दुपदरीकरण झाले तरीही अपघात प्रवणता 

Accidentally prone to misalignment
Accidentally prone to misalignment

राधानगरी : परितेपासून गैबी तिट्यापर्यंतचा वीस किलोमीटरचा राज्यमार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभाग राधानगरीकडे येतो. हा राज्यमार्ग राधानगरी -कोल्हापूर तळ कोकणासह गोवा आणि कर्नाटक राज्याकडे होणाऱ्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. 

जवळपास दशकाहून अधिक काळ सुधारण्यापासून वंचित राहिलेल्या या मार्गाची चार वर्षांपूर्वी डागडुजी केली. पूर्वीचा साडेपाच मीटरचा रस्ता सात मीटरचा होऊन त्याचे दुपदरीकरण झाले. हा मार्ग सुरक्षित आणि वाहतूक योग्य बनला तरी काही ठिकाणची अपघात प्रवणता कायमच आहे. 

यावर असणाऱ्या सात गावांदरम्यान अतिक्रमणे झाल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांची संख्या वाढतच आहे. रुंदीकरणावेळी बाजू पट्ट्यांचे मजबुतीकरण झाले. मात्र काही काळातच त्या अतिक्रमणात गेल्या. त्यावर शेण माती- दगडांचे ढिगारे' गवताच्या गंजी, पिंजऱ्याच्या व्हळ्या, लाकडे असे ढिगारे वाढले. रस्त्यालगतच्या गावात बाजू पट्ट्या गायबच झाल्या आहेत. या गावातील ग्रामस्थांचा सहभाग व सहकार्य यातूनच बाजूपट्ट्या खुल्या राहण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. 

मार्गावरील तळकोकण व गोव्याकडे होणाऱ्या प्रवासी व माल वाहतुकीच्या वाहनांची वर्दळ वाढली, मात्र रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट, धोकादायक वळणे, ओढ्यावरील पूल, आमजाई व्हरवडेचा नदीकाठचा धोकादायक कठडा, खिंडी व्हरवडे घाटातील कमकुवत संरक्षक भिंती यामुळे अपघातांची टांगती तलवार मार्गावर कायमच आहे. घोटवडे स्वयंभू देवालयाजवळ व ठिकपुर्ली फाटा हे दोन ब्लॅक स्पॉट आहेत. येथे वारंवार अपघात होतात. पुढे सात किलोमीटर घाट रस्त्याचे रुंदीकरण होऊन धोकादायक वळणे काढल्याने तो सुरक्षित बनलेला आहे. बहुतांश ठिकाणी असलेल्या कमकुवत संरक्षक भिंतीच्या ठिकाणी नवीन भक्कम संरक्षक भिंत बांधण्याचा मागणी होत आहे. व्हरवडेतील अंबाबाई देवालयाजवळ रस्त्याची उंची वाढविण्यासाठी केलेल्या भरावामुळे आणि चुकीची भिंत बांधल्याने रस्ता समपातळीत आला आहे. त्यावरून केव्हाही अपघात होऊन नदीपात्रात वाहन जाऊ शकते. 

साधारणत: पंचवीस वर्षांपूर्वी येथे एसटीचा अपघात होऊन मोठी जीवित हानी झाली होती. ती पुनरावृत्ती होऊ शकते, अशी परिस्थिती आहे. आवळी बुद्रुक येथील शाळेच्या बाजूला रस्त्यालगत अशीच स्थिती आहे. सिरसेओढ्यावरील पुलाच्या ठिकाणी सखल व रुंद भाग असल्याने पुढे धोकादायक वळण आणि भोपळेवाडी फाटा यामुळे अपघात क्षेत्र झाले आहे. गैबीपासून पुढे दाजीपूरपर्यंतचा रस्ता हा निपाणी- देवगड मार्गावर येत असल्याने याच्या सुधारण्याचे काम सुरू आहे. मात्र हसणेपासून दाजीपूरपर्यंत पाच किलोमीटरचा रस्ता खराबच आहे. 

कोल्हापूर-राधानगरी मार्ग 
*महिन्याला 40 ते 45 हजार वाहनांची ये-जा. 
* निपाणी-देवगड मार्गाचा ऍक्‍सेस. 
*मार्गावर सूचना आणि इशारा फलकांचा अभाव. 
* खिंडी व्हरवडे घाटात संरक्षण भिंत पुनर्बांधणीची गरज 
* बनाच्या अंबाबाईजवळील धोकादायक परिसर सुधारण्याची गरज 
*अतिक्रमणमुक्त बाजूपट्ट्यांसाठी संबंधित खात्याने तत्पर राहावे 
* बरगेवाडी ते कौलव दरम्यानच्या अरुंद पुलाची पुनर्बांधणी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com