आयुष्यभर आईच्या पदराला धरुन राहिला, जीवनाचा शेवटही आईसोबतच झाला ; माय-लेकरावर काळाचा घाला

सकाळ वृत्तसेवा | Monday, 30 November 2020

रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुदाळतिट्ट्याकडे चालली होती. तर विठ्ठल खतकर हे आईला घेऊन दुचाकीवरून विठ्ठलाईच्या दर्शनासाठी दुर्गमानवाडकडे चालले होते.

सरवडे (कोल्हापूर) : राधानगरी तालुक्यातील खोराटे विद्यालयाजवळ एसटी व दुचाकीची समारासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील माय-लेकराचा जागीच मृत्यू झाला. विठ्ठल धुळाप्पा खतकर (वय ५०) व झिंबाबाई धुळाप्पा खतकर (वय ७५ दोघे रा. भडगाव, ता. कागल) अशी त्यांची नावे आहेत. राधानगरी-निपाणी या राज्य महामार्गावर रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेची नोंद राधानगरी पोलिसांत झाली आहे. 

घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती नुसार, राधानगरी आगाराची एसटी (एम एच- १२- ई एफ६४८८) रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुदाळतिट्ट्याकडे चालली होती. तर विठ्ठल खतकर हे आईला घेऊन दुचाकीवरून  (एम एच ०९  २९०१) विठ्ठलाईच्या दर्शनासाठी दुर्गमानवाडकडे चालले होते. खोराटे विद्यालयाजवळ एसटी व मोटारसायकलची समोरासमोर जोरादार धडक झाली. यात मोटारसायकल चालक विठ्ठल व मागे बसलेली त्यांची आई झिंबाबाई या रस्त्यावर १५ फूट अंतरावर फेकल्या गेल्या व दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. रस्त्यावर रक्ताचे थारोळे साचले होते. अपघातातील मृत व्यक्तींची ओळख लवकर पटत नव्हती. पोलिसांनी  विठ्ठल यांच्या खिशातील डायरी काढल्यानंतर ते दोघेही भडगाव येथील असल्याचे समोर आले. अपघाताची माहिती भडगाव गावात देण्यात आली त्यानुसार भडगाव ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

Advertising
Advertising

हेही वाचा - कोल्हापूर : उजळाईवाडीत स्क्रॅप दुकानाला आग-

भडगावात शोककळा

म्हाकवे :  दरम्यान माय- लेकरांच्या मृत्यूची माहिती समजात संपूर्ण भडगाव गाव सुन्न झाले. गाव बंद ठेवण्यात आले. गावातील गल्लोगल्ली स्मशान शांतता होती. ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दुःखाचे सावट होते. विठ्ठल यांच्या पत्नी, मुले, भाऊ, नातेवाईकांनी फोडलेल्या हंबरड्याने लोकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. चार वर्षापुर्वी विठ्ठलच्या वडिलांचे निधन झाल्याने संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने प्रतीक व आदर्श ही दोन्ही मुले पोरकी झाली. प्रतीक बारावीत तर आदर्श अकरावीमध्ये शिकत आहे. 

मृत्यूने हळहळ 

विठ्ठल खतकर हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. ते मुरगूड येथील श्रीकृष्ण सहकारी दूध व्यावसायिक व कृषिपूरक संस्थेत सचिव म्हणून काम पाहत होते. रविवारी सकाळी त्यांनी संस्थेत येऊन संस्थेचे कामकाज पाहिले. त्यानंतर भडगाव येथील आपल्या घरी जाऊन जेवण केले व आईला सोबत घेऊन दुर्गमानवाड येथील विठ्ठलाईच्या देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच मूरगडमध्येही हळहळ व्यक्‍त होत आहे.

 

संपादन - स्नेहल कदम