काजू संशोधन केंद्र उभारा... 'या' तालुक्याने केली मागणी

Ajara Panchayat Samitee Demand Cashew Research Center Kolhapur Marathi News
Ajara Panchayat Samitee Demand Cashew Research Center Kolhapur Marathi News

आजरा : सुळेरान येथे हत्ती संगोपन केंद्र उभारण्याबाबत वनविभागाकडून हालचाली सुरू आहेत. या केंद्राला ग्रामस्थांचा विरोध आहे. ग्रामस्थांना विश्‍वासात घेवूनच या केंद्राचा विचार व्हावा. तीव्र विरोध झाल्यास हे केंद्र तिलारीकडे हलवावे, अशी सूचना सभापती उदयराज पवार यांनी केली. त्यांनी तालुक्‍यात काजू संशोधन केंद्र व्हावे अशीही मागणी केली. उपजिल्हाधिकारीपदी लक्ष्मण कसेकर व तहसीलदारपदी कौशल्याराणी सरदेसाई यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव झाला. सभापती पवार सभेच्या अध्यक्षस्थानी होते. 

गटविकास अधिकारी बी. डी. वाघ यांनी स्वागत केले. सदस्य शिरीष देसाई यांनी आदरांजली ठराव मांडला. आजरा परिक्षेत्र वनाधिकारी सुनिल लाड यांनी हत्तीकडून झालेल्या नुकसानीची माहिती दिली. या वेळी पवार यांनी हत्ती संगोपन केंद्राबाबत विचारणा केली. या केंद्राबाबत ग्रामस्थांना विश्‍वासात घ्यावे. त्याच्या फायद्या तोट्याबाबत चर्चा करावी. त्यांनी तीव्र विरोध केल्यास केंद्र तिलारीला हलवावे. काजू पिक तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा आर्थिक आधार आहे. या पिकासाठी तालुक्‍यात काजू संशोधन केंद्र उभा करावे, अशी मागणी केली. तालुका कृषी अधिकारी के. एन. मोमीन यांनी काजू व आंबा पिक विम्याची महिती दिली. 

वाढीव वीज बिलाला तालुक्‍यात तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे जून्या आकारणीप्रमाणे वीज बिल भरून घ्यावे. काही अधिभार ज्यादाचे केल्यामुळे ग्राहक अडचणीत आले आहेत. ते दूर करून वीज बिल द्यावीत, अशी मागणी सदस्य शिरीष देसाई यांनी केली. निंगुडगे येथील आरोग्य सेविकेची बदली करण्याची मागणी सदस्या वर्षा बागडी यांनी केली. दिव्यांग उन्नती अभियानातील लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल कसेकर व जिल्हा परिषद पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार सुनिल पाटील यांचा सत्कार झाला. सदस्य बशीर खेडेकर, रचना होलम, वर्षा बागडी, वर्षा कांबळे यांनी चर्चेत भाग घेतला. सहाय्यक गटविकास अधिकारी पी. बी. जगदाळे, विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. 

मुश्रीफांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव..! 
पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या निधीतील दहा टक्के रक्कम पंचायत समितीसाठी राखीव ठेवल्याबद्दल, ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांना मानधन सुरू केल्याबद्दल ग्रामविकास मंत्री म्हणून व जिल्हा बॅंकेच्या कर्ज वितरण धोरणात काजू पिकाचा समावेश केल्याबद्दल अध्यक्ष म्हणून हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचा ठराव पंचायत समितीमध्ये सदस्य शिरीष देसाई यांनी मांडला. 

Kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com