कोल्हापूर: राजू शेट्टींनी निषेध करीत कृषी विधेयकाची केली होळी 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

कोल्हापुरात बाजारसमितीतील व्यवहार ठप्प 

बाजारपेठामध्ये वर्दळ थंडावली 

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला आज जिल्ह्यात प्रतिसाद मिळत आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील बहुतांशी बाजारपेठा बंद होत्या. कोल्हापूर बाजारसमितीत गुळासह भाजीपाला, कांदा बटाटा बाजारही बंद राहिल्याने दररोजची लाखो रुपयांची उलाढाल ठप्प होती.

शाहूपुरी, लक्ष्मीपूरी या व्यापारी पेठांमध्येही बंदचा परिणाम जाणवला. दररोजची वर्दळ जाणवली नाही. बंदची कल्पना असल्याने मध्यवर्ती बसस्थान परिसरातही बसेसची तुरळक वर्दळ राहिली. मालवाहतूक वगळता अन्य प्रवासी वाहतूकीवर परिणाम झाल्याचे दृष्य सकाळी दहा वाजेपर्यंत होते. 

हेही वाचा- धक्कादायक: जीवलग मित्रांनीच दगडाने ठेचून केला मित्राचा खून -

दरम्यान शिरोळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी या विधेयकाचा निषेध करीत विधेयकांच्या प्रतींची होळी केली. हे विधयक शासनाने तातडीने मागे घ्यावे अशी विनंती श्री शेट्टी यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नी सर्वांनी एकजूट होवून निषेध नोंदविल्याबद्दल श्री शेट्टी यांनी आंदोलनात सहभागी घटकांचे अभिनंदन केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना, कोल्हापूर बाजार समिती, गूळ, भाजीपाला मार्केट, राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, सराफ बाजारही बंद ठेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. त्याशिवाय जिल्ह्यातून विविध संघटना, पक्ष, संघ, व्यापारी, उद्योजक पाठबळ देत आहेत.  

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture Bill fire form swabhimani shetkari sanghatana former raju shetti