सराईत चोरट्यांकडून 24 तोळे दागिने जप्त

पंडित कोंडेकर
Monday, 28 September 2020

कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जाखले व वारणानगर येथे झालेले दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणी दोन चोरट्यांना अटक करण्यात इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीतील 24 तोळे दागिन्यांसह दोन मोटारसायकली, दोन मोबाईल असा 10 लाख 48 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

इचलकरंजी ः कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जाखले व वारणानगर येथे झालेले दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणी दोन चोरट्यांना अटक करण्यात इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीतील 24 तोळे दागिन्यांसह दोन मोटारसायकली, दोन मोबाईल असा 10 लाख 48 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

संतोष सिद्धू पुजारी (वय 35, वडणगे, ता. करवीर) व राहुल उत्तम देवकर (मांगले, ता. शिराळा) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक विकास जाधव यांनी पत्रकारांना दिली. यावेळी कोडोलीचे उपनिरीक्षक नरेंद्र पाटील उपस्थित होते.

चौंडेश्‍वरी सूतगिरणी ते शिरोळकडे जाणाऱ्या मंगोबा मंदिरजवळ चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी दोघे येणार असल्याची माहिती इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार श्री. जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकांने संशयितांना ताब्यात घेतले. या वेळी त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, लोखंडी रॉड, स्क्रू ड्रायव्हर असे साहित्य मिळाले. तपासात त्यांच्याकडून वरील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. सुरुवातीला 97 ग्रॅमचे दागिने त्यांच्याकडून हस्तगत केले. उर्वरित तपास केल्यानंतर एकूण 243 ग्रॅमचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. संशयितांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली.

या प्रकरणाचा संयुक्त तपास इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखा व कोडोली पोलिस यांनी केला. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. जाधव, सुरज बनसोडे, उपनिरीक्षक श्री. पाटील, सहाय्यक फौजदार खंडेराव कोळी, हवालदार संभाजी भोसले, राजीव शिंदे, शहनाज कनवाडे, रणजीत पाटील, प्रशांत कांबळे, बालाजी पाटील, रविराज कोळी, संजय इंगवले, फिरोज बेग, महेश खोत, अमर शिरढोणे, आयुब गडकरी, सुरज चव्हाण, अजिंक्‍य घाटगे, संदीप मळघणे, विश्‍वास चिले, संभाजी खताळ यांनी भाग घेतला. 

सराईत चोरटा 
या गुन्ह्यातील वडणगे येथील संशयित संतोष पुजारी हा रेकॉर्डवरील सराईत चोरटा आहे. त्याच्यावर यापूर्वी दरोडा, घरफोडी, दुचाकी चोरीचे गुन्हे नोंद आहेत. एका गुन्ह्यात त्याला 5 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षाही झाली आहे. 

संपादन ः रंगराव हिर्डेकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 24 weights of jewelery seized from Sarait thieves