या राहणार वसई, मुंबई)

सामाजिक सुधारणांचे खंदे पुरस्कर्ते
दत्तोबा दळवी म्हणजे रावबहादूर माधवराव धुरंधरांचे विद्यार्थी आणि करवीर संस्थानचे दरबारी चित्रकार. छत्रपती शाहू महाराज आणि त्यांच्यानंतर छत्रपती राजाराम महाराज या दोन छत्रपतींच्या पिढ्या, त्यांच्या राजघराण्यातील कुटुंबीयांच्या आदरास ते पात्र ठरले. चित्रकला, भरतकामातील ते एका अर्थाने राजगुरूच आणि दळवीज्‌ आर्ट इन्स्टिट्यूटचे ते संस्थापक. गोंदकाम तरबेज असल्याने भारतातील अनेक संस्थानिकांनी त्यांना निमंत्रित करून हातावर नक्षी काढून घेतली. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राजर्षी शाहू महाराजांकडून आर्थिक सहाय्यासाठी पुढाकार घेतला होता. याबाबतची दोन अप्रकाशित पत्रे काही वर्षांपूर्वी त्यांच्या खासगी दप्तरातून मिळाली आहेत. ४ सप्टेंबर १९२१ रोजी बाबासाहेबांनी लिहिलेल्या पत्रात शाहू महाराजांना विनंती करून लवकरात लवकर पैसे पाठवण्याची लंडनहून विनंती केली आहे. लंडनहून मुंबईला परतल्यानंतर ८ मे १९२३ रोजी बाबासाहेबांनी लिहिलेले दुसरे पत्रही अप्रकाशित आहे. एकूणच राजर्षी शाहू महाराज आणि देशातील तत्कालीन समाजसुधारकांशी दत्तोबा दळवी यांचा स्नेह होता. आम्ही राजर्षी शाहूंचा विचार आणि कार्य जगभरात पोचावे, यासाठी प्रयत्न करतो आहे. दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटच्या माजी विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहूंचे कार्य भारतीय लघुचित्र शैलीतून सर्वांसमोर उलगडले. सामाजिक सुधारणांच्या पुरस्कर्त्या राजाला त्रिवार वंदन...!    
- चित्रकार अजय दळवी (दत्तोबा दळवी यांचे नातू)

विचारांचा वारसा आचरणातून जपला
भास्करराव विठोजीराव जाधव हे करवीर संस्थानचे महसूल मुख्य अधिकारी, जिल्हा व सत्र न्यायाधीश होते. छत्रपती शाहू महाराजांशी त्यांचा स्नेह होता. सामाजिक सुधारणांत त्यांचे मोठे योगदान होते. शेतकरी संघ, कोल्हापूर अर्बन बॅंक या संस्थांची त्यांनी स्थापना केली. त्यांना चार मुले आणि चार मुली होत्या. मुली सत्यवती, डॉ. ताराबाई, इंदूमती आणि मैत्रेयी याही शिक्षित आणि संस्कारित होत्या. भास्कररावांचे पुत्र हिंदुराव, विठोजीराव, आप्पासाहेब आणि कर्नल आनंदराव यांनी कार्यातून त्यांचा वारसा टिकवला. अप्पासाहेब जाधव यांनी सहकारक्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांचे पुत्र रणजित जाधव यांनीही अर्बन बॅंकेच्या संचालक पदाच्या माध्यमातून सहकार चळवळ बळकट केली. त्यांच्या पश्‍चात त्यांच्या पत्नी गीता या संचालिका आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा त्यांचे पुत्र आदित्य यांनी सुरू ठेवला आहे. आजही त्यांचे वारसदार शाळेला वा कुष्ठरोग्यांच्या केंद्राला मदत करतात. घरात मृत्यूनंतर कोणतेही विधी किंवा दिवस पाळले जात नाहीत. रक्षाविसर्जनावेळी नैवेद्य वगैरे केले जात नाहीत. घरीच नातेवाईक आणि आप्तेष्ट यांच्यासमवेत प्रार्थना होते व सर्व जण कामाला सुरुवात करतात. २६ जूनला भास्करराव यांचा स्मृतिदिन असतो. यानिमित्त सर्व कुटुंबीय विविध सामाजिक उपक्रम राबवतात.   
- आदित्य जाधव (भास्करराव जाधव यांचे पणतू) 

(संकलन ः लुमाकांत नलवडे, संभाजी गंडमाळे, युवराज पाटील, ओंकार धर्माधिकारी, संदीप खांडेकर.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com