खेड्यापाड्यात काम करणाऱ्या गटसचिवांनाही संरक्षण द्या

निवास चौगले
Tuesday, 22 September 2020

कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक विकास सहकारी सेवा संस्थांचे गटसचिव हे जिल्हा सहकारी बॅंकेच्या कुटुंबाचे सदस्यच आहेत. कोरोना महामारीत त्यांना विमासुरक्षा कवच देण्यासाठी बॅंकेच्या संचालक मंडळाने एकमताने ठराव मंजूर करावा, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. 

कोल्हापूर ः कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक विकास सहकारी सेवा संस्थांचे गटसचिव हे जिल्हा सहकारी बॅंकेच्या कुटुंबाचे सदस्यच आहेत. कोरोना महामारीत त्यांना विमासुरक्षा कवच देण्यासाठी बॅंकेच्या संचालक मंडळाने एकमताने ठराव मंजूर करावा, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. 
कोल्हापुरात खाजगी दवाखान्यात कोरोनावर उपचार घेत असलेल्या मंत्री श्री. मुश्रीफ यांनी संचालक मंडळाला आज पत्र लिहिले. काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचे सहकारी संस्थांचे उपनिबंधक व केडरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी माझी बॅंकेमध्ये भेट घेऊन विकाससंस्थांचे, गटसचिव या कोरोना महामारीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे कर्ज वाटप, उसाची बिले वाटप, व्याज परताव्याची प्रस्ताव तयार करणे, वसुली, कर्जमाफी माहिती, अतिवृष्टी व महापूर माहिती, बियाणांचे वाटप यांसारखी महत्त्वाची व जोखमीची कामे करीत आहेत. तुटपुंज्या पगारावर असलेल्या तसेच मृत्यू पावलेल्या गटसचिवांच्या कुटुंबीयांचे जीवन अंधकारमय झालेले असल्याचे या पत्रात श्री. मुश्रीफ यांनी म्हटले आहे. 
केडरची आर्थिक परिस्थिती बरी असली तरी संपूर्ण बोजा उचलू शकत नाही. यामध्ये गटसचिव म्हणजे बॅंकेचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे बॅंकेने विमाकवच देण्यासाठी निम्मा बोजा केडर व निम्मा बोजा बॅंक अशा प्रकारचा प्रस्ताव दिला होता. बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या विषयपत्रिकेमध्ये हा विषय ठेवला असून जो प्रस्ताव आहे. त्याचे वाचन करून मी तो पाहिलेला आहे. तरी त्यास एकमताने संचालक मंडळाने मान्यता द्यावी, असेही या पत्रात म्हटले आहे. मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना केडरमार्फत फूल ना फुलाची पाकळी म्हणून ते अर्थसहाय्य करणार आहोत. कर्जमाफीचे काम गटसचिवांनी उत्तम केले म्हणून एक बक्षीस पगार बॅंकेच्या नफ्यातून दिला होता. त्यास अद्याप शासनाची परवानगी न मिळाल्यामुळे नाबार्डने त्रुटी काढली आहे. तरी जिल्हा उपनिबंधकांनी विमा कवच व बक्षिसाच्या रकमेचे दोन्ही नाहरकत आणून देण्याची व्यवस्था करावी अशी सूचनाही या पत्रात केली आहे. 

कोरोनामुळे मृत गटसचिव 
सर्वसामान्यांशी रोजचा संपर्क येत असल्यामुळे जिल्ह्यात पाच गटसचिवांचा कोरोनाने मृत्यू झाले आहेत. त्यांची नावे अशी ः चंद्रकांत शंकर पाटील (कागल), सुभाष महिपती यादव (शाहूवाडी), पांडुरंग भिकाजी पोवार (हातकणंगले), आप्पासो बाळू परीट व राजेंद्र बाबुराव सौंदते (शिरोळ) हे पाच गटसचिव मृत्यू पावले आहेत. 
 

संपादन ः रंगराव हिर्डेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Also protect the group secretaries working in the villages