आठ तासांच्या प्रयत्नांनंतर आजींना केले ‘सीपीआर’मध्ये दाखल

सकाळ वृत्तसेवा | Friday, 9 October 2020

सेवा निलयम फाउंडेशनचा पुढाकार  

टेंबलाईवाडी (कोल्हापूर) :  राजारामपुरी १३ वी गल्ली येथील एस. टी. कॉलनी परिसरात दोन दिवसांपूर्वी एका उद्यानात वयस्कर आजी भेटल्या. त्या भुकेल्या आणि अस्वस्थ असल्याचे लक्षात येताच सोसायटीचे अध्यक्ष अभिजित धनावडे यांनी याबाबतची माहिती अमरसिंह जाधव यांना दिली. जाधव यांनी उद्यानात जाऊन संबंधित आजींशी बोलायचा प्रयत्न केला; पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. विविध प्रयत्नांनंतर अखेर त्यांनी सेवा निलयम फाउंडेशनशी संपर्क साधला आणि तब्बल आठ तासांच्या प्रयत्नांनंतर आजींना ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर सेवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

जाधव यांनी विविध संस्थांशी संपर्क करीत असतानाच १०८ रुग्णवाहिका मागवली. रुग्णवाहिका आल्यानंतर कॉलनीतील राजस पोतनीस यांच्यासह नागरिकांनी आज्जींना रुग्णवाहिकेत बसवण्याचा प्रयत्न केला; पण त्या तयार नव्हत्या. त्यामुळे मग फाउंडेशनशी संपर्क साधला गेला. 

हेही वाचा- आयुक्त झाले भावूक :  कोल्हापूरसारखे प्रेम कुठेच नाही! -

Advertising
Advertising

ऐश्वर्या मुनीश्वर, राहुल गोंदिल येथे आल्यानंतर त्यांनी आज्जींशी संवाद साधायला सुरवात केली. खूप वेळ त्यांचे प्रयत्न सुरू होते. अखेर हा संवाद प्रतिसादात बदलला आणि आजी रुग्णवाहिकेत बसल्या. त्यांना ‘सीपीआर’मध्ये आणले. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तत्काळ पुढील उपचारांसाठी त्यांना कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात दाखल केले. सुभाष मुंदडा यांचेही विशेष सहकार्य मिळाले. दरम्यान, सध्या या आजींवर उपचार सुरू असून, त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे.

संपादन- अर्चना बनगे