कथा एका स्वाभिमानी बापाची अन्‌ जिद्दी मुलाची ; मुलगा प्राध्यापक तर बाप देतो चरणसेवा

ahire family father and son positive story by sandeep khandekar kolhapur
ahire family father and son positive story by sandeep khandekar kolhapur

कोल्हापूर : ‘‘तू प्राध्यापक आहेस, तुझ्या कॉलेजजवळ चप्पल दुरुस्तीचं काम केलं तर चालंल काय?,’’ हाडाची काडं केलेल्या श्रमिक बापाचा मुलग्याला प्रश्न. ‘‘तुम्ही ते काम करू शकता. मला कसलीही अडचण नाही. त्यातून मिळणाऱ्या पैशावरच माझं शिक्षण झालंय. तुम्ही निःसंकोचपणे काम करा,’’ मुलग्याचे उत्तर आले. सायबर चौकाच्या अलीकडच्या बसस्टॉपजवळ झोपडीत बापाचं काम सुरू झालं. 


कधी तुटक्‍या चप्पलांना शिवण्यात, कधी नवे कोल्हापुरी चप्पल करण्यात बापाच्या हाताचा वेग वाढला. प्राध्यापक मुलगा संशोधन कार्यात व्यस्त झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर १३, राष्ट्रीय स्तरावर एक शोधनिबंध त्याने सादर केला. बापाचा शाबासकीचा हात त्याच्या पाठीवर आजही पडतो. दोघांच्या स्वाभिमानाच्या लढाईचा अंक आजही सुरू आहे आणि तो प्राध्यापक वर्तुळात अभिमानाचा विषय बनला आहे. या बापाचे नाव देवराम गणपत अहिरे, तर मुलगा प्रा. कैलास अहिरे.


देवराम अहिरे मूळचे साकोरेमिगचे (ता. निफाड, जि. नाशिक). आर्थिक स्थिती बेताची असताना त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला नाही. जुनी मॅट्रिक पास होऊन डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण केला. दहा वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून काम केले. पत्नी, तीन मुली व एक मुलगा यांचा खर्च शिक्षकी पेशात परवडणारा नव्हता. चप्पल दुरुस्तीसह नवी चप्पल बनविण्याचे काम त्यांनी हाती घेतले. मुलगी चंद्रकला व निर्मला तिसरीपर्यंत शिकल्या. सोनाली बारावी उत्तीर्ण झाली. परिस्थितीमुळे दोन मुलींच्या शिक्षणावर गंडांतर आले होते. मुलगा कैलास यांच्या शिक्षणात त्यांनी कोणतीच कसूर ठेवली नाही. 


कैलास यांचे गावातल्या शाळेत दहावी व पिंपळगाव बसवंतातल्या महाविद्यालयातून ते बारावी उत्तीर्ण झाले. त्यांना नाशिकमधल्या केटीएचएम महाविद्यालयातून बीएस्सीसाठी प्रवेश हवा होता. मेरिटलिस्टमध्ये नाव झळकले असले, तरी शिक्षणासाठी खर्च पेलणारा नव्हता. आई चंद्रभागा यांचे दागिने गहाण ठेवूनही खर्चाचे गणित सुटले नाही. देवराम मुलग्याचा प्रवेश रद्द करण्यासाठी महाविद्यालयात गेले.प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी कैलास यांना तीन वर्षांसाठी दत्तक घेऊन आर्थिक चिंतेला पूर्णविराम दिला. पुढे पुणे विद्यापीठातून ते एमएस्सी (इन्व्हार्मेंटल सायन्स) झाले. तिथल्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्थेत दोन वर्षे त्यांनी संशोधन केले. 


प्रा. अहिरे सायबरमध्ये २०१५ ला रुजू झाले. त्यांना सायबरचे कार्यकारी विश्‍वस्त आर. ए. शिंदे यांनी कामाची संधी दिली. पर्यावरण व्यवस्थापन व पर्यावरण सुरक्षा हे त्यांच्या अध्यापनाचे विषय. ते पंधरापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी तुर्की, बॅंकॉकमध्ये शोधनिबंध सादर केले. त्यांच्यासमवेत आई-वडीलही कोल्हापुरात आले. वडिलांनी सायबरच्या परिसरात चप्पल दुरुस्तीचे छोटे दुकान थाटले. तसेच मुलग्याला आर्थिक व मानसिक आधार दिला.

मी पुणे विद्यापीठाशी संलग्नित केटीएचएम महाविद्यालयातील संशोधन केंद्रात पर्यावरणशास्त्र विषयात पीएच.डी.चे संशोधन करत आहे. वडिलांची इच्छा पूर्ण करायची आहे. या वयात त्यांनी काम करावं, असे मला वाटत नाही. मात्र, ते स्वाभिमानी आहेत. ते करत असलेल्या कामाचा मला अभिमान आहे.
- प्रा. कैलास अहिरे.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com