"आरोग्य सेतू'द्वारे शोधले 46 "हॉटस्पॉट', गडहिंग्लज उपविभागात तत्काळ प्रतिबंधात्मक उपाय

46 Corona Hotspots In Gadhinglaj Subdivision Kolhapur Marathi News
46 Corona Hotspots In Gadhinglaj Subdivision Kolhapur Marathi News

 गडहिंग्लज : शासनाच्या आरोग्य सेतू ऍपद्वारे गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यातील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या संख्येवरून हॉटस्पॉट शोधण्यात आले आहेत. तिन्ही तालुक्‍यातील या हॉटस्पॉटची संख्या 46 इतकी आहे. या प्रत्येक ठिकाणी प्रशासनाकडून तत्काळ प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यावर भर देण्यात येत आहे. त्याची प्रत्यक्ष कार्यवाहीही सुरू झाली आहे. 

गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यात आजअखेर 950 हून अधिक कोरोना बाधितांची संख्या आहे. स्थानिक संसर्ग वाढल्याने बाधितांच्या संख्येचा आलेख उंचावत जात आहे. बाधितांच्या संपर्कातील लोकांना शोधणे आव्हान ठरत असताना प्रशासनाला आरोग्य सेतू ऍपची मदत मिळाली आहे. बाधित व्यक्तीने या ऍपवर आपला स्टेटस पॉझिटिव्ह नमूद केल्यानंतर त्याच्या संपर्कात परिसरातील किती लोक आहेत, याचा अंदाज येतो. त्याच आधारे जिल्हाधिकारी कार्यालयातील यंत्रणेने जिल्ह्यातील हॉटस्पॉट शोधले आहेत.

जिल्ह्यात ही संख्या दोनशेहून अधिक असून त्यात या तीन तालुक्‍यांतील 46 गावांचा समावेश आहे. गडहिंग्लजमध्ये 16, चंदगडला 20 आणि आजऱ्यात 10 गावांत बाधितांच्या संपर्कातील संख्या अधिक दाखविले आहे. प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी गडहिंग्लज व चंदगड तहसीलदार, नगरपालिका, नगरपंचायती मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना या हॉटस्पॉटनुसार तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याची सूचना केली आहे.

गडहिंग्लजचे तहसीलदार दिनेश पारगे यांनी तालुक्‍यातील हॉटस्पॉटमध्ये उपाययोजनाचे काम सुरूही केले आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय संपर्कातील लोकांवर बारीक लक्ष ठेवून कोरोनाचा प्रसार होणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. गावांना भेटी देण्यासाठी जाणारे अधिकारी जनजागृती करत आहेत.

याशिवाय कोरोना प्रतिबंधासाठी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन करणारे ऑडिओ क्‍लिपही प्रत्येक ग्रामपंचायतींना दिली आहे. त्याद्वारे होणाऱ्या जागृतीतून अनेक लोक आरोग्यदायी आयुर्वेदिक काढा पिण्यासह गरम पाण्याचा वाफही घेत आहेत. आता आरोग्य सेतूच्या माध्यमातून शोधण्यात आलेल्या हॉटस्पॉटमधील लोकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यातही वृद्ध व इतर व्याधीग्रस्त लोकांमध्ये लक्षणे आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ कसे उपचार होतील यावर भर देण्यात येणार आहे. 

"हॉटस्पॉट'मध्ये होणाऱ्या उपाययोजना 
- संपर्कातील व्यक्तींना प्रतिकारशक्ती वाढीच्या अर्सेनिक अल्बम-30 गोळ्यांचे वाटप 
- थर्मल स्कॅनर, ऑक्‍सीमीटरद्वारे तपासणी. लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार सुरू 
- वयोवृद्ध आणि इतर व्याधीग्रस्तांवर अधिक लक्ष केंद्रित करणार. 
- पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांचे तत्काळ विलगीकरण. जेणेकरून संसर्ग वाढणार नाही. 
- संशयित व्यक्तींचे अँटिजेन किंवा नियमित स्वॅब तपासणी होणार 
- प्रत्येक हॉटस्पॉटमध्ये जाऊन जनजागृतीवर देणार भर 
- प्रत्येक गावात 100 टक्के मास्क व सोशल डिस्टन्सिंगचा नियम 

हे आहेत हॉटस्पॉट 
* आजरा तालुका : शिप्पूर तर्फ आजरा, गवसे, आजरा, यरंडोळ, विटे, महागोंड, वाटंगी, निंगुडगे, किणे, हत्तीवडे. 
* चंदगड तालुका : कारवे, माणगाव, शिनोळी, सुंडी, चंदगड, कुरणी, बुझवडे, नागनवाडी, दाटे, हलकर्णी, डुक्करवाडी, आमरोळी, किणी, राजगोळी खुर्द, अडकूर, नांदवडे, होसूर, कालकुंद्री 
* गडहिंग्लज तालुका : दुंडगे, हनिमनाळ, हसूरचंपू, भडगाव, चन्नेकुप्पी, गडहिंग्लज (शिवाजी चौक), गिजवणे, वडरगे, महागाव, कळवीकट्टे, करंबळी, नेसरी, इंचनाळ, हेब्बाळ जलद्याळ, मुंगूरवाडी, बुगडीकट्टी. 

कृती आराखडा करण्याची सूचना
बाधितांच्या संपर्कातील लोक घाबरून पुढे येईनासे झालेत. यामुळे वेळेत उपचार करणे अडचणीचे ठरत आहे. परिणामी बाधितांच्या संख्येसह मृत्यूदरही वाढत आहे. संपर्कातील व लक्षणे असणाऱ्यांनी न घाबरता, न लाजता वेळेत तपासणी करून घेतल्यास कोरोनाचा प्रसार रोखता येतो. घरीसुद्धा अलगीकरण करून उपचार करता येतात. या पार्श्‍वभूमीवर हॉटस्पॉटमध्ये राबवावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा कृती आराखडा करण्याची सूचना दिली आहे. 
- विजया पांगारकर, प्रांताधिकारी 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com