इचलकरंजीतील संसर्ग रोखण्यासाठी ऍक्‍शन प्लॅन... जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सुचना "या' भागात होणार घर टू घर तपासणी

Action Plan To Prevent Infection In Ichalkaranji Kolhapur Marathi News
Action Plan To Prevent Infection In Ichalkaranji Kolhapur Marathi News

इचलकरंजी : शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ऍक्‍शन प्लॅन तयार केला आहे. तांबे मळा, कलावंत गल्ली, लालनगर, गावभाग या हॉटस्पॉट परिसरात घर टू घर नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येणाऱ्यांची अँटीजेन रॅपिड टेस्ट बंधनकारक असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. 

शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनाबाबत प्रांत कार्यालयात बैठकीनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, "खासगी डॉक्‍टरांनाही व्हॉटस्‌ऍप ग्रुपच्या माध्यमातून कोरोना संदिग्ध रूग्णांची दैनंदिन माहिती स्थानिक आरोग्य यंत्रणेला कळवण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. सध्या बाधित रुग्णांना घरीच उपचाराची सोय केली असल्याने कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात बेड शिल्लक आहेत. घरीच आयसोलेशन असलेल्या कोरोनाबाधीत रूग्णांच्या घरावर कोरोना प्रतिबंधीत असल्याचे पोस्टर लावण्यात येणार आहे. असे रूग्ण बाहेर फिरणार नाहीत याची खबरदारी घेऊन त्यांना योग्य समुपदेशन केले जाणार आहे. आयजीएम रूग्णालयात सध्या 40 ऑक्‍सीजन पुरवठा असलेले बेड तयार असून पुढील काही दिवसात असे 100 बेड सज्ज ठेवले जाणार आहेत. शहरालगतच्या सर्व ग्रामीण भागातही कोरोना रोखण्यासाठी हा ऍक्‍शन प्लॅन अंमलात आणला जाईल. प्रत्येक कोरोनासंदिग्ध रूग्णांची अँटीजेन टेस्ट घेतली जाणार आहे.'' 

शहरात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत असतानाही हातगाडे, खाद्य पदार्थ दुकाने सर्रासपणे सुरू आहेत. अशांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेला दिले. आयजीएममध्ये काम केलेल्या व सध्या सेवेपासून दूर असलेल्या 42 कर्मचाऱ्यांना कंत्राटी पध्दतीने कोरोनात काम करण्याच्या नोटीसा काढल्या जाणार आहेत, असे जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी सांगितले. प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार प्रदीप उबाळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. आर. शेटे, मुख्याधिकारी दीपक पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, अप्पर तहसीलदार एम. एन. सनदे आदी उपस्थित होते. 

जिल्हाधिकाऱ्यांचा बाधीत रूग्णांशी थेट संवाद 
शहरातील कोविड केअर सेंटर यासह हॉटेल व सामाजिक संस्था, होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असणाऱ्या कोरोना रूग्णांशी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मोबाईलवरून थेट संपर्क साधला. आरोग्य यंत्रणेकडून होत असणाऱ्या उपचाराविषयी विचारपूस केली. कोरोनाबाधीत रूग्णांवर योग्य उपचार करण्याच्या सक्त सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. 

कंटेन्मेंट झोनची कडक अंमलबजावणी 
सध्या शहरात कंटेन्मेंट झोन परिसरात नागरिक बेफिकीरपणे फिरत आहेत. स्थानिक प्रशासनाकडूनही या ठिकाणी निर्बंध शिथील केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे शहरातील सर्व कंटेन्टमेंट झोनमध्ये कडक निर्बंध लादून नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 

संपादन - सचिन चराटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com